साहेबांवरील प्रेमापोटी मोठय़ा संख्येत जमलेल्या सर्व सुहृदांनो! राज्य सरकारने नुकतीच सनदी अधिकाऱ्यांच्या पुरस्कार स्वीकारण्यावर अनेक बंधने घातली आहेत. हा निर्णय झाल्यामुळे जिथे गेले तिथे लोकप्रियतेचे धनी ठरलेल्या आपल्या साहेबांचे कार्यकर्तृत्व झाकोळून जाते की काय अशी शंका त्यांच्यावर उदंड प्रेम करणाऱ्या अनेकांच्या मनी दाटून आली. त्यातूनच मग आजवर त्यांना मिळालेल्या शेकडो पुरस्कारांपैकी निवडक मानपत्रांचा समावेश असलेले ४०० पानांचे एक ‘छोटेखानी’ पुस्तक तातडीने प्रकाशित करण्याचे आम्ही ठरवले. अगदी वेळेवर ठरलेल्या या समारंभाला राज्यभरातून लोक आलेत याचा आम्हाला अतीव आनंद झाला आहे. हा नवा पुरस्कार नाही तर प्रकाशनाचा कार्यक्रम आहे हे शासनाला ‘पटवून’ दिल्यामुळे साहेबही येथे जातीने हजर झालेत. आता अधिक बोलण्याऐवजी मी साहेबांना एवढे पुरस्कार का मिळाले याची मीमांसा अल्पशब्दात विशद करतो. सनदी सेवेत दाखल झाल्यावर सुदैवाने साहेबांना महाराष्ट्र केडर मिळाले. प्रारंभी एसडीओ म्हणून काम सुरू केल्याबरोबर त्यांनी लगेच त्यांच्या कामाची छाप सोडायला सुरुवात केली. त्यांनी त्यांची वेतनपावतीच नोटीस बोर्डवर लावली व वेतनाशिवाय काहीही नको असा संदेश त्यातून आपसूकच लोकांपर्यंत गेला. त्यामुळे नोकरीच्या पहिल्याच महिन्यात त्यांना पन्नासावर संघटनांनी प्रामाणिक अधिकारी म्हणून गौरवले. या पदावरच्या अल्पकाळात त्यांनी वर्ग एकच्या जमिनी दोनमध्ये करून शेकडो शेतकऱ्यांना दिलासा दिला. शेवटी बदली होऊन जाताना त्यांच्याविरुद्ध एकही तक्रार आली नाही म्हणून त्यांचा भव्य सत्कार झाला. नंतर जिल्हा परिषदेचे सीईओ म्हणून काम करताना त्यांनी अमीट छाप सोडली. येणाऱ्या प्रत्येकाचे उभे राहून स्वागत करणे, जाताना त्याला दारापर्यंत सोडून देणे, आग्रहाने चहा पाजणे यामुळे ग्रामीण भागात ते कमालीचे लोकप्रिय झाले. शेतकऱ्यांना अवजारे वाटण्याचा धाडसी कार्यक्रम त्यांनी राबवला. याचे कंत्राट त्यांच्या नातेवाईकाला मिळाले असा आरोप काहींनी केला, पण साहेबांच्या मधुर संबंधामुळे त्याला माध्यमात जागा मिळाली नाही. या योजनेच्या १०० टक्के अंमलबजावणीबद्दल त्यांचा प्रत्येक शेतकरी मेळाव्यात सत्कार झाला. ते बदलून जाताना शेतकऱ्यांनी रस्त्यावर उभे राहून त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली. मग जिल्हाधिकारी झाल्यावर तर त्यांच्या कर्तृत्वाला आणखी बहर आला. त्यांनी कोणत्याही मंत्र्यांना कधीच दुखावले नाही. ‘राजसत्तेची कामे करणे हाच राजधर्म’ हे त्यांच्या कार्याचे सूत्र राहिले. त्यांचे वादातीत कौशल्य असे की या कार्यकाळात त्यांनी जिल्ह्य़ात एकही सरकारविरोधी आंदोलन होऊ दिले नाही. सत्ताधारी आणि विरोधकांच्या गळ्यातले ताईत अशीच त्यांची प्रतिमा राहिल्याने जवळजवळ २०० मानपत्रे त्यांनी सत्काराच्या माध्यमातून स्वीकारली. शेतकऱ्याच्या घरी मुक्काम करणे, शासकीय इमारतीतील स्वच्छतागृहे स्वच्छ करणे, चालक निवृत्त झाला तर त्याला स्वत: वाहन चालवत घरी सोडणे असे अनेक उपक्रम राबवून त्यांनी जनतेचा विश्वास संपादन केला. प्रशासकीय स्तरावर त्यांना याबद्दल गतिमान पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांची बदली झाली तेव्हा अनेक संघटनांनी उपोषणे केली, पण त्यांची समजूत काढून नंतर त्यांचा सत्कार स्वीकारून ते काही काळानंतर विभागीय आयुक्त झाले. सध्या या पदावर असलेल्या साहेबांनी येथेही अनेक उपक्रम राबवून जनतेचे प्रेम संपादन करण्याचे प्रयत्न सुरूच ठेवलेत. विभागातील अधिकाऱ्यांची भिशी व अनौपचारिक चर्चेचा त्यांचा उपक्रम माध्यमांनी उचलून धरलाय. याशिवाय त्यांनी झालेल्या आरोपाकडे दुर्लक्ष करत शेकडो भूमिपुत्रांना कंत्राटी नोकरी लावून देण्याचा विडा उचलला आहे. ते भविष्यात राज्याचे मुख्य सचिव होतील असा विश्वास आम्हाला आहे. तरी मी येथे हजर असलेल्या राज्य कंत्राटदार संघटनेच्या अध्यक्षांना विनंती करतो की त्यांनी ‘पुरस्कार येती मागून’ या पुस्तकाचे प्रकाशन करावे.