राजकीय बंडाळीच्या नावाखाली मार्च २०११ पासून सीरियात सुरू झालेला यादवी रक्तपात थांबण्याची आशा पुन्हा मावळली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या जीनिव्हा कार्यालयात झालेल्या सीरिया-वाटाघाटींची दुसरी फेरीदेखील अपेशीच ठरल्याने सीरियात माणसे मरत किंवा घरेदारे सोडून परागंदा होत राहणार आणि रशिया, अमेरिका तसेच ब्रिटन, फ्रान्स आदी देश मरत्या सीरियनांना कोरडी सहानुभूती दाखवत ठपकेबाजीचा मुख्य खेळ पुढे खेळत राहणार, हेही शनिवारीच स्पष्ट झालेले आहे. सीरियातील परिस्थिती इतकी हाताबाहेर गेली आहे की, संयुक्त राष्ट्र मानवी हक्क आयोगासारखी यंत्रणाही एक लाख बळींनंतर ‘आम्हाला अधिकृत आकडा कळेनासा झाला असून तूर्त आम्ही तेथील जीवितहानीची आकडेवारी देऊ शकत नाही’ अशी टेकीला आली आहे. अशा स्थितीत, हा आकडा आता १ लाख ४० हजारांवर गेल्याचे सांगणाऱ्या अनधिकृत गटांवर विश्वास ठेवावा लागतो. सीरियाच्या सत्तेला चिकटून राहिलेले राष्ट्राध्यक्ष बशर असद यांच्या फौजांनीच माणसे अधिक मारली, असे हे गट जेव्हा सांगतात, तेव्हा मात्र त्यावर विश्वास का ठेवावा असा प्रश्न पडावा, इतका हिंसाचार सीरियन बंडखोरांच्या हिंसक तुकडय़ांनी केला आहे. अशा हिंसक गटांचा सहभाग संयुक्त राष्ट्रांच्या पुढाकाराने झालेल्या वाटाघाटींत, दुसऱ्या फेरीतही नव्हताच. त्याऐवजी मवाळ समजले जाणारे असद-विरोधक जीनिव्हात आले होते आणि त्यांनाच, ‘आधी दहशतवाद थांबवा, त्याखेरीज आम्ही बोलणार नाही’ अशा अटी असद यांच्या सरकारचे प्रतिनिधी घालत होते. दहशतवाद थांबवण्याची समजा लेखी हमीच हे मवाळ देते, तरी त्यांचे ऐकतो कोण? सरकारने दोन पावले मागे आले पाहिजे, हंगामी सरकारकडे सूत्रे सोपवून सत्ता सोडण्याची तयारी बशर असद यांनी दाखवली पाहिजे अशा स्वप्नाळू मागण्या हे विरोधी प्रतिनिधी करत राहिले. सीरियातील असद-विरोध प्रचंड आहे, हे दिसतेच आहे. हॉम्स शहराची पंचक्रोशी एखाद्या संहारभूमीसारखीच उरली असून आता तर यारबूद शहपर्यंत हिंसा पोहोचली आहे, अशी अवघड स्थिती. एवढे होऊनही बडे देश एकमेकांवर आरोप करण्यात धन्यता मानतात, याचे कारण सीरियात असलेले- किंवा असावयास हवे असलेले- या देशांचे हितसंबंध. रशियाची प्रचंड गुंतवणूक सीरियाच्या तेलखाणींमध्ये आहे आणि त्याचा अपरिहार्य फटका म्हणूनच बंडखोरी जोरात आहे. याच बंडखोरीवर उपाय म्हणून अमेरिकेला असद यांच्याऐवजी निराळे, हवेतर हंगामीसुद्धा सरकार आवश्यक वाटते आणि तेवढे एक काम झाले की मग, ‘सीरियातील उद्योगक्षेत्राला जगाशी मुक्तसंपर्कात येऊ देऊन’ त्याद्वारे तेथील शांतता दृढमूल करण्याचे अमेरिकी धोरण तयारही आहे आणि सर्वज्ञातही. अमेरिकी डॉलराधारित जागतिकीकरण आणि अमेरिकी इंधन-हितसंबंधांच्या बदल्यात अनेक आखाती देशांमध्ये नांदणारी शांतता, यांच्या प्रयोगासाठी सीरियाचा रंगमंच अमेरिकेला खुणावतो आहे. हंगामी सरकार ही कल्पना कशी भुक्कड आहे आणि प्रत्यक्षात सीरियातील विरोधकांना राजकीय चेहराच नसून ते दहशतवादी आहेत, असे रशिया सांगत राहणार; तर सीरियन लोकांची महाशोकांतिका होत असताना सत्तापदी राहणारे बशर असद हे दडपशाहीनेच वागताहेत, असा प्रचार अमेरिका आणि त्यांची दोस्तराष्ट्रे करीत राहणार. रशियन परराष्ट्रमंत्र्यांना कोणत्याही अमेरिकी पदस्थाने थेट उत्तर द्यायचेच नाही, परस्पर बिगरसरकारी संस्थांकडून किंवा अन्य प्रतिनिधींकडून रशियावर दोषारोप करायचा, अशी एक नीती या दोस्तराष्ट्रांनी पाळली असल्याने ही आर्थिक हितसंबंधांची लढाई राजकीय पातळीला जाणार नाही. वाटाघाटींच्या फेऱ्या वाढवून असद-समर्थकांची दडपशाही सतत उघडी पाडण्याचा खेळ यापुढेही रंगत जाईल.
संग्रहित लेख, दिनांक 17th Feb 2014 रोजी प्रकाशित
हितसंबंधांच्या फेऱ्यात सीरिया
राजकीय बंडाळीच्या नावाखाली मार्च २०११ पासून सीरियात सुरू झालेला यादवी रक्तपात थांबण्याची आशा पुन्हा मावळली आहे.
First published on: 17-02-2014 at 01:40 IST
मराठीतील सर्व अन्वयार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Syria crisis is grotesque getting dramatically worse