वाद्यमेळाचा आलम सारा..

तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे नंतरच्या काळात चित्रपटांतील गीते स्वतंत्रपणे ध्वनिमुद्रित करता येऊ लागल्याने पार्श्वगायन व संगीत शक्य झाले.

मुकुंद संगोराम mukund.sangoram@expressindia.com

वाद्यमेळातून संगीतनिर्मिती, त्यासाठी स्वरलिपीत लिहिलेली संहिता आणि त्याबरहुकूम संगीत या पाश्चात्त्य संकल्पना आपल्याकडे चित्रपट-संगीताच्या दारातून आल्या आणि व्हायोलिन, अ‍ॅकॉर्डियन, पियानोसारख्या वाद्यांची वाटही त्यांनी खुली केली.. याचा अप्रत्यक्ष, अदृश्य परिणाम  रागदारी संगीतावर कसा झाला?

लोकसंगीतातून एकल संगीताकडे प्रवास झालेल्या भारतीय संगीत परंपरेत वाद्यमेळाला अभिजात संगीतात स्थान मिळण्याचे कारणच नव्हते. एकाच वेळी अनेक गायक-वादकांच्या प्रतिभांनी फुलणारे संगीत अशी भारतीय संगीताची ओळख नव्हतीच कधी. पाश्चात्त्य संगीतात संगीत निर्माण करणाऱ्या कलावंताची प्रतिभा कायमच महत्त्वाची राहिली. संगीत लिहून ठेवण्याच्या पद्धतीमुळे संगीत निर्मात्याच्या प्रतिभेने तयार केलेल्या संगीतात बदल करणे, निषिद्ध मानले जाण्याची परंपरा तेथे निर्माण झाली. त्यामुळे संगीत निर्मिती संगीतकाराच्या नावानेच ओळखली जात राहिली. अनेक वाद्यांचा समावेश करून एका नव्या नादाची निर्मिती हे पाश्चात्त्य संगीताचे ठळक वैशिष्टय़. तर भारतीय संगीताने प्रत्येक वाद्याला त्याचे स्वतंत्र अस्तित्व प्राप्त करून दिले. स्वरवाद्यांनी तर संगीत व्यक्त करण्यासाठी गायन परंपरेच्या बाहेर पडून स्वत:ची पद्धत विकसित केली. त्यामुळे गायनाला समांतर अशी वाद्य संगीताची नवी परंपरा संपन्न होत गेली. एकल म्हणजे एकटय़ानेच सादर करण्याच्या संगीतात आवश्यकतेपुरते स्वरसान्निध्य मिळवण्यासाठी संगत करणारी मोजकीच वाद्ये राहिली. तालवाद्य हे तर भारतीय संगीतातील अविभाज्य अंग. तालाने संगीताला आकृतिबंध म्हणजे चौकट प्राप्त करून दिली. त्यातून सम हा सौंदर्यनिर्मितीच्या परिपूर्तीचा क्षणही निर्माण झाला. त्याने गायन आणि वादनात नव्या सौंदर्यखुणेची भरच पडली. एकाच वेळी अनेक वाद्ये वापरून नवनादाची संकल्पना पाश्चात्त्यांमधील सर्जनशील कलावंतांनी मांडली, तेव्हा त्यातील प्रत्येक वाद्यवादकाची त्या वाद्यावरील कमालीची हुकूमत गृहीत धरली गेली. जे संगीत लिहून ठेवले आहे, ते जसेच्या तसेच पुन:पुन्हा सादर करणे आणि सौंदर्याचा तोच तो अनुभव पुन:पुन्हा घेणे ही त्या संगीताच्या श्रवणातील महत्त्वाची गोष्ट राहिली. भारतीय अभिजात संगीतात प्रत्येक वाद्यावरील कलावंताची हुकूमत त्याच्या सर्जनाच्या आविष्कारासाठी होती. वाद्य हे त्याच्या प्रतिभा निर्मितीचे साधनच राहिले. संगीत प्रत्येक वेळी नव्याने व्यक्त करण्यासाठी ते आवश्यकच. अशाही स्थितीत पाश्चात्त्य संगीताचा भारतीय अवकाशात प्रवेश होणे अपरिहार्य होतेच. त्यामुळे या संगीताचा उपयोग करण्यासाठी नव्या व्यवस्थेची गरज होती. भारतीय चित्रपटांनी ती पूर्ण केली.

गाणी हवीच!

चित्रपट संगीत ही भारतीय सांगीतिक अवकाशातील नवी लोकपरंपरा. सर्वस्वी नव्या प्रचंड क्षमता असलेल्या माध्यमाच्या आविष्काराने आणि त्याच्या लोकप्रियतेमुळे, चित्रपटांनी संगीत सर्वतोमुखी पोहोचवले. १९३१ मध्ये आर्देशीर इराणी यांनी ‘आलमआरा’ हा पहिला बोलपट तयार केला. त्यामध्ये सात गाणी होती. त्याच वर्षांत आलेल्या जमशेदजी फ्रामजी मदन यांच्या ‘शिरीन फरहाद’ या चित्रपटात ४२ गाणी होती. त्या काळात लोकप्रिय असलेल्या अभिजात संगीताच्या आधाराने चित्रपट संगीत फुलत राहिले. चित्रपटाचे चित्रीकरण सुरू असतानाच गाणेही चित्रित करणे आवश्यक ठरल्याने गाता गळा असणाऱ्यालाच चित्रपटात अभिनय करावा लागणे भाग होते.

तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे नंतरच्या काळात चित्रपटांतील गीते स्वतंत्रपणे ध्वनिमुद्रित करता येऊ लागल्याने पार्श्वगायन व संगीत शक्य झाले. तोपर्यंत अभिजात संगीतातील लोकप्रिय ठरलेल्या बंदिशी किंवा लोकसंगीतातील धुना यांचाच प्रभाव चित्रपटातील संगीतावर राहाणे स्वाभाविक होते. मुळात संगीत ही भारतीय जीवनपद्धतीतील केंद्रस्थानी असणारी कला असल्याने त्याचे रुपेरी अवतरण कोणालाच फारसे खटकणारे नव्हते. त्यापूर्वी संगीत नाटकामुळे संवाद सुरू असताना अभिनेत्यांनी अचानक नाटय़पद गाऊ लागण्याचा कुणालाच त्रास झाला नाही. त्यामुळे चित्रपटात गाणी येणे ही परंपरेने आलेलीच घटना ठरली.

या संगीताचा पोहोच प्रचंड प्रमाणात होऊ लागल्याने (१९३४ पासूनच चित्रपट गीतांच्या ध्वनिमुद्रिका प्रकाशित होऊ लागल्या आणि ती गीते सर्वदूर पसरलेल्या तसेच सामान्यांच्या आवाक्यात असलेल्या नभोवाणीसारख्या माध्यमामुळे जनसामान्यांपर्यंत पोहोचू लागली.) भारतीय संगीतासाठी ही अतिशय महत्त्वाची गोष्ट ठरली.

पाश्चात्त्य वाद्यांचा प्रवेश

संगीताच्या प्रांतात चित्रपट संगीताने मन्वंतर घडवले. मनोरंजनाच्या बाहेर जाऊन संगीत ही एक उपयोजित कला झाली. व्यवसाय म्हणून संगीताच्या या प्रांताला भरभराटीचे दिवस येऊ लागले. त्यातून संगीतकार, गायक, वादक यांचा नवा समूह या संगीताच्या उद्योगात आपली सर्जनशीलता पणाला लावू लागला. अभिजात संगीताला समांतर राहिलेल्या या नव्या संगीताने तेव्हाही संगीताच्या मैफलींवर आक्रमण केले नाही. त्या मैफलीत नेहमीचीच मोजकी वर्दळ राहिली. त्यातील जाणत्यांना, रसिकांना त्या रागदारी संगीताची असलेली भुरळ जराही कमी झाली नाही. याचे कारण त्या संगीतात तेव्हाच्या अनेक नव्या कलावंतांनी नवोन्मेषाची दिवेलागण केली. त्यातून तेही संगीत निराळ्या पातळीवर आपले अस्तित्व टिकवून राहिले. भारतीय स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या एक-दोन दशकात चित्रपट संगीतात हळूहळू पाश्चात्त्य संगीतातील वाद्यांनी प्रवेश केला. त्याने या संगीताला नवी खुमारी प्राप्त झाली. त्याच्या लोकप्रियतेत भर पडली आणि भारतीय सांस्कृतिक विश्वात या नव्या संगीत प्रकाराला उदंड यश मिळू लागले. इतके की, चित्रपट संगीत ही एक स्वतंत्र ओळख झाली. चित्रपट न पाहताही त्या संगीताचा स्वतंत्रपणे आस्वाद घेण्याची रसिकता निर्माण करण्याची शक्ती त्यामध्ये होती. हा नवा अध्याय संगीताच्या व्यावसायिक वृद्धीला पोषक ठरला आणि संगीताच्या श्रवण परंपरेतही त्याने मोठे बदल घडवून आणले. अवघ्या तीन मिनिटांत सादर होणारे गीत, त्यातील शब्द, सांगीतिक रचना, सुरेलपणा, वाद्यमेळ यामुळे स्वतंत्र अस्तित्व प्राप्त करू लागले. संगीतकारांसाठी, सामान्यांची नव्याने अभिरुची घडवण्याचे ते मोठे आव्हान होते. ध्वनिमुद्रित असल्याने त्यात बदल घडणे शक्य नव्हते. त्यामुळे ते गोळीबंद असणे आवश्यक होते. चित्रकला आणि चित्रपटाप्रमाणे एकदाच घडणारी ही कलाकृती रसिकांपर्यंत पोहोचताना त्यातील प्रत्येक बारीकसारीक गोष्ट परिपूर्ण असणे अत्यावश्यक होते. अभिजात संगीतात एक मैफल रंगली नाही, तरीही पुढच्या मैफलीचे आव्हान उभे ठाकलेले असते. येथे तसे घडत नाही. त्यामुळे त्यामध्ये सहभागी असलेल्या प्रत्येक कलावंताने आपले सर्वस्व ओतणे महत्त्वाचे. परंपरागत बंदिशींवर आधारित चित्रपट गीते ही प्रारंभीच्या काळातील स्थिती नंतरच्या काळात बदलत गेली. बासरी, सारंगी, सतार, सरोद, संतूर, तबला, ढोलक, पखवाज यांची जागा नव्या वाद्यांनी घेतली. अकॉर्डियन, व्हायोलीन, व्हायोला, बोंगो, कोंगो, सिंथेसायझर अशी नवी वाद्ये चित्रपट संगीताचा अविभाज्य भाग बनली. त्यामुळे भारतीय नादपरंपरेत नव्या नादांची भर पडली आणि त्याने हे संगीत अधिक समृद्ध होत गेली.

भावदर्शनाची अभिजातता

या उपयोजित (अप्लाइड) संगीताला आर्थिक उलाढालीचे आव्हान होते. रसिकांचे कान पकडून ठेवण्याची अटीतटीची स्पर्धा होती. सतत नवनवे प्रयोग करत राहून, श्रोत्यांची आवडनिवड बदलत ठेवण्याची आणि श्रवणसौंदर्याला नवनादाने बहरून टाकण्याची उन्मेषी जिद्द होती. चित्रपट संगीतातील तरलता, भावनांची अभिव्यक्ती, त्यातील नेमकेपणा यामुळे हे संगीत प्रचंड प्रमाणात लोकप्रिय झाले. आनंद, कारुण्य, क्लेश यांसारख्या भावना स्वरांच्या चिमटीत पकडण्याची ताकद या संगीताने निर्माण केली. अभिजात संगीतातील रागदारी गायन-वादन परंपरेवर त्याचा परिणाम होणे स्वाभाविक होते. हा बदल अदृश्य होता. ठाय, म्हणजे संथ लयीतून ते हळूहळू बाहेर पडले. त्याचा विस्तीर्ण अवकाश आकुंचित झाला. त्यातील भावाला महत्त्व मिळू लागले. वाद्यसंगीतात तबलजीबरोबर केलेली जुगलबंदी रसिकांना आकर्षित करू लागली. बंदिशीच्या स्वरवाक्यातील रंजकता वाढली. ज्या अभिजात संगीताने चित्रपट संगीताच्या उगमस्थानी आधार दिला, ते अभिजात संगीत नकळत का होईना, चित्रपट संगीताच्या प्रभावाने संथपणे बदलू लागले. श्रोत्यांच्या स्वरसौंदर्याच्या कल्पना जसजशा बदलत गेल्या, तसे अभिजात संगीतही कात टाकून नवे प्रयोग करू लागले. असे प्रयोग यापूर्वीच्या दीर्घ काळात सातत्याने होत राहिले, म्हणूनच तर रागसंगीत काळानुरूप बदलत गेले.

चित्रपट संगीताचा हा प्रभाव संगीताला अधिक पोषक ठरला असावा. गेल्या सात दशकांत झालेला हा बदल सहज लक्षात येणारा आणि त्यामुळेच रसिकतेला सातत्याने साद घालणारा. या काळातील दिग्गज कलावंतांनी संगीतातील अभिजातता जराही ढळू न देता, ते आजही टवटवीत राहिले, याचे कारण त्यांनी आपली सारी प्रज्ञा या बदलांसाठी पणाला लावली. त्यांचे हे श्रेय आणि ऋण नाकारता न येणारे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व स्वरावकाश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Orchestral music classical music orchestra article about creation of music zws

Next Story
.. तरीही संगीत ‘हिंदूुस्तानी’!
ताज्या बातम्या