आपली ही चर्चा थोडी क्लिष्ट आहे, याची मला कल्पना आहे. स्वामी स्वरूपानंद यांच्या चरित्राचा स्पर्श या चिंतनाला कधी लागतो, यासाठीही अनेकजण उत्सुक आहेत, पण तरी ही चर्चा काहीशा तपशिलात आपण करीत आहोत. कारण एकदा पाया पक्का झाला की वर डौलदार इमारत बांधता येईल. तर पुन्हा ॐकडे वळू. ॐ हेच ब्रह्म आहे, असंही ऋषींनी म्हटलं आहे. कठोपनिषदात यमराज नचिकेताला सांगतात की, ‘‘सर्व वेद ज्या एका पदाचं माहात्म्य सांगतात, तपस्व्यांचं तप ज्या एका पदाच्या प्राप्तीनं पूर्ण होतं आणि ज्या पदाच्या प्राप्तीनं योगी विरक्त आणि त्यातच अनुरक्त होतो, ते पद अगदी थोडक्यात सांगायचं तर ॐ आहे. (ॐ इत्येतत्). हे अक्षरच ब्रह्म आहे.’’ तर ॐ म्हणजेच ब्रह्म आहे. आता ‘आद्या’चा मागोवा घेऊ. आद्या म्हणजे आधीपासूनचा. ही जी विराट सृष्टी आहे, तिच्याही आधीचा. माणसाला नेहमीच कुतूहल असतं की, ही विराट सृष्टी उत्पन्न तरी कशी झाली? ती आपोआप उत्पन्न झाली की तिचा कोणी निर्माता आहे? जर ही सृष्टी कोणी उत्पन्न केली असेल तर तिच्या आधीही तो असलाच पाहिजे. मग ही सृष्टी उत्पन्न होण्याआधी काय होतं? वेद, उपनिषदं आणि पुराणांत त्याचं वर्णन आहे. ‘न असद् आसीत् नो सद् आसीत् तदानी..’ ही विराट सृष्टी उत्पन्न होण्याच्या आधी काही अस्तित्वात होतं (सद्) असं नाही किंवा काहीच नव्हतं (असद्) असंही नाही. थोडक्यात काही अस्तित्वातही नव्हतं की कोणताही अभावदेखील नव्हता! तेव्हा वायूही नव्हता की आकाशही नव्हतं. मृत्यूही नव्हता की अमरत्वही नव्हतं. रात्रही नव्हती की दिवसही नव्हता. मग होतं काय? ‘आनीत अवातं स्वधया तत् एकं तस्मात् ह अन्यद् न पर: किंचन।’ त्या वेळी ते ‘एकमेवाद्वितीय तत्त्व’ अवात स्थितीत शासोच्छ्वास करीत होतं, त्याच्याशिवाय दुसरं काहीही नव्हतं! श्रीपाद कुलकर्णी यांनी ‘आनंद-तरंग’ (कॉन्टिनेन्टल प्रकाशन, पुणे) या ग्रंथात, या अवात स्थितीची सांगड विज्ञानाशी घातली आहे. ते म्हणतात- ‘‘अणू विज्ञानानंतर विज्ञानाने पुंजयामिक (quantum mechanics) ही शाखा विकसित केली. आपल्या ऋषींनी ‘अवात’ या मूळस्थितीचे केलेले वर्णन आणि क्वान्टम फिजिक्सचे ‘अवात’ अर्थात् vacuum या स्थितीचे केलेले वर्णन एकसमान आहे. त्यानुसार दोन फोटॉन्स (photons) किंवा पॉझिट्रॉन्स (positrons) आणि ऋण विद्युत्कण (electrons) या दोहोंचा संघर्ष घडतो वा घडवून आणला जातो, तेव्हा सर्व ऊर्जाकण नाहीसे होतात. या ‘नाहीसे होण्याच्या’ स्थितीला वैज्ञानिकांनी ‘अवात’ म्हटले आहे. ही स्थिती ‘काही नाही’ अशी नव्हे की ‘काही आहे’ अशीही नव्हे! ‘आहे’ किंवा ‘नाही’पेक्षा ‘अवात’ या शब्दानेच तिचे वर्णन होऊ शकते. या अवात स्थितीतूनच नव्या ऊर्जाकणांची उत्पत्ती होते.’’ म्हणजेच vacuum स्थितीतूनच नव्या ऊर्जाकणांची उत्पत्ती होते, जशी अवात स्थितीतून या विराट सृष्टीची उत्पत्ती झाली! पण या अवात स्थितीतही एक ‘एकमेवाद्वितीय तत्त्व’ श्वासोच्छ्वास करीत होते, हा ऋषींचा शोध आहे! या तत्त्वालाच त्यांनी परब्रह्म म्हणून संबोधित केलं.
संग्रहित लेख, दिनांक 9th Jan 2014 रोजी प्रकाशित
७. आद्या
आपली ही चर्चा थोडी क्लिष्ट आहे, याची मला कल्पना आहे. स्वामी स्वरूपानंद यांच्या चरित्राचा स्पर्श या चिंतनाला कधी लागतो, यासाठीही अनेकजण उत्सुक आहेत,
First published on: 09-01-2014 at 04:07 IST
मराठीतील सर्व विचारमंच बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Swaroop chintan curiosity of man