तपोवनातील मैदानावरील सभा संपली आणि बंदोबस्तावरील पोलिसांनी ठाण्याकडे धाव घेतली. गोळा केलेल्या पिशव्यांची बांधलेली तोंडे सोडली आणि कोंडल्यामुळे कंटाळलेल्या कांद्यांनी पिशवीबाहेर उडय़ा मारल्या. जमिनीवर विखुरलेल्या कांद्यांचे जणू संमेलन भरले.. आणि नव्या-जुन्या आठवणींची उजळणी सुरू झाली. पाच महिन्यांपूर्वीच आपल्याला एक रुपया ४० पैसे भाव मिळाला होता, असे एका मुठीएवढय़ा कांद्याने शरमेने सांगताच आपापल्या किमतीची लाज वाटून साऱ्या कांद्यांनी माना खाली घातल्या. ‘लासलगावाच्या बाजारात भाव मिळेल या आशेच्या ओलाव्यामुळे तोंडाला पाती फुटल्या आणि भाव पडला.. सात क्विंटल कांदा विकून आलेल्या दीड हजाराची मनिऑर्डर मालकाने पंतप्रधानांना पाठविली होती,’ अशी आठवण सांगताना त्याचे डोळे वाहू लागले. मग काय करावे, हे न सुचल्याने बाकीचे कांदे नाकाने साली सोलत एकमेकांकडे पाहू लागले. ‘मी तुमचा कांदा खाल्ला आहे, तो विसरणार नाही,’ असे मागे एकदा नंदुरबारच्या सभेत पंतप्रधान म्हणाले होते. त्या आठवणीने काही कांदे गहिवरले. आज पुन्हा पंतप्रधान कांदेभूमीत येणार असल्याने, त्यांना आपली आठवण आहे का हे पाहण्यासाठी सारे कांदे स्वत:हून पिशव्यांमध्ये जाऊन बसले होते. ज्याने आपल्याला पिकविले, भाव मिळेल एवढे वाढविले, त्याच्याच खांद्यावरून पिशव्यांमधून आज तपोवनात जाऊन ते आपल्याविषयी काय बोलतात ते ऐकावे यासाठी सारे कांदे उतावीळ झाले होते. पण गनिमी कावा फसला. आपलाही ‘कडकनाथ’ होणार या विचाराने पिशव्यांमधले कांदे निराश झाले. त्यातच नजरकैदेचे फर्मान सुटले आणि मालकांच्या खांद्यावरच्या पिशव्या जाळीच्या गाडीत जमा झाल्या. तिकडे सभा सुरू झाल्याचे समजूनही कोंडलेल्या कांद्यांना काहीच करता येत नव्हते. लांबवरून पंतप्रधानांचा आवाज कानावर पडत होता; पण ते काय बोलताहेत ते कळत नसल्याने नजरकैदेत कोंडलेले सारे कांदे भयभीत होऊन एकमेकांना लगटून पिशवीत गपगार पडले होते. ‘सरकार कांद्याला घाबरतंय’ अशी अफवा ‘काकां’नी सोडल्यामुळे बंदोबस्त अधिकच कडक झाला आणि सरकारलाच घाबरून बसायची वेळ आपल्यावर आली या भावनेने सारे कांदे तोंडे बांधलेल्या पिशव्यांमध्ये स्वत:स कोंडून घेऊन सुटकेची वाट पाहत होते. निफाडच्या कृष्णा डोंगरेंच्या शेतात पिकलेले कांदे तर आता आपापल्या पिशव्यांमध्ये पार भेदरूनच बसले होते. ‘मोदी सरकार जात नाही तोवर शर्ट घालणार नाही’ अशी प्रतिज्ञा कृष्णाने पाच वर्षांपूर्वी पवारसाहेबांच्या सभेत केली होती. ही प्रतिज्ञा ऐकून साहेबांनी आपली उघडी पाठ थोपटली असे त्याने संध्याकाळी गावातल्या गप्पांमध्ये सांगितले, तेव्हा समोरच्या चाळीतले कांदे चुळबुळ करू लागले होते. एका बंद पिशवीतल्या काही कांद्यांनी तेव्हा ती प्रतिज्ञा कानांनी ऐकली होती. २३ मेला जयंतराव स्वत: येऊन आपल्या अंगावर शर्ट चढविणार आहेत, असेही तेव्हा कृष्णाभाऊंनी सांगितले होते. या आठवणीने त्या पिशवीतल्या एका कांद्याला पुन्हा गहिवरून आले. कृष्णाभाऊ अजूनही शर्ट न घालताच वावरत असतील का, अशी शंका त्याने बोलून दाखविली आणि पोलीस ठाण्यात विखरून पसरलेले कांदे जमिनीवर गडाबडा लोळत हसू लागले.. काही वेळाने सारे कांदे सावरले. अचानक मुठीएवढय़ा कांद्याच्या डोळ्यांना धार लागली. त्याने हळूच डोळे पुसले आणि उसने अवसान आणून तो म्हणाला, ‘पंतप्रधानांनी आमची कैफियत ऐकून घ्यायला हवी होती!’.. पुन्हा शांतता पसरली. पिशवीतल्या कैदेतून बाहेर पडलो हेच खूप झाले, असे म्हणत काही कांद्यांनी एकमेकांच्या गळ्यांत गळे घातले. उद्या आपले काय होणार, या काळजीने कांद्यांचे डोळे पाणावले होते..
संग्रहित लेख, दिनांक 20th Sep 2019 रोजी प्रकाशित
कोंडलेल्या कांद्यांची कैफियत..
आपलाही ‘कडकनाथ’ होणार या विचाराने पिशव्यांमधले कांदे निराश झाले
Written by लोकसत्ता टीम

First published on: 20-09-2019 at 03:59 IST
मराठीतील सर्व उलटा चष्मा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ulta chasma police banned onion in pm narendra modi rally in nashik zws