म्हणौनि जें जें उचित। आणि अवसरेंकरूनि प्राप्त। तें कर्म हेतुरहित। आचरें तू।। आता ‘अवसरेंकरूनि’ म्हणजे प्रसंगपरत्वे, प्रारब्धाच्या योगानं जे उचित कर्म वाटय़ाला आलं आहे, ते तू पार पाड. आता याच ओवीची आणखी एक छटा अशी आहे की, प्रसंग कसाही आला तरी, प्रारब्धानुसार वाटय़ाला काहीही आलं तरी त्या त्या प्रसंगात तू मात्र जे उचित वर्तन असेल तेच कर. उचित असंच वाग. आता हे उचित वर्तनही कसं करायचं आहे? तर ‘हेतूरहित’! इथे हेतू कोणता? साधारणत: कोणतंही कर्म माणूस सुरू करतो तेव्हा ते चांगल्या प्रकारे व्हावं, पूर्णत्वास जावं, हाच माणसाचा स्वाभाविक हेतू असतो. हा हेतूदेखील न ठेवता कर्म अधिक अचूकपणे कर, हा बोध आधीच्या ओव्यांत आपण पाहिलाच. (परि आदरिलें कर्म दैवें। जरी समाप्तीतें पावे। तरी विशेषें तेथ तोषावें। हें हि नको ।।१४।। कीं निमित्तें कोणे एके। तें सिद्धी न वचतां ठाके। तरी तेथीचेनि अपरितोखें। क्षोभावें ना।। १५।। ) त्यानुसार, एखादं कर्म पूर्ण झालं तरी आनंदून जाऊ नकोस किंवा काही निमित्तानं ते पूर्णत्वास गेलं नाही तरी दु:खी होऊ नकोस. म्हणजेच या ओव्याही हेतूरहित कर्मच सुचवतात. मग या ओवीतला हेतू कोणता? तर ‘मी’ला मोठेपणा मिळावा, हा प्रत्येक कर्मामागे माणसाचा जो मूळ स्वाभाविक हेतू असतो, त्या हेतूकडे इथे निर्देश आहे. उचित कर्म करच, पण त्यातून स्वत:ला मोठेपणा मिळावा, असा हेतू ठेवू नकोस. स्वामी स्वरूपानंद संकलित ‘ज्ञानेश्वरी नित्यपाठा’तील १७ ओव्यांचा परामर्श आपण आतापर्यंत घेतला. आता पुढील ओवी अशी आहे:
देखें अनुक्रमाधारें। स्वधर्म जो आचरे। तो मोक्ष तेणें व्यापारें। निश्चित पावे।।१८।। (अ. ३ / ८०)
प्रचलितार्थ : वर्णाश्रमधर्माप्रमाणे जो आपणास योग्य असलेल्या धर्माचे आचरण करतो त्याला त्या आचरणाने मोक्षाची प्राप्ती निश्चित होते.
विशेषार्थ व विवरण: आता स्वधर्माचं आचरण कसं करायचं? तर अनुक्रमाच्या आधाराने. इथे अनुक्रमचा अर्थ वर्णाश्रमधर्म असा लावला जातो. पण जर ‘स्वरूपी राहाणे हाचि स्वधर्म’ ही व्याख्या पठाण या मुस्लीम भक्ताला स्वामी स्वरूपानंद यांनीच सांगितली आहे, तर स्वरूपी राहणं या खऱ्या अस्सल स्वधर्मात चातुर्वण्र्य येईलच कसा आणि कुठून?  पठाण यांनी कोणत्या चातुर्वण्र्याचं पालन केलं होतं? भगवंतावरचं प्रेम ही काही एका धर्मापुरती गोष्ट नाही. प्रत्येक धर्मात श्रेष्ठ भक्त निर्माण झाले आहेत.   भगवंताच्या पूर्ण शरणागतीची कला अनेक धर्मातील अनेक सत्पुरुषांनी शिकवली आहे. त्यांनी कोणत्या चातुर्वण्र्याचं पालन केलं होतं?  उच्च-नीचतेवरून अनेक संतांना अन्यायाला सामोरं जावं लागलं. त्या काळी हीन ठरवल्या गेलेल्या संतांचं नाव आजही अजरामर आहे आणि ज्यांनी त्यांचा छळवाद मांडला होता त्यांचा मागमूसही शिल्लक नाही. मग ‘देहें त्यागिता किर्ती मागें उरावी।’ अशी क्रिया ज्यांनी जीवनभर आचरणात आणली त्यांनी कोणत्या वर्णाश्रमधर्माचं पालन केलं होतं? तेव्हा ‘अनुक्रमाधारें’ या शब्दाचा विशेषार्थ काही वेगळाच आहे हे निश्चित!