मित्रहो, प्रत्येक गोष्टीचा एक हंगाम असतो. पण तो कधीच अचानक, आगंतुकासारखा सुरू होत नाही. अगोदर त्या हंगामाची चाहूल लागते. मग तो अंधूकसा दिसू लागतो आणि नंतर तो असा काही भरभरून बहरतो की, चहूबाजूंना त्याच्याच खाणाखुणा उमटू लागतात.. एखाद्या हंगामाबाबत हा जसा निसर्गाचा नियम आहे, तसा निवडणुकीच्या हंगामाचाही तोच नियम आहे. आता कुठे त्या हंगामाची जेमतेम चाहूल सुरू झाली आहे. यंदा हा हंगाम प्रमाणाहून अधिक मोहरणार अशी चिन्हेही दिसू लागली आहेत. स्वतला वाघ म्हणवून घेणाऱ्या शिवसेनेवर पहिला प्रहार करून मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी या हंगामाची चाहूल दिली, आणि निवडणुकीच्या माहोलात कुत्र्यांचा हंगाम सुरू झाल्याची चाहूल लागली.. शिवसेनेच्या वाघाला केवळ कुत्र्याची उपमा देऊन राज ठाकरे थांबले नाहीत, तर सेना म्हणजे केसाळ कुत्रे आहे असे ते म्हणाले. राजकारणात कुत्र्यांना असे स्थान मिळण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधी एकदा, गाडीखाली सापडलेल्या कुत्र्याच्या पिल्लाच्या केविलवाण्या अवस्थेच्या विचाराने अवघे राजकारण कळवळले होते. राजकारणाच्या केंद्रात आपल्याला एवढे महत्त्व आलेले पाहून कुत्र्यांची जमात त्या दिवसापासून काहीशी अधिकच आक्रमकपणे गल्लीत शेरगिरी कुरू लागली असे म्हणतात. गल्लोगल्लीची कुत्रीदेखील वाघाच्या तोऱ्यात वावरू लागली. काहींना तर थेट समर्थाघरीच्या श्वानाचे स्थान प्राप्त झाले. ‘साहेबाचे कुत्रे’ असा एक स्वतंत्र वर्गदेखील तयार झाला. असे असले तरी, वाघांची गुर्मी कधी कमी झाली नव्हती. काही वाघ गुहेत बसतात, संधी साधण्यापुरते बाहेर येतात, आणि पुन्हा नवी संधी मिळेपर्यंत गुहेत गडप होतात. महाराष्ट्राच्या राजकारणात वाघाला मोठे महत्त्व आहे. मंत्रालयात तर, मध्यभागीच्या प्रांगणातच वाघाची फायबरची भव्य प्रतिमाच उभी असून मंत्रालयात काम होण्याच्या आशेने येणाऱ्या अभ्यागतांना या वाघासोबत सेल्फी काढण्याची मोफत सुविधाही सरकारने उपलब्ध करून दिली आहे. मंत्र्यांच्या दालनातही, जबडय़ाचा आ वासलेल्या वाघांच्या लहानशा फायबरमूर्ती            दिसत असतात, आणि ‘वाघ बचाव’ ही तर सरकारनेच सुरू केलेली मोहीम आहे. एका बाजूला राजकारणात वाघांचे महत्त्व जपण्याचा असा सरकारी आटापिटा सुरू असताना, अचानक राज ठाकरे यांनी केसाळ कुत्र्यांना निवडणुकीच्या हंगामात उतरविले, म्हणजे राजकारणातील निवडणुकीच्या नव्या हंगामाची चाहूल लागली असेच म्हणावे लागेल. ‘या केसाळ कुत्र्याकडे कुठून पाहायचे तेच कळत नाही’, असा टोला मारून त्यांनी जिव्हारी लागणारा एक बाण सोडल्याने आता निवडणुकीच्या जंगलात एक नवी लढाई सुरू होणार यात शंका नाही. आता वाघाला नुसते गुरकावून चालणार नाही, तर बाह्य़ा सरसावून मैदानात उतरावे लागणार, आणि  आपण केवळ मंत्रालयातील दालने सजविणारे फायबरचे वाघ नाही, हेही दाखवून द्यावे लागेल..ढाण्या वाघ की कुठे तरी पाहणारा केसाळ कुत्रा हे दाखवून देण्याची वेळ आली आहे. कारण हंगाम सुरू झाला असला  तरी तो कुत्र्याचा हंगाम नाही, हे दाखवावेच लागेल.