स्वामी स्वरूपानंद संपादित ‘ज्ञानेश्वरी नित्यपाठा’तील ज्या दोन ओव्यांचे विवरण आपण आता पाहाणार आहोत, त्या ओव्या अशा :
तैसें हृदय प्रसन्न होये। तरी दु:ख कैचें कें आहे। तेथ आपैसी बुद्धि राहे। परमात्मरूपीं।। ४२।। (अ. २ / ३४०). जैसा निर्वातींचा दीपु। सर्वथा नेणे कंपु। तैसा स्थिरबुद्धि स्वस्वरूपु। योगयुक्त ।। ४३।। (अ. २ / ३४१).
विशेषार्थ विवरण: या दोन ओव्यांचा अर्थ नीट उकलण्यासाठी ‘नित्यपाठा’तील आधीच्या ३८ ते ४१ या ओव्याही लक्षात घ्या. माउली काय म्हणतात? मनुष्य त्याच्या प्रारब्धानुसार विशिष्ट समाजात, विशिष्ट स्थानी, विशिष्ट परिस्थितीत जन्माला येतो. त्यामुळे त्याची कर्तव्यर्कमही त्यानुसारच ठरली आहेत. त्या कर्तव्यकर्माना टाळून जगणं कुणालाही शक्य नाही. याचाच अर्थ माणसाला देहाच्या आधारे व्यवहारात वावरावंच लागतं, व्यवहार पार पाडावाच लागतो. अर्थात कुठेही वावरत असलो तरी चित्त कुठे ठेवायचं, याचं स्वातंत्र्य माणसाला आहे. मनुष्य जन्माचा हेतू आत्मकल्याण, परमात्मप्राप्ती हाच आहे. त्यामुळे व्यवहारात वावरत असतानाही चित्त, मन, बुद्धी परम तत्त्वाच्या बोधातच राखली पाहिजे. देह जगात वावरत असला तरी अंतर्मनाची बैठक मोडता कामा नये. ती परमात्म्याशी एकरूप असली पाहिजे. (देह तरी वरिचिलीकडे। आपुलिया परी हिंडे। परि बैसका न मोडे। मानसींची।।). आता माणसाला दोन गोष्टींची देणगी आहे. पहिली गोष्ट म्हणजे मन आणि दुसरी गोष्ट म्हणजे बुद्धी. या दोहोंच्याही दोन पातळ्या आहेत. स्थूल मन आणि सूक्ष्म मन तसेच स्थूल बुद्धी आणि सूक्ष्म बुद्धी. माणसाचं जगणं भौतिकाच्या प्रभावाखाली असतं तेव्हा त्याचं स्थूल मन आणि स्थूल बुद्धी जोमानं कार्यरत असतात. त्यातही माणूस बुद्धीनुसार वागतो, असं वाटत असलं तरी प्रत्यक्षात स्थूल मनात वेळोवेळी उठणाऱ्या ऊर्मीनुसारच माणूस वागतो आणि त्याची स्थूल बुद्धी त्या वर्तनाच्या समर्थनाच्या वकिलीपुरती राबत असते, असंच दिसतं. मनाच्या ओढींनुरूप बुद्धी राबत असल्याने आणि त्यातून अनेकदा विपरीतच प्रसंग घडत असल्याने मन, बुद्धी आणि अर्थातच त्यामुळे चित्तही अशांत असते. या जंजाळातून सुटण्यासाठी सूक्ष्म मन आणि सूक्ष्म बुद्धी जागी व्हावी लागते.  प्रत्येकात ही सूक्ष्म बुद्धी आहे, पण तिच्यावर देहबुद्धीचा थर साचला आहे. त्याखाली दबलेली ही सूक्ष्म बुद्धी जोवर प्रकट होत नाही, तोवर माणसाचं जीवन स्थूल बुद्धीनुसार देहभावाच्या कचाटय़ातच असतं.   स्थूल बुद्धीच्या जागी सूक्ष्म बुद्धी स्थापित होणं सोपं नसतं. त्यासाठी सद्गुरूबोधाचा आधार आणि त्या बोधानुरूप आचरण, हाच एकमात्र उपाय असतो. त्या आधारानेच सूक्ष्म मन आणि सूक्ष्म बुद्धी जागी होते. देहभावानुसार उठणाऱ्या ऊर्मीबाबत सूक्ष्म मन सजगपणे जाणीव करून देते, सूक्ष्म बुद्धी त्या ऊर्मीनुसार होणारी फरपट थांबवते. जेव्हा याप्रमाणे मन आणि बुद्धीचे ऐक्य होते तेव्हाच चित्तात समतोल निर्माण होतो. हेच योगाचं सार आहे. (अर्जुना समत्व चित्ताचें। तें चि सार जाण योगाचें। जेथ मन आणि बुद्धीचें। ऐक्य आथी।।).