सद्गुरूच्या बोधानुरूप जीवन घडवायचं तर साधकानं प्रवृत्तीचं दास्य सोडून निवृत्तीचं दास्य पत्करायला पाहिजे, असं माऊली सांगतात. ही निवृत्ती म्हणजे निष्क्रियता मात्र नव्हे! प्रापंचिक जबाबदाऱ्या वाऱ्यावर सोडून देणं नव्हे. सद्गुरू साधकाच्या जगण्याची बाह्य़ चौकट फारशी बदलत नाहीत ते त्याची जीवनदृष्टी बदलतात. त्याचं बाह्य़ जग आहे तसंच राहतं फक्त आंतरिक जग अधिक भावसंपन्न होतं. स्वामी स्वरूपानंदही सांगतात, ‘‘जन्मोनि संसारीं साधावें स्व-हित। ठेवोनियां चित्त भगवंतीं।। भगवंतीं चित्त ठेवोनि सर्वदा। सुखें करीं धंदा-व्यवहार।। धंदा व्यवहार ओघासी जो आला। पाहिजे तो केला दक्षपणें।। दक्षपणें लक्ष लावोनि अंतरीं। चिंतावा श्रीहरि भक्तिभावें।। भक्तिभावें करी हरीचें चिंतन। तया समर्पून सर्व कर्मे।। कर्मबंधांतून होऊन तो मुक्त। साधितो स्व-हित स्वामी म्हणे।।’’ (स्वरूप पत्र मंजुषा/ पद १). या संसारात आपण का आलो आहोत? तर खरं स्व-हित साधण्यासाठी आलो आहोत. खरं स्वहित कोणतं, हे कळण्यासाठी खरा स्व कळला पाहिजे. भौतिक सांभाळण्याचा, जपण्याचा आणि जोपासण्याचा प्रयत्न म्हणजे खरं स्वहित साधणं नव्हे. माझा देह हा साधन आहे. त्यामुळे त्या साधनाची योग्य निगा राखणं, तो जपणं आवश्यक आहे, पण त्याचा हेतू देहसुखापुरता नसावा. आत्मसुखाकरताच मला साधनमात्र असलेला देह आणि भौतिक सांभाळायचं आहे. मी श्रीमंत असेनही किंवा होईनही, पण त्या श्रीमंतीच्या प्रभावात न अडकता मला खऱ्या स्वहितासाठीच जगलं पाहिजे. त्यासाठी काय करायला पाहिजे? तर चित्त भगवंताकडे ठेवलं पाहिजे आणि देहानं माझी जी काही नोकरीचाकरी आहे, व्यवसाय आहे तो आणि प्रपंचाचा व्यवहार, प्रपंचातली कर्तव्यं ही दक्षपणे केली पाहिजेत. आता हे दक्षपण म्हणजे काय? तर अंतरंगातील श्रीहरीकडे दक्षतापूर्वक लक्ष ठेवून जगात वाटय़ाला आलेला सर्व व्यवहार करणं, हीच खरी दक्षता आहे! मग व्यवहारात, कर्मात अडकलेलं मन भगवंताच्या भक्तीनं, चिंतनानं भरून जाईल आणि हळूहळू सारी कर्मे भगवद्भावानं करू लागेल. भगवंताची इच्छा म्हणून करू लागेल. भगवंताला समर्पित होऊन करू लागेल. अशी स्थिती ज्याला साधेल तोच सर्व कर्मे करीत असतानाही कर्मपाशांतून खऱ्या अर्थानं मुक्त होईल. तोच खरं स्व-हित साधून घेईल, असं स्वामी सांगतात. याचाच अर्थ निवृत्ती म्हणजे कर्तव्यकर्माचा त्याग नव्हे. नि: चा अर्थ रहित. निवृत्त म्हणजे वृत्तीरहित. अर्थात चित्तवृत्तीनं त्या कर्मात न गुंतता ते कर्म अचूकपणे पार पाडून त्यातून मोकळं होणं. स्वामी सांगतात, ‘‘निर्वातींचा दीप तेवतो निवांत। तैसें राहो चित्त सर्वकाळ।। आला गेला मेघ उदास गगन। तैसें राहो मन सुख-दु:खीं।। स्वामी म्हणे सदा असावें संतुष्ट। स्व-रूपीं प्रविष्ट होवोनियां।।’’ (संजीवनी गाथा). स्वरूपात मन प्रविष्ट झालं की वृत्तीचं वारं थांबेल. मग आत्मदीप स्थिरपणे तेवत राहील. आकाशात ढग येतात नि जातात. ढगामागे आकाश वाहवत जात नाही. तसं मनाकाशात वृत्तींचे ढग येतील नि जातील. मन स्थिर राहील. निवृत्तीच्या दास्यानं हे साधतं!