देहच मी, ही जाणीव आपल्या अंतरंगात जन्मापासून घट्ट आहे. जन्मल्यानंतर आपल्याला जे नाव ठेवलं गेलं त्याच्याशी आपण एकरूप आहोत. आपलं नाव आणि आपला देह म्हणजेच ‘मी’ ही ओळख पक्की होण्यासाठी आपण कोणताही जप केला नाही, कोणताही योग साधला नाही, कोणतीही ज्ञानोपासना केली नाही, ग्रंथ धुंडाळले नाहीत की तपश्चर्या केली नाही. काहीही न करतादेखील देह-नामालाच ‘मी’ मानण्याची सवय आपल्या हाडीमांसी पक्की रुजली आहे. त्या जागी देह म्हणजे ‘मी’ नव्हे, मी तर परमात्म्याचाच अंश, आत्मस्वरूप हेच माझं खरं स्वरूप आहे, हे नुसत्या घोकणीनं अगदी खरं वाटणं शक्य आहे का? स्वरूपाची ओळख नसताना, नव्हे आपलं खरं स्वरूप कसं आहे, याचा संतांनी दिलेला दाखलादेखील अनुभवाअभावी अगदी खरा वाटत नसताना देहनामाच्या ओळखीला ओलांडून खऱ्या स्वरूपाचा साक्षात्कार करून घेणं आणि त्याचं भान मनात रुजवणं शक्य आहे का? या घडीला आपल्याला ते शक्य वाटत नाही. मग एक तर सरळ मार्गानं जा म्हणजे थेट आत्मसाक्षात्कारासाठीच सर्व ते प्रयत्न कर किंवा आडमार्गानं जातच असशील तर सद्गुरूबोधाचा दीप हातात घेऊन जा म्हणजे धोका नाही, असं प्रभू सांगतात. त्यानंतर जो आडमार्गानं का होईना, म्हणजे मोह आणि भ्रमानं प्रपंचात भटकत असताना का होईना सद्गुरूबोधाचा दीप हातात धरून चालत असेल तर त्याला मग साधक कसं बनावं, हे सुचवताना प्रभू सांगतात, तयापरी पार्था स्वधर्मे राहाटता। सकळकामपूर्णता। सहजें होय।। पार्थिव म्हणजे जड. जड, स्थूल जगातील आसक्ती ज्याच्या मनातून पूर्णपणे गेलेली नाही त्याला प्रभू सांगत आहेत की, हे पार्था, हे पांथस्था साधक बनायचं तर स्वधर्मानुसार आचरण साधलं पाहिजे. हा स्वधर्म कोणता? तर स्वरूपी राहणे हाच स्वधर्म! देहासक्तीतून सुटून आत्मबुद्धीत रत होण्याचा प्रयत्न तुला केलाच पाहिजे. एकदा तसं झालं तर तू सर्व संकुचित इच्छांच्या ओढीतून सहज सुटशील आणि मग इतका व्यापक होशील की तुझी कोणतीही इच्छा अपूर्ण राहाणारच नाही. श्रीनिसर्गदत्त महाराज सांगत की, ‘‘इच्छेत काही गैर नाही, इच्छेचा संकुचितपणा गैर आहे. तुमची इच्छा इतकी व्यापक करा की ती तुम्हाला व्यापक व्हायला भाग पाडील!’’ मी देह नाही, मी परमात्म्याचाच अंश, माझं आत्मस्वरूप नित्य आहे, निराकार आहे, त्याचा साक्षात्कार मला झालाच पाहिजे, ही ती व्यापक इच्छा आहे! हा अनुभव नाही, इच्छा आहे. ही इच्छाच मग साधकाला व्यापक व्हायला प्रोत्साहित करील. अर्थात व्यापक होणं इतकं सोपं का आहे? पहिल्याच पायरीवर साधक अडखळतो. स्वरूपी राहण्याचा जो स्वधर्म त्याकडे नेणाऱ्या या पायऱ्या ‘ज्ञानेश्वरी नित्यपाठा’तील ९ आणि १० क्रमांकाच्या ओव्यांत सांगितल्या आहेत. या ओव्या अशा – सुखीं संतोषा न यावें। दु:खीं विषादा न भजावें। आणि लाभालाभ न धरावे। मनामाजीं।। आपणयां उचिता स्वधर्मे राहाटतां। जें पावे तें निवांता। साहोनि जावे।। (अध्याय २, ओव्या २२६, २२८). गेल्या भागातील स्वामींच्या बोधाच्या आधारे आता या ओव्यांचा विचार करू.