अभिजीत अरिवद देशपांडे abhimedh@gmail.com

भारतीय समाजाचे अंतरंग दृश्यरूपातून मांडणाऱ्या महत्त्वाच्या चित्रपट दिग्दर्शकांच्या नामावलीत गिरीश कासारवल्ली हे नाव वरच्या फळीमधले. त्यांच्या कलाविश्वाचे महत्त्व या पुस्तकातून अधोरेखित झाले आहे.

भारतीय चित्रपट ही अतिशय व्यापक संज्ञा आहे. परंतु अजूनही सर्वसाधारणपणे भारतीय चित्रपट म्हटल्यावर हिंदी व्यावसायिक चित्रपट अर्थात बॉलीवूड चित्रपटच गृहीत धरला जातो. अनेक भाषा आणि अनेकविध संस्कृतींच्या या देशात एकच एक राष्ट्रीय चित्रपटही असणार नाही, हे उघड आहे. पण तरीही एक अभ्यासशिस्त म्हणून भारतीय राष्ट्रीय चित्रपटांचे नेमके वर्गीकरण करायचे तर- हिंदी व्यावसायिक चित्रपट, प्रादेशिक चित्रपट, कलात्मक वा समांतर चित्रपट, मध्यममार्गी चित्रपट आणि आंतरदेशीय सहकार्यातून निर्मित चित्रपट- असे मुख्यत: पाच प्रकार करता येतील. पैकी अकादमिक स्वरूपाच्या हिंदी-इंग्रजी-मराठी चित्रपटविषयक पुस्तकांतही हिंदी व्यावसायिक चित्रपट आणि प्रादेशिक चित्रपटांतही प्रामुख्याने बंगाली चित्रपटांविषयीचे लेखन अधिक प्रमाणात झालेले दिसते. सत्यजीत राय अथवा ऋत्विक घटक जसे भद्र मराठी समाजाला काही अंशी परिचित असतात, तसे आणि तितके दक्षिणेतले अदूर गोपालकृष्णन वा गिरीश कासारवल्ली आदी दिग्दर्शक परिचित असत नाहीत आणि आता चित्रपटांची प्रचंड उपलब्धता असण्याच्या काळातही त्यांचे चित्रपट सर्वदूर पोहोचलेले नसतात. फिल्म सोसायटी चळवळ वा चित्रपट महोत्सवांतूनच या नावांची चर्चा होते व त्या वर्तुळापुरतेच त्यांचे काम व महत्त्व मर्यादित राहते. त्यांचे महत्त्व अधोरेखित करणारे अभ्यासपूर्ण लेखनही विरळाच आहे. या पार्श्वभूमीवर गणेश मतकरी यांचे गिरीश कासारवल्ली यांच्याविषयीचे ‘सीर ऑफ कन्टेम्पररी हिस्ट्री : गिरीश कासारवल्ली अ‍ॅण्ड हिज सिनेमा’ (Seer of Contemporary History:  Girish Kasarvalii and His Cine) हे इंग्रजी पुस्तक उल्लेखनीय आहे.

चित्रपट समीक्षक म्हणून गणेश मतकरी मराठीत सुपरिचित आहेत. मराठी-हिंदी आणि हॉलीवूडसह देशविदेशांतील चित्रपटांवर व दिग्दर्शकांवर त्यांनी मराठीत विस्तृत लेखन केले आहे. राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या अभ्यासवृत्तीअंतर्गत त्यांनी लिहिलेल्या उपरोक्त इंग्रजी पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले. गिरीश कासारवल्ली यांच्याविषयी इंग्रजीत अवघी चारच पुस्तके उपलब्ध आहेत. त्यात या पुस्तकाने उल्लेखनीय भर घातली आहे.  व्यावसायिकतेच्या मुख्य प्रवाहातून स्वत:ची वेगळी वाट शोधत विकसित झालेला भारतीय कलात्मक चित्रपटांचा प्रवाह आणि त्याच्या अवघ्या दुसऱ्या पिढीत स्वत:चा ठसा निर्माण करणारे कासारवल्ली यांचा आलेख मांडणारा हा मोनोग्राफ आहे.  

प्रस्तुत पुस्तकाचे पहिले प्रकरण प्रास्ताविकवजा आहे. त्यात कासारवल्ली यांच्या चरित्राचे आवश्यक ते संदर्भ घेत नि कन्नडातील कलापरंपरा तसेच वाङ्मयीन व चित्रपट सृष्टीतील वातावरणाची व एकूणच सांस्कृतिक विश्वाची पार्श्वभूमी मांडत त्यांच्या चित्रपट कारकीर्दीची एक बृहद् चौकट उभी केली आहे. कासारवल्ली यांनी पुण्यातल्या फिल्म इन्स्टिटय़ूटमध्ये विद्यार्थी म्हणून केलेल्या डिप्लोमा फिल्मसह आजतागायत एकूण १४ पूर्ण लांबीचे कथात्म चित्रपट, दोन माहितीपट आणि एक दूरचित्रवाणी माध्यमासाठीची मालिका – असा मोठा ऐवज निर्माण केला आहे. आणि त्यांचा एक चित्रपट सध्या निर्माणाधीनही आहे. कालानुक्रम आणि तपशिलांचा निव्वळ आढावा व जंत्री टाळून  या  पुस्तकात त्यांच्या प्रमुख कथात्म चित्रपटांचे आशयसूत्रांनुसार वर्गीकरण करून त्यांचे विस्तृत विश्लेषण करणारी स्वतंत्र प्रकरणे योजली आहेत. कासारवल्ली यांचे सुरुवातीच्या टप्प्यावरील चित्रपट – घटश्राद्ध, ताबारन कथे, माने / एक घर, क्रौर्य –  हे विविध व्यवस्था आणि त्यांच्या ऱ्हासाचे चित्रण करणारे आहेत. मुखवटय़ाचा रूपकात्मक वापर करणारा बन्नड वेशा हा चित्रपट, स्त्रीजीवनाचे संदर्भ मांडणारे झ्र् ताई साहेबा, द्विपा आणि हसिना – हे चित्रपट, नयी नेरालु, गुलाबी टॉकिज, कानसेम्बा कुडुरेयानेरी हे कासारवल्ली यांच्या एकुण कारकीर्दीला नवीन परिमाण देणारे चित्रपट, आणि कूर्मावतार हा मुखवटय़ाचाच आधुनिक संदर्भात- गांधीजींची भूमिका करणाऱ्या एका नटाच्या संदर्भात, शोध घेणारा चित्रपट – अशा आशयानुसारी वर्गीकरणांची पाच विविध प्रकरणे कासारवल्ली यांच्या चित्रपटांतील आशयसूत्रांचा, त्यांतील गुंतागुंतीचा व परस्परसंबंधांचा नेमकेपणाने धांडोळा घेणारी आहेत. सहसा भारतीय संदर्भातील चित्रपटविषयक पुस्तकांत कथानक व त्या अनुषंगाने आशयसूत्रांचीच चर्चा अधिक केलेली असते. वाङ्मयीन समीक्षेच्या संकल्पना आणि परिभाषेतून एतद्देशीय चित्रपट समीक्षा  पूर्णपणे मोकळी झालेली नाही, असाच त्याचा अर्थ आहे. परंतु हे पुस्तक या मर्यादा ओलांडून पुढे जाते.

गिरीश कासारवल्ली यांच्या चित्रपटांतील विविध कथनरूपे उलगडताना त्यांतील दृश्यरचना, ध्वनिरचना, सामाजिक – सांस्कृतिक संदर्भ या सर्वाचे परस्परसंबंध व त्या अनुषंगाने केलेले विश्लेषण एकीकडे चित्रपट माध्यमाबद्दलचे आकलन वाढवणारेही आहे आणि कासारवल्ली यांचे य माध्यमातील कामही नेमकेपणाने  अधोरेखित करणारे आहे. कासारवल्ली यांच्या चित्रपटांतील दृश्यप्रतिमा, त्यांतून उभे राहणारे दृश्यविश्व – त्यांतील वास्तववाद, काही मोजक्या प्रसंगांतील अतिवास्तववाद, सांस्कृतिक प्रतीकांचा कासारवल्ली यांनी केलेला सघन असा वापर, छायाप्रकाशाचा खेळ असो की पावसाचे कोसळणे या आणि अशा दृश्यांनी साधलेले कलात्मक परिणाम आणि हे सगळे आशयसूत्रांना  कसे ठळक करते, याचीही विस्तृत चर्चा वरील पाच प्रकरणांतून केली आहे.

कासारवल्ली यांच्यावर समृद्ध अशा कन्नड वाङ्मयीन परंपरेचा गहिरा प्रभाव आहे. त्यांचे बहुतेक चित्रपट कथात्म साहित्यावर आधारित आहेत. बहुतेक चित्रपटांच्या पटकथाही खुद्द कासारवल्ली यांनीच लिहिल्या आहेत. पण हे करताना ते तो ऐवज जसाच्या तसा स्वीकारत नाहीत. किंबहुना ते मूळ  कथानक हा त्यांच्या पटकथेचा उत्थानिबदू असतो. प्रसंगांची दृश्यहाताळणी त्याला अधिक अर्थघन करते. या बाबतीत कासारवल्ली यांच्यावर जागतिक दिग्दर्शकांच्या महान कलाकृतींतून साकारलेल्या वास्तववादी प्रवाहाचा प्रभाव आहे. पण या मातीतली अस्सल पात्रे, त्यांची व्यवस्थेतील होरपळ, व्यवस्थेपुढील एकाकीपण, पात्रांच्या आंतरसंबंधांतील वा मनोविश्वातील गुंतागुंत मांडणारी कथानके, त्याला नेमकेपणा देणारी याच मातीतील सांस्कृतिक प्रतीके आणि या सर्वातून साधलेले व्यवस्थेवरचे चित्रपटीय भाष्य  ही गिरीश कासारवल्ली यांची दिग्दर्शक म्हणून असलेली वैशिष्टय़े  त्यांना भारतीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही मास्टर ऑफ सिनेमा या संज्ञेला पात्र करतात. प्रस्तुत पुस्तक त्याची उचित दखल घेत गिरीश कासारवल्ली यांनी साकारलेला ऑतेअर सिनेमा ठसठशीतपणे पुढे आणते. दिग्दर्शकाचा अभ्यास म्हणून हे पुस्तक एक विश्लेषणाचा एक वस्तुपाठ आहेच पण कासारवल्ली यांच्या कामाची विस्तृत दखल म्हणूनही या पुस्तकाचे महत्त्व आहे.

उपरोक्त अनेक वैशिष्टय़ांबाबत कासारवल्ली सत्यजीत राय यांच्या परंपरेशी आपली कन्नड नाळ जोडतात. सत्यजीत राय काळाचा – त्यातील सामाजिक-सांस्कृतिक स्थित्यंतराचा एक मोठा ऐतिहासिक पट आपल्या चित्रपटांतून मांडतात. तसे कासारवल्लीही स्वातंत्र्योत्तर काळातील आपली समकालीन व्यवस्था मांडतानाच त्याच्या क्रमश: होत जाणाऱ्या ऱ्हासाचा साक्षीदार असलेला सामान्य माणूस पुढे आणतात, नव्हे त्या ऱ्हासपर्वाच्या संदर्भचौकटीतच सामान्य माणसाचे जगणे आपल्या चित्रपटांतून मांडतात. या अर्थाने पुस्तकाचे शीर्षकही नेमके आहे.

कन्नड भाषेतील उत्तम साहित्य भाषांतराच्या माध्यमातून मराठीत अवतरले आहे. त्यामुळे शिवराम कारंथ, यू. आर. अनंतमूर्ती, एस. एल. भैरप्पा, गिरीश कर्नाड ही कन्नड साहित्यातील उत्तुंग नावे मराठी विश्वाला सुपरिचित आहेत. तसे कासारवल्ली यांचे कलाविश्व मराठीला परिचित होण्यासाठी गणेश मतकरी यांचे हे पुस्तक मराठीतही येणे तितकेच गरजेचे आहे.

सीर ऑफ कन्टेम्पररी हिस्ट्री : गिरीश कासारवल्ली अ‍ॅण्ड हिज सिनेमा

लेखक :  गणेश मतकरी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रकाशक: प्रकाशन विभाग, भारत सरकारपृष्ठे : १३५;  किंमत : २१५ रुपये