श्री आणि शारदा, अर्थात भौतिक संपदा आणि आत्मिक संपदा या दोन्हीचा प्रभाव साधकाच्या आयुष्यात प्राथमिक टप्प्यावर असतो. सर्वसामान्य माणसावर भौतिकाचा प्रभाव मोठा असतोच. भौतिक संपन्नतेला त्याच्या लेखी सर्वाधिक महत्त्व असतं. साधकाला आत्मिक उन्नतीची ओढ लागलेली असते, पण त्याच्यावरचा भौतिकाचा प्रभाव पूर्णपणे ओसरलेला नसतो. भौतिकात किंचितही कमी-अधिक झालं तरी आपल्या वृत्तीत पालट होतो, या जाणिवेनंही तो व्यथित असतो, पण त्यावर उपाय काय, हे त्याला उमगत नसतं. साधकाच्या वतीने श्री आणि शारदा या दोन्ही शक्तिरूपांना नमन करून या द्वैताच्या महापुरातून वाट काढण्याचा, तरून जाण्याचा एकमेव उपाय कोणता, हे स्वामी स्वरूपानंद ‘ज्ञानेश्वरी नित्यपाठा’तील पुढील चौथ्या ओवीतून सांगतात. ती ओवी अशी :
मज हृदयीं सद्गुरू। जेणें तारिलों हा संसारपूरू। म्हणौनि विशेषें अत्यादरू। विवेकावरी।।४।। (१/२२)
प्रचलितार्थ:  ज्यांनी मला या संसारपुरातून तारिले, ते सद्गुरू माझ्या हृदयात आहेत, म्हणून माझे विवेकावर फार प्रेम आहे.
विशेषार्थ:  ज्यांच्यामुळे संसाराच्या महापुरातून तरून जाता येते त्या श्रीसद्गुरूंना मी हृदयात धारण केले त्या योगे विवेकाबद्दल मला विशेष अत्यादर आहे. अर्थात माझ्या जगण्याला विवेकाचा पाया आहे.
विशेषार्थ विवरण:  संसाराचा पूर आहे. संसार म्हणजे क्षणोक्षणी बदलणारा. जे जन्माला येतं, त्याला अंत आहे. जे आकारात येतं त्याला वाढ, घट, झीज आणि नाश अटळ आहे. परिस्थिती बदलत राहाते आणि त्या परिस्थितीच्या प्रभावात कैद असणाऱ्या माणसांच्या प्रतिक्रियाही बदलतात. त्यामुळेच आयुष्यात परिस्थिती एकसारखी राहात नाही तशीच माणसांची वर्तणूकही एकसारखी राहात नाही. माणसाला या बदलाची भीती वाटते! आपण स्वत: कालानुरूप, परिस्थितीनुरूप, वयानुरूप बदलत जातो, ते आपल्याला स्वाभाविक वाटतं, पण दुसऱ्या माणसांच्यातला बदल आणि तोही आपल्याला प्रतिकूल असेल तर, आपल्याला सहन होत नाही. तेव्हा माणूस संसाराच्या या सततच्या बदलत्या स्वरूपाला घाबरतो. जगणं कायमचं सुखाचं असावं, अशी त्याला एकमात्र आस असते. सुखाची त्याची व्याख्या मात्र दु:खालाच धरून असते. दु:खाचा अभाव म्हणजेच सुख असं तो मानत असतो. जीवन मात्र एखाद्या महापुराच्या वेगानं वाहात आहे. संत यालाच भवसागर म्हणतात. भव म्हणजे इच्छा. ‘अमुक व्हावं’, ‘अमुक होऊ नये’, या इच्छेच्या दोन वर्गवारीतच माणसाच्या समस्त इच्छांचा पसारा विभागला गेला असतो. या इच्छांच्या पकडीतून माणूस कधीच मुक्त होत नाही. अर्थात संसाराच्या या महापुरातून तरून जात नाही. हे तरणं किंवा भवसागर पार होणं त्यालाच साधेल जो हवं-नकोपणाच्या इच्छेच्या प्रभावातून मुक्त होऊ शकेल. हे साधणं काय सोपं आहे? निश्चितच नाही. ते साधायचं तर या इच्छांचा उगम जिथे असतो, या इच्छांची मुळं जिथं पसरली असतात त्या हृदयातच श्रीसद्गुरूंनाच स्थानापन्न करावं लागेल!