मोक्षाच्या सर्वोच्च अनुभवापर्यंत जिवाला नेणारा हा अनुक्रम कुठून सुरू होतो? तो बद्ध स्थितीपासून सुरू होतो. बद्ध कसा असतो, याची आपल्या सर्वाना अनुभवसिद्ध जाणीव आहेच. अर्जुनानंही प्रभूंना सांगितलं की, प्रभो, तुम्ही जे ज्ञान दिलंत ते पूर्वी नारदांनीही कित्येक वेळा सांगितलं होतं, पण ते उमगलं नव्हतं! नुसते शब्दच ऐकले होते, भजनातला त्यांचा स्वरच ऐकला होता. त्यांचा अर्थ, त्या स्वरामागचा भाव तेव्हा भिडतच नव्हता. का? माउली सांगतात, ‘‘विषयविषाचा पडिपाडु। गोड परमार्थ लागे कडू। कडु विषय तो गोडू। जीवासि जाहला।।’’(अध्याय १०, ओवी १५९). भवविषयांचं सामथ्र्य एवढं आहे की त्यात रममाण असलेल्या आम्हाला गोड असलेला परमार्थ हा कडू लागतो आणि प्रत्यक्षात कडू असलेला विषय गोड भासतो! आपण आजारी पडलो तर जीभ कडू होते आणि प्रत्यक्षात गोड असलेला पदार्थही कडू लागू लागतो. अगदी त्याचप्रमाणे भवरोगानं ग्रासल्यानं गोड परमार्थही कडूच भासत आहे. नव्हे तो निर्थकही भासत आहे! समर्थानीही दासबोधाच्या पाचव्या दशकातील सातव्या समासात बद्धाची अनेकानेक लक्षणं सांगितली आहेत. त्यातील काही ओव्या अशा- न कळें कैसें तें बंधन। न कळे मुक्तीचें लक्षण। न कळे वस्तु विलक्षण। या नाव बद्ध।। परमार्थाविषईं अज्ञान। प्रपंचाचें उदंड ज्ञान। नेणें स्वयें समाधान। या नाव बद्ध।। काया वाचा आणि मन। चित्त वित्त जीव प्राण। द्रव्यदारेचें करी भजन। या नाव बद्ध।। द्रव्य दारा तेंचि तीर्थ। द्रव्य दारा तो चि परमार्थ। द्रव्य दारा सकळ स्वार्थ। म्हणे तो बद्ध।। वेर्थ जाऊं नेदी काळ। संसारचिंता सर्वकाळ। कथा वार्ता ते चि सकळ। या नाव बद्ध।। जागृति स्वप्न रात्रि दिवस। ऐसा लागला विषयेध्यास। नाहीं क्षणाचा अवकाश। या नाव बद्ध।। ही सगळी आपलीच लक्षणं आहेत, त्यामुळे त्यांचा आपल्याला अनुभव आहे. तरी ती पाहू. कसा असतो हा बद्ध म्हणजे आपण? तर आपल्याला आपण बंधनात आहोत, हेच मुळी माहीत नाही. मग सुटकेच्या प्रयत्नांची जाणीव होणं तर दूरच. बंधन म्हणजे काय, हे माहीत नाही. मुक्तीचं लक्षण माहीत नाही. विलक्षण वस्तू म्हणजे जो परमात्मा त्याचीही जाणीव नाही. परमार्थाविषयी उदंड अज्ञान आहे, पण प्रपंचाविषयी उदंड ज्ञान आहे, असा आपला गैरसमज असतो. त्या प्रापंचिक ज्ञानानं समाधान काही लाभलेलं नाही. काया, वाचा आणि मनानं तसंच चित्त, वित्त, जीव आणि प्राण समर्पून आपण द्रव्य म्हणजे भौतिक संपदा तसेच दारा म्हणजे आपल्या मनाच्या सर्व वैषयिक ओढींची पूर्तता करणारे भौतिकातले आधार यांनाच भजण्यात आपण दंग आहोत. उलट या भौतिकाची जपणूक आणि विकास, विस्तार हाच परमार्थ आहे, असा आपला सिद्धांत आहे! संसाराच्या चिंतेत तो अखंड मग्न आहे, इतका की दुसरा कसला विचार करून तो एक क्षणदेखील वाया घालवत नाही! संसाराचीच चिंता आणि चर्चा तो सदोदित करतो. दिवस असो की रात्र असो, जागा असो की झोपलेला, विषयध्यासापुढे त्याला क्षणभराचीही उसंत नाही!
संग्रहित लेख, दिनांक 29th May 2014 रोजी प्रकाशित
१०५. बद्ध
मोक्षाच्या सर्वोच्च अनुभवापर्यंत जिवाला नेणारा हा अनुक्रम कुठून सुरू होतो? तो बद्ध स्थितीपासून सुरू होतो. बद्ध कसा असतो, याची आपल्या सर्वाना अनुभवसिद्ध जाणीव आहेच.
First published on: 29-05-2014 at 02:34 IST
मराठीतील सर्व विचारमंच बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Swaroop chintan 105 spirituality