विराट वृक्ष आहे, तर मुळं असलीच पाहिजेत. मुळं दिसत नाहीत म्हणजे ती नाहीत, असं कसं म्हणता येईल? झाडानं विचार केला की, जर मुळातूनच मी आलो म्हणतात तर मग मला ती दिसलीच पाहिजेत, तर तेही कसं शक्य आहे? पण मुळंच जर सुकली तर झाडही सुकेल. जगणार नाही. तसाच अदृश्य परमात्म्याचा आधार क्षीण होत सुटला तर जीवनही शुष्क होत जाईल. तो आधार कसा पकडता येतो, हे शिकविण्यासाठीच तर श्रीसद्गुरू आले आहेत. ते मनुष्यरूपात समोर येतात म्हणून मी त्यांच्याशी मनुष्यभावानंच वागू लागतो. मनुष्यमात्राचे गुण-दोष त्यांच्यावर थोपू लागतो. सहवासानं हळूहळू त्यांचं विशेषत्व मला समजू लागतं, पण त्यांची खरी ओळख काही मला झाली नसते. त्यांची खरी ओळख ज्याला परमतत्त्वाची जाण आहे, त्यालाच होते. चराचरातही त्यांचंच त्याला दर्शन होतं. याच आशयाची स्वामी स्वरूपानंद संकलित ‘ज्ञानेश्वरी नित्यपाठा’तली पुढली ओवी पाहू. ही ओवी अशी- या उपाधिमाजी गुप्त। चैतन्य असे सर्वगत। तें तत्त्वज्ञ संत। स्वीकारिती।।५।। (अ. २ / १२६)
प्रचलितार्थ : या देहादि प्रपंचामध्ये सर्वत्र चैतन्य गुप्त रूपाने आहे. तत्त्वज्ञ संत ते ओळखून त्याचेच ग्रहण करतात.
विशेषार्थ : सद्गुरू विशिष्ट देह धारण करून माझ्या जीवनात आले आहेत. देहबुद्धीच्या प्रभावानं जसं मी स्वत:ला देहच मानतो त्याचप्रमाणे सद्गुरूंच्या देहालाच सद्गुरू मानतो. त्यामुळे त्यांना एका विशिष्ट आकारापुरतंच मर्यादित करतो. प्रत्यक्षात ज्या देहाच्या माध्यमातून, ज्या देहाच्या उपाधीद्वारे ते माझ्यासमोर प्रकटले आहेत त्या देहामध्ये सर्वव्यापी असं चैतन्यच भरून आहे. त्याची ओळख मला नाही, पण परमतत्त्वाचं ज्ञान झालेले जे संत आहेत त्यांनाच सद्गुरूंच्या खऱ्या स्वरूपाची ओळख आहे. त्या चैतन्य स्वरूपाचाच ते स्वीकार करतात.
विवरण : ‘मज हृदयी सद्गुरू’नंतर स्वामी स्वरूपानंद यांनी ही ओवी योजल्यानं त्या ओवीशीच हिची जोडणी आहे. आधीच्या ओवीचा मथितार्थ काय होता? तर, श्रीसद्गुरूंना मी हृदयात धारण केलं, सद्गुरूंनी माझं हृदय व्याप्त आहे, याची जाण मला आली. त्यामुळे माझ्या जीवनात विवेक आला. योग्य काय, अयोग्य काय, याची जाण आली. एवढंच नव्हे तर केवळ सद्गुरूंनाच हृदयात स्थान असल्यानं, जे योग्य आहे, ते स्वीकारण्याचं आणि जे अयोग्य आहे ते नाकारण्याचं मानसिक बळही माझ्यात आलं. हे सद्गुरू देहाची उपाधी घेऊन माझ्यासमोर आले आहेत. आकारात आले आहेत. देहाचं पांघरूण घेऊन आले आहेत. त्या उपाधीवरूनच मी त्यांना ओळखतो. ते उंच आहेत, ते गोरे आहेत, ते धिप्पाड आहेत, ते अमुक तऱ्हेचं वस्त्र नेसतात, ते अमुक प्रकारचं गंध लावतात.. या सर्व उपाधींनाच मी त्यांची ओळख मानतो, त्यांचं स्वरूप मानतो. सद्गुरू ज्या देहाच्या उपाधीत, ज्या देहाच्या माध्यमातून प्रकटले आहेत त्या उपाधीमध्ये खरं तर सर्वगत, सर्वव्यापी असं चैतन्यच भरून आहे. परमतत्त्व जाणणारे संतच त्यांचं खरं स्वरूप जाणतात. नुसतं जाणत नाहीत, तर त्याचा स्वीकारही करतात!