तुम्ही देशाला सर्वोच्च नेता दिला म्हणजे फार मोठा तीर मारला असे समजता की काय? त्या उत्तर प्रदेशकडे बघा जरा. ओळीने पंतप्रधान दिले तरी कसलाही अहंगंड नाही की अधिकार गाजवण्याची वृत्ती नाही. आणि तुम्ही? एक माणूस काय दिला देशासाठी, सारा देशच मालकीचा समजू लागलात. महाराष्ट्रभूवर अतिक्रमण करू लागलात. मराठी माणसाला एवढा लेचापेचा समजलात की काय? भलेही आम्ही असू आळशी, पण एकदा का आमचा बाणा जागृत झाला, की आम्ही कुणास ऐकत नाही हे लक्षात ठेवा. सध्या तर हा बाणा जागृत करणारा बाणच सत्तेत आहे. नसतील सुटले आमच्याकडून आधीचे सीमातंटे- मग तो बेळगावचा असो वा विदर्भातील राजुऱ्याचा, म्हणून काय तुम्ही आम्हाला कमकुवत समजू लागले की काय? अरे, नावातच ‘महा’ आहे आमच्या अन् शेवटी ‘राष्ट्र’. भलेही संघराज्य असले तरी एखाद्या राष्ट्राप्रमाणेच वावरतो आम्ही. आमची ताकद जोखू नका. ज्या नेत्याच्या नावावर एवढी हिंमत करता, तोच तर विस्तारवादाचा मुद्दा वारंवार उपस्थित करतोय. तरीही तुमचे ‘धीरे धीरे’ पाय पसरणे सुरूच. हो, असेल तुमच्यात उद्यमशीलता; पण म्हणून काय दुसऱ्या राज्यात घुसखोरी करायची? अरे, तुमचा आकार किती? आमचा किती? याचा विचार केला का कधी? हे म्हणजे उंदराने हत्तीला वाकुल्या दाखवण्यासारखे झाले. माहिती आहे आम्हाला, तुमचा डोळा मुंबईवर आहे म्हणून! पण ती आमच्या ताब्यात आहे! भलेही तिथली तुमची संख्या कितीही वाढवली तरी ती तुम्हाला मिळणार नाही. तुमच्या त्या नेत्याचा डोळासुद्धा मुंबईवर आहे हे ठाऊक आहे आम्हास. मात्र, लक्ष्यभेद करण्याची आमची क्षमता मोठी आहे हे ध्यानात ठेवा!! विजेचे चार खांब गाडून पुढे सरकले म्हणजे लक्ष्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली असे अजिबात समजू नका. गुपचूप मागे सरका, अन्यथा गाठ आमच्याशी आहे. कृतीचे नंतर बघू, पण आरडाओरडा करण्यात आम्ही तरबेज आहोत. त्यामुळे एक‘संघ’ देशाची भाषा सतत बोलणाऱ्या तुमच्या नेत्याचीच पंचाईत होईल हे लक्षात असू द्या. शेवटी त्यांनाही देशव्यापी होण्यासाठी काशी गाठावी लागलीच ना! आणि वारंवार ते ‘अमारुं प्रदेश’ कशाला म्हणता? ‘मराठी माणस’शिवाय तर तुमचेही पान हलत नाही. म्हणून तर तुमच्या नेत्याने पाटलांकडे पक्षाची जबाबदारी सोपवली. त्या तुमच्या नेत्याचे गुरूही मराठी होते, हेही आठवणीत राहू द्या. भलेही नसेल आमच्यात तुमच्याएवढी व्यापारी वृत्ती, पण इंच इंच भूसाठी लढण्याची अस्मिता आमच्यात ठासून भरली आहे. तुमच्यासारखे ‘दिसली सामट की ठेव तिथे नावाचा दगड. दिसली मोकळी जागा की घाल तिथे कुंपण’ या वृत्तीचे आम्ही नाही. अंथरूण पाहून हातपाय पसरा अशीच शिकवण आम्हाला दिली गेली आहे. त्यामुळे सीमोल्लंघन आमच्या स्वभावात नाही. या नेकीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करू नका. नेता आहे, तो सर्व सांभाळून घेईल या भ्रमात राहू नका. सीमेवरचे हद्दीचे दगड प्राणपणाने जोपासणारे आम्ही. थोडे काय दुर्लक्ष झाले, तर तो दगडच पळवता! आधी व्यापार केंद्र पळवले, आम्ही काही बोललो नाही; मग बुलेट ट्रेनचा विषय आला, आम्ही शांतच. या सभ्यपणाला तुम्ही लाचारी समजू लागले की काय? लक्षात ठेवा, गाठ मराठी माणसाशी आहे. एकदा का आमचे रक्त उसळले तर मग आम्ही कुणालाच जुमानत नाही. तेव्हा गपगुमान मागे सरका. अजूनही नाही कळले? अरे, आम्ही तुमच्याबद्दलच बोलतोय. होय, त्याच त्या गुजरातबद्दल!