अरे, कशाला त्या दादांना छळता रे! ते बिचारे उलटून बोलत नाहीत. शांतपणे साऱ्यांचे दुखणे ऐकून घेतात, असंतुष्ट व नाराजांची बंद खोलीत सभ्यपणे समजूत काढतात. ‘जी’ व ‘सर’ म्हणत पक्षाचा गाडा पुढे नेतात. म्हणून काय त्यांनाच लक्ष्य कराल काय? दिसला साधा माणूस की करा टीकेचा मारा ही शिकवण किमान पक्षात तरी वापरू नका ना राव! अरे पक्षात निर्णय कोण घेतो हे तरी ठाऊक आहे का तुम्हाला? आधी त्याची माहिती घ्या व मगच टीकेचे वाग्बाण सोडा की! नुसत्या हवेतल्या बाता कशाला करता? आरोपांनाही तेवढय़ाच खिलाडूवृत्तीने स्वीकारताना, टवाळीलासुद्धा हसत हसत व चष्मा हाताने सरकवत सामोरे जाणाऱ्या दादांच्या मनाला किती वेदना होत असेल याचा जरा विचार करा. त्यांचीही दिल्लीतल्या चाणक्याशी थेट ओळख आहे. अगदी विद्यार्थिदशेपासूनची. पण दादा कधीही त्यांचा धाक दाखवण्याच्या भानगडीत पडत नाहीत. नेमून दिलेले काम निमूटपणे करणे हाच त्यांचा पारिवारिक स्वभाव. त्याचा गैरफायदा कशाला घेता? अहो, पक्षात निर्णय तीनच लोक घेतात. त्यातले दोन दिल्लीचे तर एक नागपूरचे भाऊ. त्यातल्या त्यात राज्याचा विषय असेल तर या ‘पुन्हा येईन’वाल्या भाऊंचा शब्द अंतिम! हे त्रिवार सत्य साऱ्यांना ठाऊक असूनही दादांच्या मागे का लागता? कशाला त्यांच्या नावाने पावत्या फाडता? लक्ष्यच करायचे असेल भाऊंकडे बोट दाखवा ना! तशी हिंमत तुम्ही दाखवणार नाही कारण ते पडले रेशीमबागवाले. शिवाय खास नागपुरी असल्याने काटय़ाने काटा कसा काढायचा याचीही कला त्यांना चांगली अवगत. त्यांच्याशी ‘पंगा’ घेणे शक्य नाही म्हणून दादांना त्रास देता! पराभवातून आलेल्या नाराजीचे म्हणाल तर ती सर्व राज्यातच आहे. विदर्भात तर भरपूर पण तिथले दुसरे ‘भौ’ काही बोलले का? मग तुम्ही कशाला अगदी पैलवानीच्या थाटात पुढाकार घेता? त्या दुसऱ्या ‘भौ’सारखे शांत बसा ना! संधीची वाट बघत. उमेदवार ठरवले भाऊंनी, बाहेरून आलेल्यांना पक्षात पदे दिली भाऊंनी, यातून जे नाराज झाले त्याला भाऊ जबाबदार, जे सोडून जाण्याचे इशारे देत आहेत त्यांचाही रोष भाऊंकडे. इतके स्फटिकासारखे स्पष्ट दिसणारे राजकारणही तुम्हाला समजत नसेल तर कठीण आहे बुवा! पुन्हा सत्ता येत नाही तोवर भाऊंचाच ‘जलवा’ राहणार आहे, हे लक्षात ठेवा व टीकेचा रोख जरा बदलवा. दादांवर होणाऱ्या या आरोपामुळे तिकडे भाऊ गालातल्या गालात किती हसत असतील याची कल्पना आहे का तुम्हाला? नसेल तर नागपुरी स्वभावाचा आधी अभ्यास करा. कधीमधी भक्तांनीही थोडा अभ्यास करायला काय हरकत आहे? एखाद्या ठिकाणी भाऊंनी नसेल नेले दादांना सोबत. त्याचा एवढा गवगवा करायचा? अहो भाऊ व दादा म्हणजे एकाच नाण्याच्या दोन बाजू. कुणी काय करायचे हे त्या दोघांमध्ये आधीच ठरले असते. आता पक्षाचा प्रांतप्रमुख म्हणून साऱ्या प्रश्नांना सामोरे जावे लागणे हाच काय तो दादांचा दोष. त्यावरून एवढे छळायचे? एका साध्या, सज्जन माणसाला यातना द्यायच्या. म्हणे ‘दादामुक्त पक्ष’! अरे ‘भाऊमुक्त’ म्हणण्याची धमक आहे का तुमच्यात? नाही ना, मग कशाला हवेत असंतोषाचे फुगे सोडता? आधीच दादांचे वय झालेले. बिचारे कधी तरी संधी मिळेल या आशेवर आजही उत्साहात असतात. आजकाल तर ते रोज आरती प्रभूंच्या कवितांचे पुस्तक सोबत ठेवतात. त्यातली एक कविता त्यांना चांगलीच पाठ झाली आहे म्हणे! ‘कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे’!