आर्थिक-डावे ते निम्नगटीय-प्रतिगामी

अर्थ स्पष्ट न करता शब्द वापरत राहणे ही अगदी वाईट सवय असते. त्यामुळे गैरसमज आणि गोंधळ जास्त होतात.

(संग्रहित छायाचित्र)

राजीव साने

डावे-उजवेपणा आर्थिक, तर पुरोगामी-प्रतिगामीपणा सांस्कृतिक असतो. प्रतिगामित्वाला ‘खरे पुरोगामी’ उत्तर देण्याऐवजी डाव्यांनी पत्करले निम्नगटीय प्रतिगामित्वच! हे कसे काय होते?

अर्थ स्पष्ट न करता शब्द वापरत राहणे ही अगदी वाईट सवय असते. त्यामुळे गैरसमज आणि गोंधळ जास्त होतात. मूल्यप्रणाल्या अनेक असणे आणि वेगळ्या असणे हे जिवंतपणाचेच लक्षण आहे. वाद व्हावेतच. पण ते सुस्पष्ट व्याख्यांनीशी व्हावेत. आधी कोठे जुळते आहे? याकडे पाहून नंतर विवाद्य मुद्दय़ांकडे यावे. कारण ज्यावर सहमती असेल त्यावर भांडण्यात शक्ती का घालवायची? प्रस्थापितवादी विरुद्ध परिवर्तनवादी, ही एक संदिग्ध जोडी, गोंधळ अधिकच वाढवत असते. याचे मुख्य कारण असे की खुद्द प्रस्थापित हे स्वत:च परिवर्तनशील असू शकते. ते कोणत्या दिशेने बदलते आहे हे न पाहताच विरोधासाठी विरोध करणे हे घातक असते. योग्य ते वळण देणे वेगळे आणि आडवे लावणे वेगळे. पण आडवे लावले तरच तो खरा परिवर्तनवाद अशी समजूत मात्र रुळून बसली आहे.

आर्थिक बाबतीत डावे/उजवे आणि सांस्कृतिक बाबतीत पुरोगामी/प्रतिगामी, या दोन विरोधी जोडय़ा प्रसिद्धच आहेत. त्यांचे नेमके अर्थ काय होतात? त्यांच्यात कोणकोणत्या जुळण्या संभवतात? व या जुळण्यांमध्ये मूळ अर्थाचा विपर्यास कशामुळे होतो? हे आज आपण पाहणार आहोत.

आर्थिक डावे-उजवेपणा आणि सांस्कृतिक-पुरो/प्रतिगामित्व

आता मला दिसणारी जी लक्षणे मी सांगणार आहे, ती कोणी तरी एकदा बसून ग्रथित केलेली होती असे नसून, परिवर्तनाच्या प्रक्रियेत एकत्र चिकटत चिकटत जमा होत गेलेली आहेत. बहुतांश वेळा ती साथसाथ जाताना आढळतात, म्हणजे ‘दे हॅपन टू गो टुगेदर मोस्ट ऑफ द टाइम्स’. हे मुद्दाम अशासाठी सांगितले की एकत्र समुच्चय असला तरी त्याच्या अंतर्गत ताणही असतात. एकेक समुच्चय आतून पुरता सुसंगत जरी नसला तरी बऱ्यापैकी सुसंगत असतो व म्हणूनच टिकून राहत जातो.

आर्थिक-डावे/उजवेपणा अगोदर लक्षात घेऊ. कारण त्याची लक्षणे खूपच स्पष्ट आणि विरोधी जोडय़ांच्या स्वरूपात मांडता येणारी आहेत. आता असा संकेत पाळू, की मी जे आधी उल्लेखीन ते डावे आणि नंतर उल्लेखीन ते उजवे. काय काय असतात ही लक्षणे? डाव्याला विद्रोह हवा असतो तर उजव्याला सुविहितता. डाव्याला समता हवी असते तर उजव्याला स्वातंत्र्य. डावा ‘समूह’ मानतो तर उजवा ‘व्यक्ती’ (म्हणजे प्रत्येक व्यक्ती! व्यक्तिपूजा नव्हे ). डावा उच्चांचे निर्दालन करू मागतो तर उजवा सर्वाचे आपापल्या परीने उन्नयन (सर्वोदय). डावा सक्तीने परिवर्तन लादू इच्छितो तर उजवा संमती मिळवेपर्यंत थांबतो. डावा सादगी म्हणजे गरजा कमी राखणे पसंत करतो तर उजवा वाढती समृद्धी पसंत करतो. डावा सरकारीकरणावर भर देतो तर उजवा जिथे चालेल तिथे बाजारव्यवस्थाच बरी असे मानतो. डावा हक्क मिळण्यासाठी भांडतो तर उजवा कर्तव्येसुद्धा केली पाहिजेत हे आवर्जून सांगतो. डाव्याच्या मते कोणत्याही दुरवस्थेचे कारण अन्याय हेच असू शकते तर उजवा अन्यायाखेरीज सुभाग्य/दुर्भाग्य आणि आत्मोद्धारक/आत्मघातकी – सद्गुण/दुर्गुण हेही पाहातो. डाव्याला वाटते की कोणाचाही लाभ कोणाच्या तरी हानीतूनच येऊ शकतो. उजवा उभय लाभकारी शक्यता आणि धन बेरजेचा डाव मानतो. अशा तऱ्हेने आपल्याला आर्थिक बाबतीत एक जोडय़ा-लावा-छाप यादीच मिळून जाते. विद्रोह/सुविहितता, समता/स्वातंत्र्य, समूह/व्यक्ती, उच्चनिर्दालन/सर्वोदय, सक्ती/संमती, सरकार/बाजार, हक्क/कर्तव्ये, अन्यायच/अन्यायेतर कारणे, शून्य बेरजेचा डाव/धन बेरजेचा डाव!

डावे आणि पुरोगामी एकत्र, तर उलट उजवे आणि प्रतिगामी एकत्र जातील, असे सहजच वाटते. पण ते तितके सरळ नसते. कारण आर्थिक बाबतींत या दोन तटांचे जे प्रेयक्रम (प्रेफरन्सेस) असतात त्यांची छाया त्यांच्या सांस्कृतिक धोरणांवरही पडते. त्यातून एक विशेष चमत्कारिक प्रकरण असे तयार होते की आर्थिक-डावे हे कळत-नकळत ‘उपसांस्कृतिक प्रतिगामी’ बनून बसतात! हा चमत्कार कसा होतो हे कळावे म्हणून आता आपण ‘सांस्कृतिक लक्षणां’कडे वळू.

सांस्कृतिक प्रतिगामित्व काय असते ते स्पष्ट करून घेऊ. कशाकशातून येते ते? रूढीग्रस्ततेतून, भूतकाळात रमण्यातून, ‘धुरिणांनी ठरवले ते म्हणजे नैतिक’ अशा धारणेतून, धर्मसंस्था भक्कम केली तर माणसे नैतिक बनतील अशा कल्पनेतून, जुने टिकवून धरावेसे वाटण्यातून, पारलौकिक मानण्यातून, आन्हिकांना कसोशीने पाळण्यातून, आपल्या वंशाची ‘मुळे’ शोधावीशी वाटण्यातून, आधुनिकतेलाच पाश्चात्त्य व म्हणून शत्रुवत मानण्यातून, प्रश्नांपेक्षा अस्मितांना महत्त्व देण्यातून, समर्पणशीलता व त्यागाला महत्त्व देण्यातून, ‘सोवळेपणा’ म्हणजे शुद्धाशुद्ध मानण्यातून आणि लोकांनी आपल्या आवडीनिवडी बाजूला ठेवून व्यवस्थेशी निष्ठावान राहिले की झाले, अशा ‘(समाज) धारणे’च्या कल्पनेतून, ज्याला सांस्कृतिक-प्रतिगामीपणा (कल्चरल रेट्रोग्रेडनेस) म्हणतात तो उदयास येत असतो.

याच्या अगदी उलट दिशेला असतो, तो खरा सांस्कृतिक-पुरोगामीपणा! सांस्कृतिक-पुरोगामीपणाची कोणकोणती लक्षणे आहेत? नवता म्हणजेच बदल स्वीकारणे, जास्त लवचिक मुभा देणे, अभिरुचिस्वातंत्र्य मान्य करणे, उदात्तीकरण न करता वास्तव हे ‘वास्तव’ म्हणून मान्य करणे, नवी स्वप्ने पाहणे, प्रयोग करणे, वैविध्य मान्य करणे, अभिव्यक्ती होऊ देणे, सृजनशीलतेला प्रोत्साहन देणे, चिकित्सक असणे अशा सर्व लक्षणांनी युक्त असतो, तो म्हणजे सांकृतिक-पुरोगामीपणा! मुख्य म्हणजे आत्मिक साधना आणि कायदे बनवणे या दोन गोष्टींत घोळ न घालणे, या अर्थाने सांस्कृतिक-पुरोगामीपणा इहवादी म्हणून ओळखला जातो.

आर्थिक-डावेपणातून येणारा भ्रामक-पुरोगामीपणा

घोळ असा आहे की पुराणमतवाद ही भानगड सर्वच वर्गात, जातींत, धर्मात, भाषांत, िलगांत रुजलेली असते. पुराणमतवादाला म्हणजेच सांस्कृतिक प्रतिगामीपणाला सर्वागीण आणि सर्वस्तरीय विरोध करायचा सोडून, आर्थिक डाव्यांना त्यांची आवडती, आहेरे-नाहीरे कॅटेगरी अगोदर आठवते आणि भ्रामक पुरोगामीपणाची कहाणी सुरू होते.

वर्गवाद फसल्यामुळे सरभर होऊन, आर्थिक-डावे आता सांस्कृतिक क्षेत्रात ‘वर्गयुद्ध’ शोधून काढू लागतात. धर्मसंस्थेलाच सौम्यतर करण्याऐवजी, ते धार्मिक अल्पसंख्याक हा अन्यायग्रस्त गट मानून त्यांचे धार्मिक बहुसंख्याकांपासून संरक्षण करण्याला, पुरोगामी-धर्मकारण समजू लागतात. पण पुन्हा एका वेगळ्या अर्थी, धर्माधर्माच्या जाळ्यातच अडकतात. आपल्याला जातीसंस्थाच नको आहे हे विसरून ते उच्चजातींच्या विरोधात निम्नजातींना उभे करून जातीसंघर्ष वाढवण्याला, जातीसंस्थेचा अंत करण्याचा मार्ग समजतात. जातिनिर्मूलनाच्या नावाखाली जातिदृढमूलन करून जातिद्वेषाचे राजकारण करत राहतात. स्त्री-प्रश्नांकडेही शत्रूकेंद्री भूमिकेतून पाहिल्यामुळे स्त्रियांच्या मानवी-कल्याणापेक्षा पुरुषविरोधी स्त्रीवाद ते स्वीकारतात. पुरुषांच्या माजोरीपणाचा पराभव केला पाहिजेच पण त्याच वेळी स्त्री-पुरुष पूरकतेची विधायक बांधणीही केली पाहिजे, हे ते विसरतात. खरे तर स्त्री हा आख्खाच गट अन्यायग्रस्त असत आलेला आहे. विशेष म्हणजे प्रत्येकच धर्मात, जातीत, वर्गात स्त्रिया असल्याने स्त्री चळवळ ही खऱ्या अर्थाने सार्वकि मानवी होऊ शकत असते. पण आर्थिक डावे त्यात धर्मनिहाय-स्त्रीवाद, दलित-स्त्रीवाद, अब्राह्मणी-स्त्रीवाद, श्रमिक-स्त्रीवाद, शेतकरी-स्त्रीवाद, आदिवासी-स्त्रीवाद असे फाटे फोडून ठेवतात.

विविधता या गोष्टीला खऱ्या सांस्कृतिक-पुरोगामी दृष्टीने महत्त्व आहेच. पण जर अमानुष प्रथा असतील तर त्या बहुसंख्याकांच्या आहेत की अल्पसंख्याकांच्या? निम्नगटांच्या आहेत की उच्चगटांच्या? याच्या निरपेक्ष त्यांचा प्रतिकार व्हायला हवा. पण आर्थिक डावे, निम्न म्हटल्यावर पोटाशी घेणे, ही सवय चालू ठेवतात. शहरे विरुद्ध खेडी ही भूमिका घेतली आणि खेडय़ांची बाजू घेतली की त्यातून, गावगाडा, जातपंचायत अशा त्याज्य गोष्टींचीही बाजू घेतली जाते. आर्थिक-डावे आपला शत्रूकेंद्री विचार घेऊन जेव्हा सांस्कृतिक क्षेत्रात उतरतात तेव्हा धर्मात फूट, जातींत फूट, प्रांतांत फूट, स्त्रियांत फूट, कामगारांत फूट, भाषकांत फूट असा सार्वत्रिक फुटीरपणा वाढवून ठेवतात.

मुळातला जो खलनायक म्हणजेच बहुसंख्याकांच्या धर्मातला, उच्चवर्णामधला, ‘ओरिजिनल’ सांस्कृतिक प्रतिगामीपणा असतो, तो या प्रति-प्रतिगामित्वांच्या झंझावाताने, शमण्याऐवजी उलटा पवित्रा घेऊन अधिकच भडकतो. शत्रूकेंद्री मंडळी आपापल्या लाडक्या-शत्रूला सतत जिवंत ठेवण्याचे काम करत असतात. पण ही लढत दोन वेगळ्या गटांच्या प्रतिगामीपणांमधली लढत आहे हे विसरून ती भ्रामकपणे ‘प्रतिगामी विरुद्ध पुरोगामी’ लढत म्हणून गणली जात राहते.

सांस्कृतिक नवता, सुधारणा, आधुनिकता यांचा प्रवास जास्त जास्त समावेशक व्हायला हवा. पण आर्थिक- डावे- भ्रामक- पुरोगामी अस्मिताबाजीला अधिकाधिक संकुचित (पॅरॉकिअल) रूप देत गेले. कोणाचे तरी वर्चस्व सिद्ध करण्यासाठी स्वतकडे निम्नत्व (!) ओढवून घेण्याची स्पर्धा लागली. वगळत जाणे व वगळले जाणे याने राष्ट्रीय एकात्मतेचा जो विचका होत राहिला होता, तो निस्तरणे हेही आवश्यकच होते. यासाठी फुटीर अस्मितांना शह देणारी एक जास्त समावेशक अस्मिता उभी राहणे ही एक स्वाभाविक प्रतिक्रिया होती. आणि ही समावेशक अस्मिता म्हणजेच खुद्द हिंदुत्ववाद होय. परंतु हिंदुत्ववाद्यांतल्या दुष्प्रवृत्ती कशा आटोक्यात आणणार? आर्थिक-उजव्या व खऱ्या-पुरोगाम्यांनी जोम धरला पाहिजे!

लेखक तत्त्वज्ञान व सामाजिक शास्त्रांचे आंतरविद्याशाखीय अभ्यासक आहेत. ई-मेल

rajeevsane@gmail.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व विरोध-विकास-वाद बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Article about economic left to low retrograde

ताज्या बातम्या