देखणेपणाची ओळख निवृत्तीनंतर लोकांपुढे न येता कायम ठेवणाऱ्या आणि रूपापेक्षा अभिनय गुणांसाठी लक्षात राहणाऱ्या सुचित्रा सेन हिंदीऐवजी बंगाली चित्रपटसृष्टीतच रमल्या. हिंदीत चार-सहा चित्रपट त्यांनी केले, पण तेवढय़ानेही त्यांचे गारूड कायम राहिले..
नाही म्हणायला नावावर एकुणात साठेक चित्रपट; त्यातही बंगाली चित्रपटांची संख्या पन्नासच्या वर. रुपेरी पडद्यावरून निवृत्त होऊनही उणीपुरी पस्तीस वर्षे झालेली. तरीही सुचित्रा सेन या नावाभोवतीचे गारूड कुतूहलानेच भारलेले राहिले. १९७८मध्ये चित्रपटाच्या पडद्यावरून सहजपणे निवृत्ती स्वीकारल्यानंतर जगाकडे पाठ फिरवलेल्या सुचित्रा सेन काळाच्या पडद्याआड गेल्या, तरी त्यांच्यातील तारका मनोरंजनाच्या आकाशात तळपतीच राहिली. न दिसताही असे तळपणे फार कमी जणांच्या भाग्यात असते. सुचित्रा सेन या अशा भाग्यवंतांतील. गुलजार यांच्या ‘आँधी’ या चित्रपटात त्या दिसल्या आणि त्यांच्या भोवतीचे वलय अधिकच गहनगहिरे झाले. खरे तर त्यापूर्वी दोन दशके आधी सुचित्रा सेन यांनी ‘देवदास’ या हिंदी चित्रपटात वैजयंतीमालाच्या बरोबरीने अभिनय केला होता. दिलीपकुमारसारख्या त्या वेळच्या कसलेल्या अभिनेत्यासमोर त्यांची व्यक्तिरेखा उठून दिसली, याचे कारण केवळ देखणेपणात नव्हते. त्यांच्यातील अभिनयसंपन्नतेने सगळ्यांना जिंकून घेतले आणि चित्रपटसृष्टीतल्या प्रत्येकाला त्याचीच भुरळ पडली. राष्ट्रीय पातळीवरील अभिनयाचे पारितोषिक हिंदीतील पदार्पणातच काबीज केल्यानंतरही त्यांना हिंदी चित्रपटांत रमावेसे का वाटले नसावे, असा प्रश्न आजही अनेकांना भेडसावतो. नंतर आलेल्या ‘आँधी’ चित्रपटातील त्यांच्या संयत अभिनयाने त्यांच्यावरचा लोभ आणखीनच वाढला. इंदिरा गांधी यांच्या व्यक्तिमत्त्वाशी साधम्र्य असलेल्या (कादंबरीचे लेखक कमलेश्वर आणि चित्रपटकार गुलजार यांच्या मते ती व्यक्तिरेखा तारकेश्वरी सिन्हा यांच्यावर बेतलेली होती!) त्या भूमिकेने सेन यांच्या अभिनयाची उंची कळून आली आणि कलात्मकतेचेही अप्रतिम दर्शन झाले.    
बंगालीत उत्तमकुमार-सुचित्रा सेनची जोडी १९५०च्या दशकावर राज्य करीत होती. अविचल, विचारी बंगाली पुरुष आणि चंचल, अबोध बंगाली स्त्री ही इतिहासदत्त मनोवैशिष्टय़े स्वातंत्र्योत्तर काळात कशी जपायची, हा बंगाली प्रश्न या जोडीने सोडवून टाकला.. एकदा नव्हे, अनेकदा. आधुनिक काळाचे प्रश्न ग्रासताहेत, तरीही संस्कार सोडायचे नाहीत हे बंगाली सिनेमांचे (किंवा खरे तर बंगाली भद्रलोकांच्या ज्या दांभिकपणावर पुढे टीका होत राहिली, त्याचेही) सूत्र या दोघांच्या समीकरणातून मांडले गेले. उत्तमकुमार हा रोमँटिक नायक, त्याची नायिका म्हणून आधी सुचित्रा सेनकडे पाहिले जाई. पण या जोडीचे पुढले अनेक चित्रपट नायिकाप्रधान आहेत. ‘तिच्या’ त्यागाची, तिच्या प्रेमाच्या शुद्धतेची, तिच्या फरपटीची कहाणी सांगणारे आहेत. ‘सप्तपदी’ हा या नायिकाप्रधान चित्रपटांचा कळसाध्याय ठरावा. या चित्रपटात सुचित्रा सेन यांची भूमिका एका अँग्लोइंडियन तरुणीची. ही इंग्रजाळ बंगाली बोलणारी, डान्स आणि पाटर्य़ात रमणारी बॉबकटवाली नायिका बंगाली नायक शोभणाऱ्या उत्तमकुमारला ‘बफून’ वगैरे विशेषणे लावून हिणवते. पण पुढे त्याच्या प्रेमात पडते आणि त्याचे वडील त्याला ‘तूच माझा सहारा आहेस’  असे म्हणताच त्याच्या मार्गातून आपणहून दूर होण्याचा निर्णय घेते. यानंतरचे तिचे आयुष्य उद्ध्वस्त, दारूत बुडालेले.. डॉक्टर झालेला नायकच तिला पुन्हा भेटतो, तिचे प्राण वाचवतो, तेव्हा ती पळून जाते. हे सारे, ‘देवदास’मधल्या मर्यादशील ‘पारो’च्या अगदी उलट. ही पारो सुचित्रा सेन यांनी दोनदा वठविली. हिंदीच्या आधी बंगालीत, उत्तमकुमारसह.
 बंगाली चित्रपटांमध्ये अनेक प्रकारच्या भूमिका करणाऱ्या सुचित्रा सेन या तिथल्या प्रत्येकाच्या जगण्याचे कारण आणि प्रेरणा ठरल्या. अगदी नवरात्रीतल्या देवीचे मुखवटेही त्यांवर बेतले जाऊ लागले. एखादी ‘कशी दिसते?’ या प्रश्नाचे उत्तर जर ‘सुचित्रा सेनसारखी’ असे आले, तरच सार्थक वाटण्याचा तो काळ. हे तारांकित आयुष्य सांभाळताना करावी लागणारी कसरत सुचित्रा सेन यांनी फार कसबाने केली. उत्तमकुमार यांच्याबरोबरच्या लाघवी संबंधांबद्दलच्या चर्वितचर्वणास कधीही उत्तर न देता आपले आयुष्य खासगी ठेवण्यात त्यांना यश आले. कारण त्यांच्या व्यक्तिमत्त्वातच एक प्रकारची अनाकलनीय गूढता होती. समाजातल्या प्रत्येकाला आपल्यासारखे व्हायचे आहे, म्हणून आपण त्यांचे देव व्हावे, असे त्यांना कधीही वाटले नाही. म्हणूनच त्यांची मूर्तिपूजा करणाऱ्यांना त्या कधीच प्रसन्न झाल्या नाहीत. बंगालीतल्या चित्रपटविषयक नियतकालिकांमध्येही अभावाने दिसणारी ही नायिका, तरीही प्रत्येकाच्या हृदयात घर करून राहिली. अभिनयात आणि जगण्यातही एक प्रकारची अभिजातता सांभाळण्याची ताकद त्यांच्यामध्ये नसती, तर कदाचित असे घडले नसते! सुचित्रा सेन यांची तुलना अनेक हिंदी अभिनेत्रींशी झाली. नर्गीस आणि सुचित्रा सेन यांच्यात डावे-उजवे ठरवणे कठीण असल्याची दाद त्या काळच्या तमाम बंगाली आणि हिंदी समीक्षकांनी दिली. पण आमच्या सुचित्रेची खरी स्पर्धा ग्रेटा गाबरेशीच, असा अभिमान तमाम बंगबंधूंनी बाळगला, तो आजतागायत. ही तुलना जणू अटळ होती. अतिशय टपोरे बोलके डोळे कोपऱ्यातून बघताना काहीसे तिरळे वाटत. पण तरीही नजरेत भरे ते त्यातले बंगाली स्त्रीचे खटय़ाळ, अवखळ निरागसपण. कधी तमाम पुरुषांची परीक्षाच घेणारे भाव, कधी प्रियकराची नसून जणू ईश्वराचीच याचना करताहेत अशी आर्तता, तर कधी एखाद्याच इंदिरेला साजेशी अधिकारी नजर. जोडीला भूमिकेप्रमाणे देहबोली बदलण्याची किमया. हेच गुण तपशिलाच्या फरकाने गाबरेकडेही होते. हॉलीवूडमध्ये गुणसंपन्न ठरलेल्या व्यक्तीशी तुलना होऊनही सेन ‘टॉलीवूड’मध्येच का रमल्या, हिंदी चित्रपटांत का रुळल्या नाहीत, याची अनेक उत्तरे दिली जातात. कुणी हिंदीतील त्या वेळच्या निर्मात्यांपासून ते अभिनेत्यांपर्यंत साऱ्यांमध्ये बोकाळलेल्या हट्टीपणाला दोष देते, तर कुणी बंगाली चित्रपटसृष्टीच्या अहंमन्यपणाला. हिंदीचे जे काही नुकसान त्यांच्या नसण्यामुळे झाले असते, ते जणू थोपवण्यास पुरेसे ठरणारे चार-सहा चित्रपट त्यांनी हिंदीत केले. पण बंगालीत सुचित्रा सेन नसत्या तर? तर होणारे नुकसान मोठे होते.
 सुचित्रा सेन आई म्हणूनही थोरच म्हणायला हव्यात. त्यांचे सोनसळी सौंदर्य नातींपर्यंत आले.  आईचे रूपसौष्ठव असूनही त्यांच्या कन्या मुनमुन बंगालीतच राहिल्या. सुचित्रा सेन यांना हिंदी चित्रपटांत रमायचे नव्हते. त्यांच्या नंतरच्या पिढय़ांना मात्र रमायचे असावे, पण रिया आणि रायमा या त्यांच्या नातींच्याही वाटय़ाला- रेशमी रूपाची देणगी असूनही ते भाग्य लाभले नाही.     
आयुष्याचा हिशोब करून काय मिळवले आणि काय गमावले, याची जाहीर चर्चा करण्याची गरज सुचित्रा सेन यांना कधी वाटली नाही. सतत चर्चेत असताना, अलगदपणे स्वत:ला वेगळे करण्याची कला त्यांना साधली. गेल्या पस्तीस वर्षांत एकदाच जाहीर दर्शन देणाऱ्या सेन यांच्याविषयीचे गूढ त्यामुळे कधीच कमी झाले नाही. त्यांच्या अदृश्यतेने एक साधले. वयोपरत्वे येणारे पिकलेपण कधीच कोणासमोर आले नाही. अद्यापही लक्षात राहतो तो त्यांचा ‘आँधी’मधला समोरच्याला छळणारा चेहरा. ‘आँधी’मध्ये त्यांना तितकीच प्रौढ साथ दिली ती संजीवकुमार या समर्थाने. बऱ्याच दिवसांच्या खंडानंतर आपली जिद्दी पत्नी घरी आल्यावरचे दोघांतले संवाद आणि पौर्णिमेच्या चांदण्यातले ‘तेरे बिना जिंदगी से कोई.. ’ हे गुलजारगीत रसिकांच्या मनात अलवारपणे अजूनही घर करून असेल. त्याच प्रसंगात वातावरणातील शिशिरस्पर्शाने शहारलेल्या सुचित्रेभोवती संजीवकुमार स्वतचा कोट शालीसारखा लपेटतात. काळजात कळ उमटवणारा योगायोग हा की आकाशात तेच पौष पौर्णिमेचे शिशिरचांदणे असतानाच सुचित्रा सेन यांनी इहलोकाचा निरोप घेतला. नव्या आणि आपल्यासाठी निव्वळ दंतकथांच्या जगातही त्यांच्या आगमनाने ‘नूर आ गया है..’ अशीच प्रतिक्रिया उमटेल.