प्रपंच आणि उपासना या दोघांमध्ये संतुलन राखून जीवन आध्यात्मिक ध्येयासाठीच पूर्ण समर्पित कसं करता येतं, याचा वस्तुपाठ घालून देणं हे ज्ञानी माणसाचं कर्तव्य माउली सांगतात. सद्गुरूंच्या जीवनात आपल्याला हाच वस्तुपाठ पाहता येतो. प्रपंचातली प्रत्येक कृती हे सद्गुरू भगवद्भावनेनंच करीत असतात, त्यामुळे त्यांच्या लहानशा कृतीलाही दिव्यत्वाचा स्पर्श असतो. प्रकृतीच्या कारणास्तव स्वामी स्वरूपानंद हे देसायांच्या घरी राहात होते. मात्र आपल्या आईबाबतची तसेच देसायांच्या घराविषयीची कर्तव्यंही त्यांनी अगदी सहजतेनं पार पाडली होती. त्यात कसलंही अवडंबर नव्हतं आणि खरा सद्गुरू असाच असतो हो! त्याला ओळखणं कठीण, हेच त्याचं पहिलं लक्षण असतं! एकदा स्वामींची महती ऐकून एक जण त्यांच्या दर्शनासाठी म्हणून पावसला प्रथमच गेला. देसायांचा आंब्याचा व्यवसाय तेव्हा वाढत होता आणि अंगणात आंब्याच्या पेटय़ा भरण्याचं काम सुरू होतं. स्वामीही खोक्यावर नाव घालण्याचं काम करीत होते. त्या व्यक्तीनं स्वामींनाच सांगितलं की, मी स्वरूपानंद यांच्या दर्शनासाठी आलो आहे! स्वामींनी त्यांना बसायला सांगितलं, हातातलं काम संपवलं आणि मग त्यांच्यासमोर येत म्हणाले, ‘‘बोला, मीच स्वरूपानंद!’’ तेव्हा इतक्या साधेपणानं वावरणाऱ्या स्वामींना पाहून तो माणूस थक्कच झाला. स्वामी मुलांना पाढे शिकवायचे, त्यांचा अभ्यास घ्यायचे, घरातल्या स्त्रियांना स्तोत्र शिकवायचे, कौटुंबिक बाबतीत सल्लाही द्यायचे, पण सगळ्यात असून कशातच नसल्यासारखे केवळ सोऽहं भावात निमग्न असायचे. खरा सद्गुरू हा असाच असतो. जो स्वत: पसाऱ्यात गुंतला आहे, तो माझा पसारा कसा संपवील? जो स्वत: भौतिकाच्या प्रेमात आहे तो मला आसक्तीतून कसं सोडवील? जो स्वत: डामडौलातच रमतो, तो मला सहज जगायला कसं शिकवील? तेव्हा सहजता, साधेपणा, पण सदोदित परमतत्त्वात एकलयता हीच सद्गुरूंची लक्षणं असतात. स्वामींचं तत्त्वज्ञान अगदी साधंसोपं होतं. शरीरव्याधींनी गांजलेल्या एका स्त्रीस एकदा ते म्हणाले होते की, ‘‘घरातील कामकाज करीत असताना अंतरी देवाचं स्मरण असावं. आपण आनंदात जन्मलो, आनंदात जगायचं आणि आनंदातच विलीन व्हायचं’’ (स्वामी स्वरूपानंद स्मृतीसौरभ, पृ. २१). स्वामी जसं सहजतेनं आणि साधेपणानं जगायचे, तसंच आपल्या माणसांनीही अवडंबर आणि पसारा न वाढवता जगावं, असं त्यांना वाटे. कमल तथा माई पंडित लिहितात: मिळकतीपेक्षा उगाचच जास्त गरजा वाढवून अवास्तव खर्च करणं स्वामींना पसंत नसे. ज्यांना पाचशे रुपयांत घरखर्च भागवणं शक्य नसे त्यांना स्वामीजी विचारायचे, ‘‘ज्यांचे शंभर रुपयेच मासिक उत्पन्न आहे, ते कसा संसार करीत असतील?’’ (स्वामी स्वरूपानंद स्मृतीसौरभ, पृ. १९). साधकांना ते व्यावहारिक सल्लाही बोलण्याच्या ओघात देत, पण त्याचा हेतू साधकानं व्यवहारात तरबेज व्हावं हा नसे, तर उलट व्यवहार आटोपशीर कसा राखावा आणि मुख्य म्हणजे त्याचा हेतू काय असावा, याची जाण देणं, हा असे!
संग्रहित लेख, दिनांक 12th Aug 2014 रोजी प्रकाशित
१५७. वस्तुपाठ -१
प्रपंच आणि उपासना या दोघांमध्ये संतुलन राखून जीवन आध्यात्मिक ध्येयासाठीच पूर्ण समर्पित कसं करता येतं, याचा वस्तुपाठ घालून देणं हे ज्ञानी माणसाचं कर्तव्य माउली सांगतात.
First published on: 12-08-2014 at 01:01 IST
मराठीतील सर्व विचारमंच बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Spiritual life and worship