मधु कांबळे – madhukar.kamble@expressindia.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जगाच्या पुनर्रचनेसाठी जो जो चळवळ करील किंवा अशा चळवळीचा भाग होईल, तो बौद्ध, हा धम्मक्रांतीमागचा विचार आज मागे पडून बौद्ध ‘धर्म’ वाढतो आहे..

भारतीय संविधानात समता, स्वातंत्र्य, बंधुभाव, सामाजिक न्याय या तत्त्वांचा समावेश केला गेला, तो केवळ प्रवचने देण्यासाठी नाही, तर या तत्त्वांशी सुसंगत असा समाज निर्माण करण्यासाठी, हा त्याचा खरा अर्थ आहे. म्हणजे समता, स्वातंत्र्य, बंधुभाव, सामाजिक न्यायाला जे जे हानीकारक आहे, ते ते नाहीसे करणे हे ओघानेच आले. याचा दुसरा अर्थ समता केवळ संविधानात असून चालणार नाही, तर ती समाजात असायला हवी. म्हणून समाजात बदल घडवून आणणे अपरिहार्य ठरते.

या देशात विषमतेवर आधारित जातिव्यवस्था आहे आणि तिचा आधार धर्म आहे. म्हणून विषमता संपवायची असेल तर जातिव्यवस्था संपवावी लागेल आणि तिचा आधारही नष्ट करावा लागेल. जातिव्यवस्थेच्या उच्चाटनासाठी आंबेडकरांनी अविरत वैचारिक संघर्ष केला, परंतु त्यात काहीच बदल होत नाही, असे लक्षात आल्यानंतर त्यांनी ज्या धर्मात बदल करता येत नाही, त्या धर्मातून मुक्त होण्याचा निर्णय घेतला. १४ ऑक्टोबर १९५६ रोजी त्यांनी िहदू धर्माचा त्याग केला आणि बौद्ध धम्माचा स्वीकार केला. त्याला धम्मक्रांती असे म्हटले जाते. परंतु गेल्या ६३ वर्षांत काय घडले? धम्मक्रांतीने जातिव्यवस्थेला किंवा धर्मव्यवस्थेला धक्का दिला का? याचे उत्तर काही प्रमाणात होकारार्थी, पण बऱ्याच प्रमाणात नकारार्थी आहे.

धम्मक्रांतीचा विचार स्वीकारलेल्या समूहात मोठय़ा प्रमाणावर वैचारिक परिवर्तन झाले, त्यांच्या जीवनमानात, राहणीमानात बदल झाला; परंतु त्याची व्याप्ती वाढली नाही. हळूहळू जातिअंतासाठी बौद्ध धम्माचा स्वीकार केला गेला, परंतु पुढे बौद्ध हा शब्द एक नवी जात निर्देशित करू लागला. पूजापाठ, कर्मकांडात अडकला. धम्मक्रांतीमागचा उद्देश नीट समजून न घेतल्यामुळे किंवा त्याचे नीट आकलन न झाल्यामुळे धम्माची वाट पुन्हा धर्माच्या दिशेने सुरू झाली आहे, असे म्हणावे लागेल.

बाबासाहेब आंबेडकरांनी इतर धर्मसंस्थापकांप्रमाणे म्हणजे स्वत: ईश्वर, सर्वशक्तिमान, देवाचा दूत किंवा देवपुत्र अशा स्वरूपात बुद्धाला पुढे आणले नाही, तर मूळचा एक माणूस आणि समाजचिंतनशील तत्त्ववेत्ता म्हणून जगासमोर आणले. धर्मव्यवस्थेने बहिष्कृत केलेल्या वर्गासमोर त्यांच्या उत्थानासाठी आणि सामाजिक परिवर्तनासाठी बुद्धाचे तर्कशुद्ध विचार मांडले. धर्म आणि धम्म कसा वेगळा आहे, धर्माचा उद्देश आणि धम्माचा उद्देश यातील मूलभूत फरक त्यांनी उलगडून सांगितला. आत्मा आणि ईश्वर बुद्धाने नाकारला. म्हणजे ईश्वराच्या व आत्म्याच्या नावाने होणारे सर्व प्रकारचे कर्मकांड नाकारले. वर्तमान काळात माणसाने माणसाशी कसे वागावे, हा बुद्धाचा विचार त्यांनी विशुद्ध स्वरूपात नव्याने मांडला. हा विचार केवळ वैयक्तिक उत्थानासाठी नसून तो सामाजिक परिवर्तनासाठी आहे, यावर त्यांनी अधिक भर दिलेला आहे. या पाश्र्वभूमीवर धम्मक्रांतीतून बाबासाहेबांना काय साधायचे होते आणि प्रत्यक्षात काय घडले किंवा घडते आहे, हे पुन्हा एकदा नव्याने समजून किंवा जाणून घेण्याची आवश्यकता आहे.

बुद्धाचा धम्म म्हणजे काय आणि त्याचे सामाजिक तत्त्वज्ञान काय, याची बाबासाहेबांनी सद्धांतिक मांडणी केली आहे. बुद्धाने आपल्या पहिल्या प्रवचनातच सांगितले की, आपला जो मार्ग आहे, धम्म आहे, त्याला ईश्वर वा आत्मा याच्याशी काहीही कर्तव्य नाही. धम्माचा कर्मकांडाशी काहीही संबंध नाही. जगात दु:ख आहे व त्या दु:खापासून मानवाची मुक्तता करणे हा धम्माचा उद्देश आहे.

भ्रामक समजुती माणसाची शोध करण्याची प्रवृत्ती मारतात किंवा तिचे उगमस्थानच नष्ट करतात, अशा प्रकारे बुद्ध समाजातील अंधश्रद्धा निर्मूलनाचा मूलगामी विचार मांडतात. गौतम बुद्ध हा जातिसंस्थेचा सर्वश्रेष्ठ विरोधक असून समतेचा पहिला आणि खंबीर असा समर्थक होता, असे डॉ. आंबेडकरांनी म्हटले आहे. मात्र काही लोक विषमतेचे वेगळ्या प्रकारे समर्थन करतात. उदाहरणार्थ, जन्माने माणसे विषम असतात. काही दुबळी तर काही बळकट, काहींना अधिक बुद्धी तर काहींना थोडी, काही सधन असतात, काही निर्धन, या सर्व प्रकारच्या माणसांना जीवनसंघर्षांत प्रवेश करायचा असतो. या जीवनसंघर्षांला स्वाभाविक स्थिती असे मानले तर दुबळ्याची स्थिती असह्य़ होईल. म्हणून विषमता हा जीवनाचा नियम करून कसे चालेल, असा विचारगर्भ प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

‘‘बुद्धाच्या धम्मात देव नाही, प्रार्थना नाही, तीर्थयात्रा नाही, कर्मकांड नाही, विधी अथवा यज्ञ नाही,’’ असे बाबासाहेबांनी ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथात म्हटले आहे (पान क्र. २४९). धम्मात देव नाही, तर देवाची जागा ही नीतीने घेतली आहे. एकूणच धम्मक्रांतीचा उद्देश अधोरेखित करताना, नीती म्हणजे काय आणि ती कशासाठी हवी, तिचे सामाजिक स्वरूप कसे असावे, याचे एक उत्तम उदाहरण त्यांनी दिले आहे. चोरांमध्ये आपापसात नीती नसते असे नाही, व्यापाऱ्यांतही आपापसात नीती असते, एकाच जातीच्या माणसांत आपापसात नीती असते; परंतु या नीतीचे स्वरूप वेगळेपणाची जाणीव आणि आपल्यापुरतीच क्रियाशीलता निर्माण करणारे असते. ही नीती एका विशिष्ट समूहाच्या हिताचे संरक्षण करण्यापुरती मर्यादित असते, म्हणजे अन्य समूहांची विरोधक असू शकते. जर समाज असा परस्परविरोधक समूहांचा बनला तर तो समाज असंघटित राहील. त्यावर उपाय काय? तर बंधुता आणि बंधुता म्हणजे काय? तर मानवामानवांमधील भातृभाव म्हणजेच नीती. बुद्धाची नीती इतकी व्यापक व समाजहितकारक आहे.

बुद्ध तत्त्वज्ञान जात मानत नाही, किंबहुना धम्माच्या स्वीकाराने त्याचे जातीचे अस्तित्व संपुष्टात येते. बुद्धाने भिक्खू संघाला महासागराची उपमा दिली आहे. नद्यांना स्वतंत्र नावे व अस्तित्व असते; परंतु नदी जेव्हा महासागराला मिळते तेव्हा तिचे नाव व अस्तित्व लोप पावते. जो बुद्ध तत्त्वज्ञानाचा स्वीकार करतो, त्याला जात नसते, हा त्याचा अर्थ आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकरप्रणीत धम्मक्रांतीचा पाया हा धम्माच्या प्रयोजनावर उभा आहे. धम्म आणि धर्म यांच्यातील फरक सांगताना त्यांचे वेगवेगळे प्रयोजनही स्पष्ट करण्यात आले आहे. धर्माचे प्रयोजन जगत्प्रारंभाचे स्पष्टीकरण करणे हे आहे, तर धम्माचे प्रयोजन जगाची पुनर्रचना करणे हे आहे.

बुद्धविचाराच्या वरील थोडक्यात विवेचनानुसार धम्मात देव नाही; परंतु आता परिस्थिती अशी आहे की, बुद्धालाच देवाच्या ठिकाणी बसविले जात आहे. बौद्ध म्हणून ज्या काही लग्नाच्या वेळी किंवा मृत्यूनंतर विधी केले जातात, त्यातून धम्मही कर्मकांडमुक्त नाही, हेच दिसून येते. बौद्ध म्हणून तीर्थयात्राही मोठय़ा प्रमाणावर सुरू झाल्या आहेत. त्याचा गेल्या ६३ वर्षांत परिणाम काय झाला? तर इतरांचा जसा एक धर्म आहे, तसाच यांचाही बौद्ध धर्म अशीच ओळख किंवा समजूत तयार झाली.

बाबासाहेबांनी सांगितले की, धम्माचे प्रयोजन हे जगाची पुनर्रचना करणे हे आहे. समता, स्वातंत्र्य, बंधुभाव या विचारांवर जगाची पुनर्रचना त्यांना अभिप्रेत आहे. म्हणजे जगाच्या पुनर्रचनेसाठी जो जो चळवळ करील किंवा अशा चळवळीचा भाग होईल, तो बौद्ध. मग तो कोणत्याही जातीत जन्माला आला असेल, तो, विशिष्ट प्रसंगात विशिष्ट रंगाचे कपडे परिधान करणारा नसेल, विशिष्ट रंगाचा आग्रह धरणारा नसेल, त्याला त्रिशरण, पंचशील तोंडपाठ नसेल, तो नित्यनियमाने विहारात जाणारा नसेल, जो समतावादी आंदोलनाचा भाग बनेल, तर मग तो बौद्ध असणार की नाही किंवा त्याला बौद्ध मानणार की नाही, हा खरा प्रश्न आहे. जो समतावादी असेल त्याची जात शिल्लक राहत नाही. ज्याला जात नाही तो बौद्ध, त्यासाठी त्याने कोणतेही कर्मकांड करण्याची आवश्यकता नाही, हाच धम्मक्रांतीचा व्यापक अर्थ आहे.

इतिहासात बुद्धाची धम्मक्रांती विरोधी विचारांच्या प्रतिक्रांतीने पराभूत केली होती. त्याची कारणे आणि परिणाम बाबासाहेबांनी सांगितलेली आहेत. १४ ऑक्टोबरच्या धम्मक्रांतीलाही प्रतिक्रांतीने घेरले आहे. ही प्रतिक्रांती जशी विरोधी विचारांची आहे, तशीच ती धम्म स्वीकारलेल्या परंतु धम्माशी विसंगत धम्मानुयायांच्या वर्तनातून व कृतीतून कळत-नकळत आक्रमण करीत आहे. बुद्धाचा महासागराचा विचार आपण स्वीकारला का, म्हणजे पहिल्यांदा आपण आपल्या जातीचा त्याग केला का, की फक्त जातीचे नाव बदलले, याचाही विचार केला पाहिजे. जो मंदिरात जातो तो हिंदू, जो चर्चमध्ये जातो तो ख्रिश्चन, जो मशिदीत जातो तो मुसलमान, तसाच जो विहारात जातो तो बौद्ध, हीच बौद्ध असण्याची ओळख असेल तर मग धर्म आणि धम्मात जो बाबासाहेबांनी फरक केला, त्याचे काय करायचे?

दुसरे असे की, ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ हा बुद्धाचा विचार असल्याचे सांगितले जाते. जगाच्या कल्याणाचे तत्त्वज्ञान मांडणारा बुद्ध फक्त बहुजनांच्याच हिताचा कसा विचार करील. मग ‘भवतु सब्ब मंगलम’ म्हणजे सर्वाचे कल्याण व्हावे, हा कुणाचा विचार आहे? समतावादी बुद्धाचीही अशी सोयीस्कर विभागणी केली जात असेल तर, प्रतिक्रांती आणखी वेगळी काय असू शकते?

शेवटी तत्त्वज्ञान कितीही उदात्त, चांगले व मानवी हिताचे असले तरी, त्याप्रमाणे आचरण केले नाही तर ते तत्त्वज्ञान पराभूत होते किंवा केवळ प्रतीकांच्या स्वरूपात ते जपले, तरी ते जिवंत असल्यासारखे वाटते; परंतु ते मेल्यासारखेच असते. कारण त्यात मूळ विचाराचा प्राणच राहिलेला नसतो. धम्मक्रांतीची आज तशीच अवस्था झाली आहे. ती केवळ प्रतीकांच्या आणि प्रतिमांच्या रूपात जिवंत असल्याचे भासत आहे. धम्मक्रांतीला एका जातीत बंदिस्त करून ठेवले आहे, त्यामुळे ती जातिअंताच्या म्हणजे समतेच्या चळवळीपासून दूर दूर जात आहे.

मराठीतील सर्व समाजमंथन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta madhu kamble article on buddhist religion buddha dhamma kranti zws
First published on: 03-10-2019 at 02:52 IST