कटुता व हीनगंडाचे ‘आतून’ निरसन

धार्मिक-मूलतत्त्ववादात जसा कडवा त्वेष (फॅनॅटिसिझम) असतो तसा त्वेष, सर्वच राजकीय-मूल्यप्रणाल्यांमध्ये वाढतच चाललेला आहे.

(संग्रहित छायाचित्र)

राजीव साने

जे कोणी ‘लेबल-अंधते’पोटी, दूरान्वयाने हिंदुत्वसंबंधित असलेल्यांनासुद्धा, सरसकट ‘सेक्युलरिझमचे काफीर’ ठरवतात, ते अपप्रवृत्तीच बळकट करतात.

धार्मिक-मूलतत्त्ववादात जसा कडवा त्वेष (फॅनॅटिसिझम) असतो तसा त्वेष, सर्वच राजकीय-मूल्यप्रणाल्यांमध्ये वाढतच चाललेला आहे. त्यांच्यात आशयातले फरक कमी पण लेबलांचे तेजोवलय (फेटिश)च जास्त आहे. सत्तास्पर्धेच्या नादात सर्वच पक्ष, मग ते प्रांतीय असोत, काँग्रेस असो, भाजप असो वा डावे-पुरोगामी असोत, एकमेकांतल्या अपप्रवृत्ती वाढवून ठेवत आहेत. काय केले पाहिजे? अशा प्रस्तावांऐवजी समोरचा कसा हलकट आहे, हे जास्त ठासून कसे सांगता येईल, यावरच सर्वाचा भर आहे. विकास, सुशासन आणि गरीब-कल्याण योजना या गोष्टी नको आहेत, असे कोणीच म्हणणार नाही. या गोष्टी सर्वानाच हव्या आहेत, पण त्या अमुकच्या किंवा तमुकच्या ‘अशुभ’हस्ते होऊ देणार नाही, असाही सर्वाचाच निर्धार दिसतो. विखारी वातावरणात विधायकतेला कमी वाव राहतो. विखार अगोदर कोणी पसरवला यावरचे दावे/प्रतिदावे फिजूल आहेत. कोणतीही दुष्प्रवृत्ती ज्या कोणी सुरू केली त्यांनीच ती थांबवली पाहिजे, असा आग्रह धरला तर थांबवण्यात पुढाकार घेणार कोण? पण विखारी वातावरणात राजकीय अपप्रवृत्ती वाढत जातात. कोणत्या अपप्रवृत्ती प्रचलित आहेत?

टोकनिझम म्हणजे नाममात्र लाभ देणे, प्रतीकात्मक मागण्या याच मुख्य मागण्या बनणे, जणू लोकशाहीच धोक्यात आलेली आहे (किंवा राष्ट्रच धोक्यात आलेले आहे), असे विविध भयगंड पसरवले जाणे, जाती-अस्मितांचा डोंब उसळू दिला जाणे, अशा अनेक अपप्रवृत्ती टिकून आहेत. मायबाप सरकारने फुकटेगिरीला वाव द्यायचा आणि स्वयंघोषित निराधारांनी/ग्रस्तांनी कोण काय ‘देतो’ यावर मते द्यायची, हा अनुरंजनवाद चालूच राहात आहे.

विधायक कामे होतच नाहीयेत असे नाही. सरकारी व बिगर-सरकारी माध्यमांतून बरेच काही सकारात्मकही घडते आहे. इन्फ्रास्ट्रक्चर, ऑनलायनीकरण, ई-ट्रान्झॅक्शन्स, कर भरणाऱ्यांची संख्या वाढणे, कंपन्यांचे व बँकांचे गैरकारभार उघडकीस येणे, त्यांच्यावर कारवाई सुरू होणे, जलयुक्त शिवारसारख्या योजना सरकारी आणि चळवळींच्या स्वरूपात पुढे येणे, अशा कित्येक आशादायक गोष्टीही घडत आहेत. पर्यटनात आघाडी मारण्याबाबत, सेवा क्षेत्रातील कामांचे प्रशिक्षण देण्याबाबत, अजून बरेच काही करण्यासारखे आहे. अनेक अडनिडे व निरुपयोगी कायदे रद्द करणे, संसद बंद पाडता येणार नाही अशी तरतूद करणे, अशी बरीच उदाहरणे देता येतील.

हिंदुत्ववाद्यांशी संवाद चालू ठेवणे 

हिंदुत्ववादी व हिंदुत्वविरोधी असे दोन्ही विखार सौम्य करत न्यावेच लागतील, पण त्यासाठी सध्या आपल्या देशात जिचे तातडीने निरसन व्हायला हवे अशी गोष्ट म्हणजे हिंदू लोकांत असलेली कटुता आणि हीनगंड (किंवा पराभूतता-गंड) ही होय. हिंदुत्ववाद ही गोष्ट एकदाची विल्हेवाट लावता येईल अशी, निव्वळ प्रचारामुळे चिकटलेली गोष्ट नसून, ती प्रचंड संख्येने जनमानसात असलेली अस्सल (जेन्युइन) गरज आहे, हे एव्हाना आपल्या सर्वाच्या लक्षात आलेले असेलच. व्यक्तिश: माझा सर्वच समूहवादांना विरोध असल्याने माझा हिंदुत्ववादालाही विरोधच आहे.

तरीही हिंदुत्ववाद्यांना समजावून देण्या/घेण्यासाठी मी संवाद साधत राहतो. कटुता व हीनगंड, हे स्मृती उगाळून वा प्रतीकात्मक सूड घेऊन, निरस्त होत नाहीत. हे माझे म्हणणे, तर सावधगिरी म्हणून संघटित राहिले पाहिजे, हे त्यांचे म्हणणे असते. या आंतरक्रियेतून मला त्यांच्यातले बरेच उपप्रवाह व अंतर्वरिोध समजत जातात.

माझ्यापुरते बोलायचे तर मला हिंदू असण्याचा अभिमान जरी नसला तरी ‘दिलासा’ आहेच आहे. उदाहरणार्थ मी लिहिलेले ‘नवपार्थहृदगत’ हे पुस्तक लिहिल्याबद्दल माझ्यावर सडकून टीकासुद्धा झाली नाही. पुरोगाम्यांनी गीताच भंकस आहे तर त्यावर काय वाचायचे? असे म्हणून ते पुस्तक वाचलेच नाही. उलटपक्षी आध्यात्मिक वर्तुळांमध्ये माझे मत अजिबात न पटणाऱ्या लोकांकडूनसुद्धा मला निमंत्रणे येतात व लोक न चिडता माझे ऐकून घेतात व त्यांची मतेही मांडतात. यात विशेष असे काय आहे? जे ते पुस्तक वाचतील त्यांना, अशा चच्रेला किती सहिष्णुता लागते, याची चांगलीच कल्पना येईल. निदान आजच्या जगात तरी, रिलिजन गणला गेलेला अंतर्गतरीत्या सर्वात लिबरल प्रवाह, हिंदू हाच आहे. हे जगाच्याही दृष्टीने चांगलेच असले तरी राजकीय-हिंदुत्ववादी बनण्याचे ते समर्थन होऊ शकत नाही. कारण व्यापक का होईना, पण जमातवाद हा जमातवादच असतो. हिंदुत्ववाद्यांत धार्मिकतेकडे परत जाऊ पाहाणारे, संस्कृतिरक्षक, गोहत्या रोखण्याच्या नावाखाली मनुष्यहत्या करणारे गायगुंड, मुस्लिमद्वेष करणारे, असे घातक घटक आहेत. जसे इस्लामिक धर्मगुरूंचा अनुनय करणे चूक आहे तसेच हिंदुत्ववाद्यांतल्या झुंडशहांचे चालू देणे हेही चूकच आहे. त्याच वेळी हिंदुत्ववादी गणला गेलेला अख्खा स्पेक्ट्रम तसा कडवा नाही हे नेहमीच लक्षात ठेवले पाहिजे. उदारमतवादी नवतावादी प्रवाह लक्षणीय आहे. म्हणूनच हिंदुत्ववाद्यांच्यात उदारमतवादी प्रभाव वाढवणे गरजेचे आहे.

‘हिंदूहित’: उगम आणि सद्य:स्थिती

स्वातंत्र्यपूर्व काळात (आणि ब्रिटिशपूर्व काळातसुद्धा) हिंदू हा पराभूत व आघातबाध्य (व्हल्नरेबल) समुदाय होता. शिवाजी महाराज व थोरले बाजीराव हा मोठा अपवाद असला तरी तो टिकू शकला नाही. देश स्वतंत्र करताना तो कोणत्या सत्तेकडे द्यायचा, हा प्रश्न ब्रिटिश विचारत होते. त्यावर जे जे प्रस्ताव मांडले गेले ते हिंदूहिताला राजकीयदृष्टय़ा घातकच होते. केंद्राला नाममात्र सत्ता, राज्ये सत्तावान, संस्थानिक स्वतंत्रच, मुस्लिमांना संसदेत ५०% जागा आणि घटना इहवादी नाही; ही शक्यता किती भयंकर होती हे जाणल्याशिवाय, आपण फाळणी ही किती शुभ घटना होती, हे जाणू शकत नाही. म. गांधीजींना उगाचच दोष देणे ही चूक अजूनही काही हिंदुत्ववादी करतात. सावरकरांचा हिंदुत्ववाद हा लोकसंख्येच्या प्रमाणात जागा इतकाच होता. संस्थानिकांबाबत माऊंटबॅटन आणि सरदार पटेल यांनी मोलाची भूमिका बजावली; पण सर्वात जास्त हिंदू-हित-दक्ष ठरले ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरच. कारण त्यांनी धर्माधिष्ठित राखीव जागा ही कल्पना निर्धाराने हाणून पाडली.

पण हिंदूंच्या मनात पराभूततेचे शल्य व कटुता तशीच राहिली. त्यात सर्वधर्मसमभाव आणि अल्पसंख्याक या नावाने जे राजकारण केले गेले त्यामुळे ‘हिंदूहित’ हा मुद्दा आजपावेतो घर करून राहिला आहे. दुसरे असे की, जेव्हा मूल्यप्रणाल्यांचा आशय क्षीण होत जातो तेव्हा लोकशाहीत द्विध्रुवीय स्पर्धा अपरिहार्य बनते. देशभर आपातत: हिंदुत्ववाद हा ‘काँग्रेसेतर ध्रुव’ म्हणून उभा राहिला, म्हणून व्यापक बनला. मुळात हिंदुत्ववाद्यांत बरेच प्रवाह आहेत. ते सगळेच सनातनी नाहीत. कित्येक बिगर-जमातवादी इहवादीसुद्धा, इस्लामचे जागतिक संकट (भारतीय मुस्लिमांचे नव्हे) मान्य असल्याने व इहवाद नि:पक्षपाती असला पाहिजे या भावनेने, हिंदुत्ववाद्यांत आहेत. आता तर काय राजकीय स्पर्धेचा पर्याय म्हणून कशाच अर्थाने हिंदुत्ववादी नसलेले लोकही त्यांच्यात आहेत. याशिवाय बिगर-हिंदुत्ववादी लिबरल ‘मेरिटोक्रॅटिक’ विचारांचे लोक, तसेच विकास व सुशासन हवे असणारे लोकही आहेत.

राजकीय पक्ष एकमेकांवर कुरघोडय़ा करताना अतिरेकी घोषणा करतच असतात. ‘लोकशाही धोक्यात आहे!’ ही घोषणा तशापैकी एक आहे. निवडणूक आयोग, रिझव्‍‌र्ह बँक, न्यायालये, माध्यमे आपापली स्वायत्तता निदर्शनास आणून देत आहेत. अशा संस्थांवर अल्पांशाने पडणारे राजकीय प्रभाव नेहमीच पडत आलेले आहेत. ज्यांनी १९७५ ची आणीबाणी अनुभवलेली आहे, त्यांना सध्यासुद्धा आणीबाणीच आहे असे वाटण्याचे खरे तर  कारण नाही. आता संपर्कक्रांतीच्या या टप्प्यावरचा आणि नागरी स्वातंत्र्याची चव चाखलेला भारतीय नागरिक कोणाच एका पक्षामुळे गुलाम बनणारा नाही. आपण अस्थिर सरकारे आणि स्थिर सरकारे अशी दोन्ही अनुभवलेली आहेत. सामान्यत: अस्थर्य जेव्हा पराकोटीला जाते तेव्हा लोकशाही धोक्यात येऊ शकते असा सर्व जगाचा अनुभव आहे.

हिंदूंनी प्रथम स्वत:त सुधारणा, जसे की जातवाद काढून टाकणे, स्वत:च धार्मिक सवलती न मागणे, मुख्य म्हणजे भूतकाळात अडकून न राहणे, या केल्या पाहिजेत. कटुता आणि हीनगंड यांचे निरसन केले पाहिजे व आधुनिकतेचा स्वीकार केला पाहिजे; पण हिंदुत्ववाद्यांत कटुता आणि हीनगंड टिकवून ठेवणारे घटकही आहेत. त्यामुळे आता प्रश्न असा आहे की, त्यांच्यातले सौम्यवादी, इहवादी, आधुनिकतावादी व विकास-सुशासनवादी बळकट कसे होतील?

अर्थात हे काम, हिंदुत्ववाद्यांशी मत्रीपूर्ण राहून करायचे की फटकून राहून? हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे; पण हा प्रश्न जन्ममरणाचा किंवा अकटोवाविकटोवा प्रश्न आहे, असे जे भासवले जात आहे, ते अनाठायी आहे. अमेरिकेत डेमोक्रॅटिक/रिपब्लिकन हा भेद जसा मूलगामी नसून मर्यादित आहे, तसा भारतात ‘भाजप की बिगरभाजप?’ हा प्रश्नही सौम्य बनला पाहिजे आणि तो सौम्य बनावा या दिशेने संवाद वाढविला पाहिजे.

(समाप्त)

लेखक तत्त्वज्ञान व सामाजिक शास्त्रांचे आंतरविद्याशाखीय अभ्यासक आहेत. ई-मेल :  rajeevsane@gmail.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व विरोध-विकास-वाद बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Inner solution of bitterness and inferiority

ताज्या बातम्या