तो हा विठ्ठल बरवा.. तो हा माधव बरवा.. रूप पाहता लोचनी, रूप झाले वो साजणी! या सद्गुरूचं रूप मी डोळ्यांनी पाहू लागलो आणि मी तद्रूपच झालो. या सद्गुरूचं चालणं, बोलणं, हसणं, पाहणं.. त्याच्या लीला.. या साऱ्यात परम माधुर्य आहे. परम ज्ञान आहे. परमतत्त्वाचाच स्पर्श आहे. त्या परमेश्वराला आम्ही पाहू शकत नव्हतो. तो सर्वत्र असला तरी कुठेच दिसत नव्हता! प्रत्येक प्राणिमात्रांत असला तरी आमच्या अंतरंगातदेखील झळकत नव्हता. त्याच्या सत्तेशिवाय झाडाचं पानही हलत नाही म्हणतात, तो मुंगीचंही मनोगत जाणतो म्हणतात, त्यानंच हे विश्व निर्माण केलं आणि तोच ते सांभाळतो म्हणतात.. पण त्यावर आमचा पूर्ण अनुभवसिद्ध विश्वास नव्हता. मुंगीचं मनोगतही जाणणाऱ्यापर्यंत आमची प्रार्थना पोहोचते का, याचीही शंका होती. तो परमात्मा त्यामुळेच कितीही दिव्य असला तरी आमच्याजवळ नसल्याची भावना तीव्र होती. हा सद्गुरू जेव्हा जीवनात आला तेव्हापासून या साऱ्याचा प्रत्ययच तो थेट देऊ लागला! त्याच्या बोलण्यातून अंतरंगातल्या भ्रामक कल्पनांनाच धक्का पोहोचू लागला. त्याच्या कृतीतून जगण्याची कलाच उमगू लागली. विकारवासनांच्या जाळ्यातून तोच सोडवू लागला. त्यामुळे तोच (परमात्मा) हा (सद्गुरू) विठ्ठल आमच्यासाठी बरवा आहे. खरा आहे. तोच हा माधव आमच्यासाठी सहजप्राप्य आणि म्हणूनच चांगला आहे. जो दाता असतो त्याला देव म्हणतात. जो स्वत: पूर्ण आहे आणि जो माझ्यातली समस्त अपूर्णताच नष्ट करणारं पूर्ण ज्ञान, माझ्यातली समस्त अशांतीच नष्ट करणारी पूर्ण शांती, माझ्यातलं समस्त भवभयच नष्ट करणारं अभय, माझ्यातलं समस्त असमाधान नष्ट करणारं पूर्ण समाधान मला देऊ शकतो त्या सद्गुरूपेक्षा सर्वोच्च दाता अर्थात देव दुसरा कोण असणार? तर अशा हे सद्गुरूदेवा तूच खऱ्या अर्थानं गणेशही आहेस. आमची इंद्रियं आमच्या ताब्यात नाहीत. त्यामागे फरपटतच आमचं जीवन वाहात होतं. तू आलास आणि या इंद्रियांचे आम्ही कसे वेठबिगार आहोत, हेच आम्हाला उमगू लागलं. ही वेठबिगारी संपली नाही आणि आम्हीही याच इंद्रियांच्या बाजूचे असलो तरी तुझ्या बोधाचे आणि अगम्य कृतींचे लगामच असे आहेत की आमच्या इंद्रियजन्य वृत्तींना वेसण घातली जात आहे. मनामागे धावत त्याच्या इच्छेनुरूप वागावं, या आमच्या सवयीलाच त्यामुळे धक्के बसत आहेत. ती धाव संपली नसली तरी खुंटली मात्र आहे. तेव्हा हे सद्गुरूदेवा आमच्या इंद्रियगणांचा ईश अर्थात स्वामी तूच आहेस. तात्पुरतं, किरकोळ, अशाश्वत असं ज्ञान तू देतच नाहीस. आमचं ज्ञान म्हणजे निव्वळ पढीक माहिती. आजची माहिती उद्या कालबाह्य़ व्हावी, अशी आमच्या ज्ञानाची अवस्था. पदव्यांची चळत कितीतरी रचली तरी खऱ्या ज्ञानाची गोडी कुणाला माहितीच नाही, अशी आमची गत. अशा आमची संपूर्ण मति तू ज्ञानानं प्रकाशित करतोस. बुद्धीत थोडा प्रकाश पडण्यावर तू समाधानी नाहीस. बुद्धी पूर्णज्ञानानं सदोदित प्रकाशित व्हावी, हा तुझा आग्रह आहे. म्हणून तूच सकलमतिप्रकाश आहेस! पण त्यासाठी निवृत्तीचा दास मात्र व्हायलाच पाहिजे!
संग्रहित लेख, दिनांक 4th Feb 2014 रोजी प्रकाशित
२४. तो हा!
तो हा विठ्ठल बरवा.. तो हा माधव बरवा.. रूप पाहता लोचनी, रूप झाले वो साजणी! या सद्गुरूचं रूप मी डोळ्यांनी पाहू लागलो आणि मी तद्रूपच झालो.
First published on: 04-02-2014 at 12:27 IST
मराठीतील सर्व विचारमंच बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sawroop chintan divine spirit