गोऱ्या कातडीचा अपराधगंड

एग्झिस्टेन्शियलिझम म्हणजे असारसत्तावाद. इसेन्स मानला की हुकलेच अशी धारणा, ही पहिली लाट होती.

राजीव साने

आपल्या एनजीओंना फंड्स व आपल्या विद्यापीठात फॅड्स कोठून येतात? आधुनिकतेचे अध्वर्यू देश, इस्लामिक प्रथा का चालवून घेतात? ‘ट्रम्पयेणे आपल्याला का झोंबते?

गोऱ्या लोकांनी वसाहतवाद, कृष्णवर्णीयांवर अन्याय, ज्यूंची कत्तल, जपानवर अणुबॉम्ब, मध्यपूर्वेत तेल-राजकारण अशी अनेक पापे केलेली आहेत. ख्रिश्चन धर्मात पाप ही भावना तीव्र असते. या सगळ्याचा परिणाम म्हणून व्हाइट-गिल्ट नावाचे भूत त्यांच्या मानगुटीवर बसले आहे. आपण बुद्धिप्रामाण्यवादी असूनही हिटलर घडलाच कसा, या प्रश्नाने दुसऱ्या महायुद्धानंतर त्यांना जे स्मशानवैराग्य आले, त्यावरून बुद्धिप्रामाण्यवादातच काही तरी घोटाळा आहे, असे अनेक दावे पाश्चात्त्यांना घेरत गेले. एग्झिस्टेन्शियलिझम म्हणजे असारसत्तावाद. इसेन्स मानला की हुकलेच अशी धारणा, ही पहिली लाट होती. त्यानंतर आधुनिकोत्तर-वाद  (पोस्ट-मॉडर्निझम) ही लाट आली. प्रमाण-अप्रमाण असे काही मानणे म्हणजेच उच्चनीच भेदभाव  करणे असते! म्हणून कशालाच प्रमाण मानू नये अशी धारणा पोस्ट-मॉडर्निस्टांनी पसरवली. किंबहुना चूक-बरोबर ही कोटी वापरणे म्हणजे त्या त्या संदर्भातल्या सत्ताधाऱ्यांची तळी उचलणे असते असेही (मार्क्‍स-सदृश) ते मानू लागले. आता तर खरे/खोटे हा भेद संपला असून पोस्ट-ट्रथ युग  आले आहे असाही दावा केला जातो. यातून सापेक्षतावाद पसरला. किळसवाणे असेल तेसुद्धा सुंदर मानले पाहिजे ही विकृती त्यातून पुढे आली. बरोबर काय आणि चूक काय हे संस्कृतीसापेक्ष असते म्हणून कशालाही चूक म्हणणे, हे गोऱ्या संस्कृतीने इतर संस्कृतींवर लादणूक करणे ठरते! म्हणून जे लोक आधुनिकपूर्व संस्कृतीत जगतात, त्यांना ‘आपले’ निकष लावू नयेत, अशी भावना पसरली. यामुळे बहुसंख्यांनी केला तर तो एथ्नोसेन्ट्रिझम आणि अल्पसंख्यांनी केला तर तो मात्र कल्चरल प्लूरॅलिझम अशी, आपले ते कार्टे व दुसऱ्याचा तो बाब्या छाप, उफराटी वृती स्वीकारली गेली. फॅशनेबल डावेपणाचे कौतुक ही गोष्ट विद्यापीठे आणि पत्रकारिता या क्षेत्रांना लवकर झपाटते. हे तेथेही घडले. त्यात रॅडिकल फेमिनिझम म्हणजे जहाल स्त्रीवाद ही भर पडली. स्त्री-व्यक्तीची कोणतीही समस्या, ती स्त्री असल्यानेच असते व दुष्प्रवृत्ती या पुरुषीपणातूनच उद्भवतात, असे गृहीत धरून शिवाय स्वत: पुरुषाप्रमाणे बनू पाहणे व कोरडे बनू पाहणे, हा घोळ त्यांनी घातला. स्त्रीवादी ज्ञानशास्त्र वेगळे असते असे शोध लावले. एलजीबीटीक्यू व्यक्तींना हीन लेखू नये हे योग्यच आहे. पण आपण त्यापैकी नाही हा जणू अपराध आहे अशा थाटात व्हाइट- स्ट्रेट- मेलना हॅरॅस केले जाऊ लागले. कॅनडाने तर लिंग-वाचक सर्वनामे वापरण्याला बेकायदाच ठरवले. कुणालाही ‘ऑफेन्सिव्ह वाटेल’ असे उद्गार तोंडून जाऊ नयेत याचा धसका निर्माण केला गेला. ही सर्व बुद्धिप्रामाण्य नाकारणारी अनागोंदी वाढल्याने आणि व्हाइट-गिल्टचे परिमार्जन करण्याच्या भरात युरोपात शिरणारे मुस्लीम स्थलांतरित बेसुमार वाढू दिले गेले. इतकेच नव्हे तर त्यांच्यात्यांच्यात चालणाऱ्या अत्याचारांच्या फंदात गोऱ्यांनी पडू नये, इथपर्यंत मजल मारली गेली.

शब्दांत काय काय आहे?

आजकाल ‘पोलिटिकली करेक्ट’ बोलणे शिकून घ्यावे लागत आहे. येथे करेक्ट म्हणजे मूळ अर्थाला लिशपिशीत, गद्य किंवा टेक्निकल करून टाकणाऱ्या टर्मिनॉलॉज्या शोधून काढणे. एखाद्या स्त्रीला स्लिम किंवा थिन म्हणावे तर ‘पुरुषप्रधान क्रयवस्तुवादी समाजाने रचलेला सक्त-आदर्श पाळून स्वत:चे प्रदर्शन करणारी’ एवढा मोठ्ठा आरोप तिच्यावर होऊ शकतो! त्यामुळे फिट, अ‍ॅजाइल, टोण्ड किंवा हेल्दी म्हणायचे. मराठीत तर मोठीच पंचाईत आहे. कमनीय? छे! छे! ‘लोडेड’ शब्द आहे. अमेरिकेत ग्रुप फोटो काढायचा म्हणून बुटक्यांनी पुढे या असे म्हणता येत नाही. शॉर्ट किंवा बुटका हा शब्द अवमानकारक आहे. मग काय म्हणणार? व्हर्टिकली चॅलेंज्ड? वेल! प्लीज सी दॅट नोबडीज फेस इज ऑबस्ट्रक्टेड!!

परकीय- घुसखोर म्हणायचे नाही. अनोंदित-शरणार्थी म्हणायचे! प्रोटेक्टिव्ह डिस्क्रिमिनेशन (रक्षणात्मक भेदभाव)ला अफम्रेटिव्ह अ‍ॅक्शन (सकारात्मक कृती)! सेम-सेक्स-मॅरेज नाही तर मॅरेज-इक्वालिटी! एकुणात सेक्स हा शब्द आरपार टाळून जेण्डर हाच वापरला पाहिजे. कारण (?) असे की शारीरिक फरक क्षुल्लक असून ‘सामाजिकरीत्या रचीव स्वभान’ असल्यानेच आपण स्वत:ला स्त्री किंवा पुरुष असे समजत असतो! माझा एक सीनियर मार्क्‍सवादी मित्र नेहमी इंग्लिशमधूनच जगत असे. तो एकदा म्हणाला तुमची मराठी (हा स्वत: मराठीच होता) फारच मेल-शॉव्विनिस्टिक आहे. लैंगिक काय म्हणता? थोडय़ा वेळाने माझ्या लक्षात आले की, तो लिंग हा शब्द शिश्न याच अर्थाने घेत होता! यावर मी उत्तरलो, ‘म्हणजे हिंदी ही स्त्रीवादी दिसतेय.. कारण हिंदीत यौन संबंध म्हणतात!’ बंगाली व्याकरणात तर लिंग नसतेच! मग (पूर्वीपासूनच) बंगाली लोक समतावादी होते की काय?

कोणालाही ऑफेन्स ‘वाटेल’ (म्हणजे वाटणाऱ्या/रीवर अवलंबून) असे बोलायचे नाही. मायक्रो-अग्रेशन्स म्हणजे सूक्ष्म हल्ले! समजा शास्त्रीयदृष्टय़ा अपरिहार्यच असले तर अगोदरच ट्रिगर वॉर्निग दिली पाहिजे. उदा. ‘कदाचित अवमानकारक वाटेल पण तसा हेतू नाही.’ अमेरिका असे म्हटले तरी मायक्रो-अग्रेशन होऊ शकते. यूएसए असेच म्हटले पाहिजे. कारण अमेरिका खंडात दक्षिण-अमेरिकाही येते. तिचा वेगळा उल्लेख न झाल्याने ती ‘मार्जिनलाइझ’ होते.

मार्जिनलायझेशन हा आता परवलीचा शब्द आहे. अनुल्लेख किंवा मजकुरात न येता जणू समासात येणे, अशा अर्थाने हा शब्द बनला. जर तुमचे दमन (ऑप्प्रेशन) होत नसेल किंवा तुमचे शोषण (एक्सप्लॉइटेशन) होत नसेल किंवा पदरी वंचितता (डिप्रायव्हेशन) येत नसेल तरी तुम्हाला परिघावर ढकलले जाण्याची संधी असतेच असते. कुठे केंद्र मानून किती त्रिज्येचे वर्तुळ काढले की तुम्ही परिघावर आहात? हे शोधायला कितीही वर्तुळे काढता येतात. मीसुद्धा अन्यायग्रस्तच असे म्हणता येण्यासाठी ही मोठीच सोय झालेली आहे. चूक दाखवणे हे द्वेषमूलक वक्तव्य (हेट-स्पीच) होऊ शकते. गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंड हे शब्द वापरलेत तर तुम्ही समिलगीयांना मार्जिनलाईझ करू शकता. म्हणून लव्हर किंवा पार्टनर असे जेण्डर-न्यूट्रल शब्दच वापरले पाहिजेत. एखाद्या स्त्रीला हार्डवर्कर म्हणणे म्हणजे हाऊसवाइफ्सना मार्जिनलाईझ करणे.

आपण भारतीयही याबाबतीत फार मागे नाही आहोत. प्रतिष्ठा न म्हणता सामाजिक-दर्जा म्हणतो. जात न म्हणता समाज किंवा वर्ग, अपंग न म्हणता दिव्यांग, शेतकरी न म्हणता बळीराजा/ अन्नदाता असे म्हणतो. झुंडशाहीला जन-सुनावणी तर शुद्ध दादागिरीला ‘आवाजी मतदानाने बिनविरोध’ निवडणूक म्हणतो. अरब न म्हणता मध्यपूर्व, मुस्लीम न म्हणता अल्पसंख्याक म्हणतो. पंतप्रधान स्वत:ला प्रधान-सेवक म्हणतात! शिवाय मातांनो आणि भगिनींनो, म्हाताऱ्याला ज्येष्ठ नागरिक, बोंबलत फिरणाऱ्यांना कार्यकत्रे वगैरे. बेसूर झालास/ झालीस असे नाही तर ‘स्वरांकडेही जऽरा जास्त लक्ष दिले पाहिजे!’. श्रीमंत किंवा ब्राह्मण या दोन्हींना अभिजन म्हणतो. उरलेल्यांना बहुजन म्हणतो. जरासे सोफेस्टिकेशन दिसले तर त्याला अभिजनवाद म्हणतो.

सुशब्दीकरण (यूफेमिझम) ही सुद्धा काहीशी आवश्यक गोष्ट आहे. पण त्या नादात आपली प्रकृती, वेलदोडय़ाने थंड आणि लवंगेने उष्ण, अशी नाजूक करून घेणे हे घातक आहे. ग्रस्ततागंड जोपासणे आणि तथाकथित ग्रस्तांची निव्वळ शाब्दिक चमचेगिरी करणे याला माझा आक्षेप आहे.

न म्हणता, पण म्हणून घेणे

इंग्लिशमध्ये पॅरालेपिसिस (पॅरालिसिस नव्हे) नावाचा एक अलंकार आहे. त्यात ‘मी असे म्हणत नाही की’ या अर्थाचे शेपूट लावून जे म्हणायचे असते ते म्हणून घेतले जाते. यात लेखक, वक्ता किंवा संपादक स्वत:ला सुरक्षित करून घेत असतो. ‘..असे लोकांना वाटले तर त्यांचे फारसे चूक म्हणता येणार नाही’, ‘सन्माननीय अपवाद वगळता’, ‘फारसे वावगे ठरू नये’, ‘–असा निष्कर्ष घाईघाईने काढणे योग्य नाही’, ‘यातही फारसा अर्थ नसला तरी पण’ अशा फ्रेजेस दिसतात; तेव्हा खरोखर काय म्हणायचे आहे, हे खरे तर कळत असते! समजा तुम्ही काँग्रेसला झोडत असाल तर मध्येच एखादे वाक्य ‘अर्थात भाजपही याला अपवाद आहे असे नाही’. असे टाकून ठेवले की निष्पक्षपणाचा दावा टिकवून ठेवता येतो. ‘लेकी बोले सुने लागे’ या म्हणीचा वापरही विविध तऱ्हांनी करता येतो. उदाहरणार्थ बाकी काही सुचले नाही तर ट्रम्प किंवा पुतिनवर घसरायचे.

गोऱ्या कातडीचा अपराधगंड जसा पाश्चात्त्यांना फॅशनेबल डावे बनवतो तसाच भारतात उच्चवर्गीय किंवा वर्णीय असल्याचा अपराधगंड त्यापैकी काहींना फॅशनेबल डावे बनवत आहे. उद्योग-जगतामध्ये जरी नसला तरी अ‍ॅकेडेमिक व जर्नालिझमच्या ‘जगता’त फॅशनेबल डावेपणा हाच ‘प्रस्थापित सत्ताधारी’ राहिलेला आहे. खोटेपणा कोठून येतो? याचे एक उत्तर लक्षणार्थाने ‘गोऱ्या कातडीचा अपराधगंड’ हे आहे!

लेखक तत्त्वज्ञान व सामाजिक शास्त्रांचे आंतरविद्याशाखीय अभ्यासक आहेत. ई-मेल :  rajeevsane@gmail.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व विरोध-विकास-वाद बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: High level discrimination islamic practices radical feminism

ताज्या बातम्या