स्वकर्तृत्वाचा गर्व आमच्या अंतरंगात भिनला असतो. ‘मी केलं म्हणून’, ‘मी होतो म्हणून’, ‘तरी मी सांगत होतो’ अशी वाक्य काय दाखवतात? प्रत्यक्षात आमचं कर्तेपण, आमच्या कर्मामागचे हेतू आणि त्या कर्माच्या प्रयोजनाबद्दलचं आकलन हे अवास्तव, अज्ञानमूलक, भ्रामक असतं. कर्माची मर्यादा उमगत नसल्यानं गरज नसतानाही क्षुल्लक कर्मात आम्ही वाढ करीत राहातो. कर्माची पूर्ती होऊनही त्या कर्मात आणखी भर घालत राहातो. देहबुद्धीला नकोशी वाटणारी र्कम टाळण्यासाठी आपण प्रारब्धाच्या सिद्धांताचा वापर करतो. ‘त्याचं प्रारब्धच तसं आहे, मी तरी काय करणार?’ किंवा ‘माझ्या प्रारब्धातच नसेल तर प्रयत्न करून तरी काय उपयोग?’ असं आपण म्हणतो. देहबुद्धीला हवीशी वाटणारी र्कम हिरिरीनं करण्यासाठी आपण पुरुषार्थाच्या सिद्धांताचा वापर करतो. ‘कर्म का सुटणार आहे, मला ते केलंच पाहिजे’, ‘दैव अनुकूल असो-नसो पुरुषार्थ तर केलाच पाहिजे.’ तर अशी लेबलं आपण सोयीनं वापरतो. त्यामुळे खरं कर्तव्य कर्म कोणतं, त्या कर्माची मर्यादा काय, कोणत्या कर्माला किती महत्त्व द्यायचं, कोणत्या कर्माला अग्रक्रम द्यायचा; हे सर्व आमच्या अज्ञानमूलक, भ्रामक आंतरिक धारणांनुसार ठरतं. त्यामुळे जे आवडीचं आहे, प्रेयस आहे त्यासाठी चिकाटीनं परिश्रम होतात आणि जे नावडीचं, पण खऱ्या अर्थानं हिताचं, श्रेयस्कर आहे, त्यासाठी एक पाऊलही पुढे टाकवत नाही. अशा माझ्या जीवनात श्रीसद्गुरू प्रवेश करतात तेव्हा कर्मप्रवाहातला त्यांचा सहज आणि निर्भय वावर मला अचंबित करतो. वाटय़ाला आलेल्या कोणत्याही कर्माला ते अव्हेरत नाहीत (जया पुरुषाच्या ठायीं। कर्माचा तरी खेदु नाहीं।) आणि अमुक फळ मिळावं, या ओढीत बद्ध होऊनही ते कर्म करीत नाहीत (आणि फलापेक्षा कंहीं। संचरेना।।) कर्तेपणाच्या भावनेनंही ते कर्म करीत नाहीत (आणि हें कर्म मी करीन।) किंवा सुरू झालेलं कर्म पूर्णत्वास नेणारा ‘मी’च आहे, या भावानं ते कधी कर्माग्रहीही राहात नाहीत (अथवा आदरिलें सिद्धी नेईन। येणें संकल्पेंही जयाचें मन। विटाळे ना।।); असा हा सद्गुरू माझ्या जीवनात का येतो? तर अज्ञानमूलक कर्माच्या जंगलात फसलेल्या मला त्यातून बाहेर काढायला तो येतो. त्या जंगलात भ्रम-भ्रांतीचा झाडोरा माजला आहे. आसक्तीचे असंख्य डेरेदार वृक्ष आहेत. त्यावर मोहाच्या वेली-लता लगडल्या आहेत. द्वैताचे तण माजले आहेत. संकल्प-विकल्पांचा पाचोळा साचला आहे. अशा या निबीड जंगलात ज्ञानाग्नीचा वणवाच पेटावा लागतो. मगच अज्ञानमूलक र्कम नष्ट होतात. मग प्रत्येक कर्म हे त्यांच्या बोधानुरूप, त्यांच्यासाठीच होऊ लागतं. त्या कर्मामधली ‘मी’ पणाची ओढ, आसक्तीची त्या वणव्यात राख होऊ लागते. परमेश्वर इच्छेवर सारं काही सोडून जीव पूर्वीपेक्षा अधिक नेमकेपणानं कार्यरत होतो, पण त्या कर्मातून नव्या कर्मसाखळीचं बीज उत्पन्न होत नाही (ज्ञानाग्नीचेनि मुखें। जेणें जाळिलीं कर्मे अशेखें।) ही अत्यंत व्यापक प्रक्रिया पार पाडणाऱ्या सद्गुरूचंच वर्णन माउली करतात, तो परब्रह्मचि मनुष्यवेखें। वोळख तूं।।