‘चलो हरिद्वाऽर’ असा आदेश राणीमाशीने देताच पोळावर बसलेल्या असंख्य मधमाश्यांचा थवा आकाशी उडाला व वेगाने लक्ष्याकडे वाटचाल करू लागला. ती बातमी वाचल्यापासून शतकानुशतके निष्ठेने मधनिर्मिती करणाऱ्या या माशांचे हृदय व्यथित झाले होते. नंतर त्याची जागा संतापाने घेतली व काहीही झाले तरी त्या हरिद्वारच्या बाबाला थेट जाब विचारायचाच असे सर्वानुमते ठरले. बेमालूमपणे मधात भेसळ करणाऱ्या या स्वदेशीवाल्यांना मधनिर्मितीमागील कष्टाची कल्पना नाही. मधाच्या नैसर्गिक गोडव्याला कृत्रिमतेचे गालबोट लावणाऱ्या या वृत्तीचा चावे घेऊन निषेध करायलाच हवा, असे राणीने सांगितल्यावर सर्व माशा या हल्ल्यासाठी सज्ज झाल्या होत्या. ज्यांच्याकडे आपण जात आहोत ते बाबा मोक्याच्या क्षणी पळून जाण्यात पटाईत आहेत. एखादे प्रकरण अंगावर आले की लगेच भगव्याऐवजी पांढरे कपडे घालण्यात ते तरबेज.. पळण्यासाठी विमान वापरण्यात त्यांचा हातखंडाच.. तेव्हा सर्व ठिकाणांवर दबा धरून बसा अशा सूचना राणीने दिल्या होत्याच. माशा आश्रम परिसरात पोहोचल्या. त्यांना बाबांची आलिशान कुटी शोधायला जराही वेळ लागला नाही. काहींनी आत डोकावून बघितले तर बाबा ‘मख्खी’ सिनेमा बघत बसलेले. पडद्यावरच्या कृत्रिम माशा बघून आपले सहकारी गोंधळणार तर नाहीत ना अशा शंका राणीला आली. तिने लगेच ‘गुईंऽऽऽ’ असा सांकेतिक आवाज केला. त्याबरोबर सर्व माशा सावध झाल्या. तिकडे बाबा सिनेमात गुंग होते. त्यात नायक असलेली माशी दुष्टप्रवृत्तीच्या माणसांना मस्तपैकी छळते हे बघून ते हसत होते. बाजूला साखरेचा मोठा डबा ठेवलेला राणीला दिसला. तो बघून तिचा काटा चाव्यासाठी शिवशिवू लागला. सिनेमातल्या माशा भले मध गोळा करणाऱ्या नसतील पण त्याही आपलीच भावंडं. त्यांनाही हा बाबा साखरेची लालूच दाखवतो की काय असे राणीला वाटून गेले. एकेका फुलावरचे मकरंद गोळा करत पोळावर आणणे, मध होईपर्यंत त्याची निगा राखणे, इतकी कठीण कामगिरी करताना भेसळीचा विचारही कधी आमच्या मनाला शिवला नाही. आणि हा आत्मनिर्भरतेच्या गप्पा मारणारा सहज साखर मिसळतो. याला धडा शिकवलाच पाहिजे, असे म्हणत राणीने ‘भिडा’ असे सांगताच माशा वायुवेगाने कुटीत शिरल्या. अचानक झालेला हा हल्ला बघून बाबा गांगरून गेले. सिनेमातल्या माशा अंगावर कशा आल्या, या प्रश्नाने बावचळले. इकडे माश्यांनी कडाडून चावे घेणे सुरू केले. हा मधमाश्यांचा हल्ला हे लक्षात घेताच बाबा ओरडू लागले. सकाळी ३० लाखांचे योगशिबीर आहे. देशभरातून लोक जमले आहेत. माझे नुकसान होईल असे म्हणत माश्यांना विनवू लागले. तरीही चावे थांबेचनात. हा हल्ला कशासाठी आहे हे लक्षात येताच बाबांनी बाळकृष्णाला हाका मारायला सुरुवात केली. तेवढय़ात काही माश्यांनी बाबांच्या दाढीत शिरून डंख मारणे सुरू केले. या हल्ल्याने गलितगात्र झालेले बाबा हात जोडून माफी मागू लागले. यानंतर कधीही भेसळ करणार नाही, असे सांगू लागले. अगदी सिनेमातल्यासारखे! माफी शब्द ऐकताच राणीने हल्ला थांबवण्याचा आदेश दिला. लक्ष्यभेद यशस्वी झाला असे सांगत राणी मग झुंडीसह गाझियाबादला दुसऱ्या, जुन्या कंपनीच्या कारखान्याकडे रवाना झाली. कामकरी माश्यांच्या कामगिरीची खात्रीच असलेल्या राणीला आता कुणी, ‘मधु मागसी माझ्या सख्या परी, मधुघटांत भेसळ बघ भारी’ असे कधी उपहासानेसुद्धा उच्चारणार नाहीत असे वाटू लागले.