कर्नाटकातील धारवाड शहरात प्रसिद्धीपासून दूर राहत जीए कुलकर्णी यांनी आपल्या सकस आणि दर्जेदार कथांनी मराठी साहित्य समृद्ध केले. त्यालाही आणि जीए आपल्यातून जाऊनही आता बरीच वर्षे उलटली. याच धारवाडच्या कर्नाटक विद्यापीठात अध्यापन करीत कानडी भाषेतील समीक्षेत महत्त्वाची भर घालणारे एसएम वृषभेंद्र स्वामी हेही जीएंप्रमाणेच प्रसिद्धिपराङ्मुख. अनुवादित साहित्याची आवड असणाऱ्यांना कानडीतील द. रा. बेंद्रे, शिवराम कारंथ, मास्ती व्यंकटेश अय्यंगार, भैरप्पा, अनंतमूर्ती, गिरीश कार्नाड ही नावे, यांचे साहित्य मराठी भाषेत उपलब्ध असल्याने चांगली परिचयाची आहेत. स्वामी यांना कथा-कादंबऱ्या लिहिण्यात रस नव्हताच. ते होते समीक्षक आणि अध्यापक.
बेल्लारी जिल्ह्य़ातील अय्यानहळ्ळी येथे १९२८ मध्ये त्यांचा जन्म झाला. म्हैसूर येथील महाराजा विद्यापीठातून त्यांनी पदवी मिळविली. नंतर म्हैसूर विद्यापीठातून त्यांनी कन्नड भाषेत एम.ए. केले. या परीक्षेत ते सुवर्णपदकाचेही मानकरी ठरले. मग साहजिकच १९६१ मध्ये ते कर्नाटक विद्यापीठात रुजू झाले आणि कन्नड भाषा विभागाचे प्रमुख म्हणून निवृत्त झाले. या काळात त्यांची १८ पुस्तके प्रसिद्ध झाली असून ती समीक्षा वा संपादनाच्या रूपात आहेत. कन्नडमधील पहिले ज्ञानपीठ पुरस्कारविजेते साहित्यिक म्हणजे कुप्पली वेंकय्या पुट्टपा. नाटक, कादंबरी, काव्य, समीक्षा या क्षेत्रांतील त्यांची कामगिरी अजोड मानली जाते. या के व्ही पुट्टपा यांचा स्वामी यांच्यावर खूप प्रभाव होता. पुट्टपा यांचे समग्र साहित्य आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर अधिकारवाणीने भाष्य करू शकणारे म्हणून स्वामी यांचा लौकिक होता. पुट्टपा यांच्या साहित्याचा आढावा घेणाऱ्या ग्रंथाचे संपादन त्यांनी केले, जे खूप गाजले. कन्नड भाषा शिकण्याची आवड विद्यार्थ्यांत निर्माण व्हावी यासाठी त्यांनी क्रमिक पुस्तकांमध्ये कालानुरूप बदल केले. जुन्या साहित्यिकांबरोबरच तरुणांचेही साहित्य त्यांनी आवर्जून अभ्यासक्रमात समाविष्ट केले. साहित्य क्षेत्रात होत असलेल्या बदलांचीही ते नोंद घेत असत. पाठय़पुस्तके निश्चित करण्यासाठी असलेल्या अभ्यास मंडळाचे ते प्रदीर्घ काळ अध्यक्ष होते.
स्वामी यांचे खास वैशिष्टय़ म्हणजे व्याख्याने ऐकण्याची आवड. कोणताही विषय त्यांना वज्र्य नव्हता. आणि ऐकलेले प्रत्येक भाषण ते ध्वनिमुद्रित करीत. अशा हजारो व्याख्यानांचा खजिना त्यांच्याकडे होता व तो सर्वासाठी खुलाही होता. विद्यार्थ्यांना सतत मार्गदर्शन करीत राहणारे प्रा. स्वामी यांचे ८८ व्या वर्षी बुधवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा आणि ज्ञानपीठ पुरस्कारविजेते चंद्रशेखर कम्बार यांच्यासारखे अनेक शिष्य आहेत.