वामी सेवामय अशा देसाई कुटुंबाची शुद्ध भावना हीच होती की, ‘सेवा स्वामींनी करवून घेतली!’ अर्थात आम्ही ‘केली’ नाही. शेवटच्या अठरा दिवसांत स्वामी स्वरूपानंद यांनी या सेवाधर्माच्या परिपूर्णत्वाची पोचही दिली! ‘अनंत आठवणीतले अनंत निवास’ या पुस्तकात श्री. विजय देसाई लिहितात की : स्वामींनी स्वत:च्या स्वाक्षरीने अभिप्राययुक्त कागद दिला. त्यातील मजकूर पुढीलप्रमाणे होता, ‘‘माझ्या क्षीण प्रकृतीचे निमित्त करून ईश्वराने जणू तुम्हा सर्वाची गुरुसेवा कसोटीला लावली. तुम्ही त्या कसोटीला पूर्णपणे उतरला आहात. मी तृप्त आहे, समाधानी आहे’’ (पृ. १०८). सद्गुरू तर सदातृप्तच असतात. स्वामींच्या शब्दांत सांगायचं तर ‘आत्मतृप्त’च असतात. मग इथे ‘मी तृप्त आहे’ याचा अर्थ काय? तर सद्गुरू केवळ आत्मस्वरूपस्थ भावातच तृप्त असतात. नश्वर, अशाश्वत असं भौतिक त्यांना काय तृप्त करणार? तरी याच अशाश्वत, नश्वर भौतिकात रूतलेला जीव जेव्हा खरी, प्रामाणिक सेवा करू लागतो, तेव्हा त्यांना भौतिकातील तेवढा भाग तृप्ती देणारा वाटतो! अशी सेवा जेव्हा सुरू होते, तेव्हाच सर्व संकल्प-विकल्प मावळू लागतात. मग सद्गुरू सांगतील तेच योग्य, तेच खरं, हीच मनाची धारणा होते. इतकंच नव्हे तर सद्गुरूंनी काही सांगण्याआधीच त्यांचा मनोभाव उमगून कृती होऊ लागते. ‘‘स्वामिचियां मनोभावा। न चुके हे चि परमसेवा।।’’ अशी परमसेवेत रत स्थिती येऊ लागते. तेव्हा शारीरिक, मानसिक कष्टांची, जीवबुद्धीची पर्वा न करता (तरी तनुमनु जीवें।) स्वामी सांगतील त्याच मार्गानं वाटचाल करणं (चरणांसी लागावें।) आणि सेवा आपण ‘करीत’ नाही, तर आपल्याला ती करण्याची संधी दिली गेली आहे, आपण निमित्त आहोत, सेवा ‘करवून’ घेतली जात आहे, हे जाणून अहंकाराचा स्पर्श होऊ न देता सेवारत राहिलं (आणि अगर्वता करावें। दास्य सकळ।।) तर काय होईल? स्वामी स्वरूपानंद संपादित ‘श्रीज्ञानेश्वरी नित्यपाठा’तील पुढील ओवी हेच सांगते. ही ओवी, तिचा नित्यपाठातला आणि ज्ञानेश्वरीतला क्रम, तिचा प्रचलित अर्थ आणि विशेषार्थ आता पाहू. ही ओवी अशी :
मग अपेक्षित जें आपुलें। तेही सांगती पुसिलें। जेणें अंत:करण बोधलें।
संकल्पा न ये ।। ५०।।
(अ. ४ / १६८).
प्रचलितार्थ : मग आपले जे इच्छित असेल ते त्यांना (सद्गुरूंना) विचारले असता ते सांगतात. त्या त्यांच्या बोधाने अंत:करण ज्ञानसंपन्न होऊन पुन्हा संकल्पाकडे वळणार नाही.
विशेषार्थ : सद्गुरूंचा मनोभावही ज्याला उमगू लागला आहे, त्याला इच्छा ती काय उरणार? तेव्हा इथे इच्छित काही विशेषच असले पाहिजे. ही विशेष इच्छा आत्मकल्याणाचीच आहे. त्याच्याआड जे येत आहे ते कसं नष्ट करायचं, ते कसं दूर करायचं, याचंच ज्ञान सद्गुरू देतात. आता पुढील भागापासून आपण या ओवीच्या या विशेषार्थाचं थोडं अधिक विवरण जाणून घेऊ. स्वामींनी ज्यांच्याशी आपली आंतरिक ऐक्यस्थिती उघड केली होती, त्या साईबाबांचा त्यासाठी विशेष आधार लाभला आहे!
संग्रहित लेख, दिनांक 23rd Oct 2014 रोजी प्रकाशित
२०८. सेवा-तृप्त
वामी सेवामय अशा देसाई कुटुंबाची शुद्ध भावना हीच होती की, ‘सेवा स्वामींनी करवून घेतली!’ अर्थात आम्ही ‘केली’ नाही. शेवटच्या अठरा दिवसांत स्वामी स्वरूपानंद यांनी या सेवाधर्माच्या परिपूर्णत्वाची पोचही दिली!
First published on: 23-10-2014 at 01:01 IST
मराठीतील सर्व विचारमंच बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Satisfied service