चंद्रकांत बच्छाव

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या खांद्याला खांदा लावून उभे राहिलेले आंबेडकरी चळवळीचे अध्वर्यू दादासाहेब गायकवाड यांच्या ५० व्या स्मृतिदिनानिमित्त..

lokrang article, Maharshi Vitthal Ramji Shinde, maharshi shinde centenary golden jubilee year, prarthana samaj, centenary golden jubilee year, bramho samaj, depressed classes mission society, Asprushata Niwaran Parishad, Bhartiya Asprushyatecha Prashna, work for depressed class, maharshi vitthal ramji shinde, 23 april 2024, reformer,
निमित्त : समर्पित समाजसुधारक
solapur dr babasaheb ambedkar jayanti 2024
डॉ. आंबेडकर जयंतीचा सोलापुरात अखंड उत्साह
balmaifal, symbol of revolution, dr ambedkar balmaifal
बालमैफल: क्रांतीचे प्रतीक
Narendra Modi death threat
“जगभरात मोदींच्या हत्येचा कट”, भाजपाच्या नेत्याचं खळबळजनक विधान; म्हणाले, “मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तर…”

कर्मवीर दादासाहेब गायकवाड हे आंबेडकरी चळवळीतील जनमानसातील लोकनेते होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आणि त्यांचे दलितोद्धाराचे महान कार्य खेडय़ापाडय़ांतील  दलित समाजातील लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम त्यांनी केले.  दादासाहेब कुशल संघटक होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची दलितोद्धाराची चळवळ दादासाहेबांनी अतिशय जिद्दीने व प्रचंड ताकदीने पुढे नेली. दादासाहेब हे दलित चळवळीचे खऱ्या अर्थाने सरसेनापती होते. डॉ. बाबासाहेबांचे आदेश मिळताच जणू त्यांच्या अंगात वीज संचारायची व दुसऱ्याच क्षणी ते कामाला लागायचे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली दादासाहेबांनी १९२७ चा महाडचा सत्याग्रह, १९२८ चे महार वतनविरोधी आंदोलन, १९३०-३५ चा काळाराम मंदिरप्रवेश सत्याग्रह, १९३१ चा मुखेडचा सत्याग्रह, १९३५ ची धर्मातराची येवला परिषद, १९३६ सालची मजूर पक्षाची स्थापना, १९४२ सालची शेडय़ुल्ड कास्ट फेडरेशनची स्थापना, १९५० साली दलितांना जमिनी मिळाव्यात म्हणून मराठवाडय़ात सत्याग्रह, पुन्हा १९५४ साली मराठवाडय़ात भूमिहीनांना जमीनवाटप व्हावे म्हणून सत्याग्रह व शेवटी १९५६ सालची नागपूर येथील धर्मातर परिषद इत्यादी चळवळी अतिशय समर्थ व प्रभावीपणे चालविल्या. यातून दादासाहेबांचे नेतृत्व शंभर नंबरी सोन्यासारखे उजळून निघाले. नि:स्वार्थी व निरपेक्ष लढवय्या म्हणून डॉ. बाबासाहेब हे दादासाहेबांकडे आदराने व आपुलकीने पाहात.

२० सप्टेंबर १९३७ रोजी वडाळा येथे नासिक जिल्हा युवक संघाने आयोजिलेल्या समारंभात दादासाहेब गायकवाडांना मानपत्र अर्पण करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की, ‘‘मी यदाकदाचित माझे आत्मचरित्र लिहिले तर त्यात अर्ध्यापेक्षा अधिक भाग भाऊरावांचा असेल.’’

प्रभावी वक्ता, तळमळीचा समाजसेवक, गरिबांचा वाली, धुरंधर राजकारणी, कुशल संसदपटू, अन्यायाविरुद्ध पोटतिडकीने लढणारा योद्धा, कुशल संघटक, काळाची पावले ओळखून अचूक निर्णय घेणारा मुत्सद्दी, सामाजिक चळवळीची जाण असणारा लोकनेता व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा एकनिष्ठ अनुयायी व परमशिष्य म्हणून दादासाहेब गायकवाड सर्वाना सुपरिचित होते.

दादासाहेबांचा जन्म १५ ऑक्टोबर १९०२  रोजी नाशिक जिल्ह्यातील आंबेगावी एका सधन शेतकरी कुटुंबात झाला. लौकिक अर्थाने ते फारसे शिकलेले नव्हते, परंतु कोणत्याही सुसंस्कृत व सुशिक्षित माणसाला लाजवेल एवढे ज्ञान व नम्रता त्यांच्या ठायी होती. १९६८ साली नाशिक येथे दादासाहेबांच्या हीरक महोत्सवानिमित्त आयोजिलेल्या सभेत ‘‘मॅनर्स म्हणजे काय, हे दादासाहेबांकडून शिकावे,’’ असे गौरवोद्गार त्या वेळचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी काढले.

समाजकार्याची आवड असल्याने वयाच्या २१ व्या वर्षी शाहू छत्रपती बोर्डिगमध्ये अधीक्षक पदाची सूत्रे हाती घेऊन दादासाहेबांनी जीवनकार्यास सुरुवात केली. १९२६ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर नाशिक येथे एका खुनाच्या प्रकरणासाठी आले होते, त्या वेळी त्यांचा मुक्काम शाहू छत्रपती बोर्डिगमध्ये होता. तेथे दादासाहेबांचा बाबासाहेबांशी प्रथम परिचय झाला. डॉ. बाबासाहेबांचे आकर्षक व्यक्तिमत्त्व व प्रचंड विद्वत्ता पाहून ते भारावून गेले. बाबासाहेबांनीदेखील आपल्या चाणाक्ष नजरेने या हरहुन्नरी, साहसी, जिद्दी, महत्त्वाकांक्षी व सामाजिक सेवेची आवड असणाऱ्या तरुणास हेरले. दादासाहेबांनीही बाबासाहेबांना मनोमन गुरू करून टाकले. पुढे ही गुरू-शिष्याची जोडी सामाजिक व राजकीय क्षितिजावर दलितांच्या हितासाठी जवळपास ३० वर्षे संघर्ष करत राहिली.

दादासाहेब कसे होते? आपल्या गोरगरीब बांधवांवर आपल्या जेवणाचा बोजा नको म्हणून मागच्या गावाहून जेवून आलोय असे सांगत वेळ मारून नेत. पैशांची बचत व्हावी, इतरांना भुर्दंड पडू नये म्हणून कधी पायी तर कधी सायकल, घोडागाडी किंवा बैलगाडीतून प्रवास करीत. सार्वजनिक जीवनात आपले चारित्र्य स्वच्छ असावे व समाजाकडून जमा होणाऱ्या पैशांची उधळपट्टी करू नये यावर त्यांचा कटाक्ष असे. रेल्वे स्टेशनच्या बाकावर पथारी टाकून ते रात्र काढत, परंतु हॉटेलवर पैसे उधळत नसत. खासदारकीचे सर्व वेतन त्यांनी दर महिन्याला न चुकता नाशिकच्या रमाबाई विद्यार्थिनी वसतिगृहास पाठविले. 

जातिभेद नष्ट व्हावा, याची सुरुवात त्यांनी आपल्या घरापासून केली. दादासाहेबांचे किस्मत बागेतील घर म्हणजे दरबारच होता. खेडय़ापाडय़ातील लोक आपल्यावर झालेल्या अन्याय, अत्याचाराच्या करुण कहाण्या त्यांना सांगत. अतिशय आस्थेने गरिबांचे प्रश्न समजून घेणारा, त्यांच्या हितासाठी लढणारा असा हा अलौकिक नेता होता.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना, सार्वजनिक क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांना वेळोवेळी अनेक पत्रे लिहिली, परंतु दुर्दैवाने त्यातली बरीच कधीच जगापुढे आली नाहीत. परंतु, दादासाहेबांनी मात्र बाबासाहेबांची जवळपास ४६३ पत्रे जिवापाड जपून ठेवली. पुढे त्या पत्रांचा मोठा मौल्यवान व ऐतिहासिक ठेवा शंकरराव खरात यांनी ग्रंथरूपाने प्रसिद्ध केला.

मनुष्यस्वभावाचे अचूक निदान, प्रेमाने माणसे सांभाळण्याची कला व प्रसंगी शत्रूलाही नामोहरम करण्याचे कौशल्य त्यांच्या अंगी होते. पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, लालबहादूर शास्त्री, ना. ग. गोरे, बॅ. नाथ पै, अटलबिहारी वाजपेयी, एस. एम. जोशी, कॉ. एस. ए. डांगे, आचार्य अत्रे, मधु लिमये इत्यादी राष्ट्रीय नेते त्यांच्याकडे अतिशय आपुलकीने व प्रेमाने बघत. यशवंतराव चव्हाण तर त्यांना थोरल्या भावासारखे मानत. लक्ष्मीबाई टिळकांचे तर ते मानसपुत्र होते व कुसुमाग्रजांचे कौटुंबिक मित्र होते.

१९५७ च्या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचे रिपब्लिकन पक्ष म्हणजेच दादासाहेब गायकवाड हे कणा होता. त्या चळवळीच्या सभेत शेवटचे भाषण दादासाहेबांचे असायचे, परंतु श्रोते त्यांचे भाषण ऐकल्याशिवाय हलत नसत. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीमध्ये दादासाहेबांचा सिंहाचा वाटा होता.

१९६२ साली नाशिक शहर मतदारसंघातून लोकसभेच्या जागेसाठी बिनविरोध निवडून जाताना नामांकनपत्र भरण्यापूर्वी यशवंतराव चव्हाण यांनी दादासाहेबांना ‘अर्ज भरू का?’ अशी आदरपूर्वक विचारणा केली होती. ते बिनविरोध निवडून गेले, पुढे संरक्षणमंत्री झाले, तेव्हा त्यांनी दादासाहेबांना विचारले, ‘‘तुम्हाला काय पाहिजे?’’ दादासाहेब म्हणाले, ‘‘बंगलोर येथे होत असलेला मिग कारखाना नाशिकला आणा. त्यामुळे बऱ्याच गरीब व दलित बांधवांच्या नोकरीचा प्रश्न सुटेल. शिवाय स्थानिक लोकांना रोजगारही मिळेल.’’ यशवंतरावांनी तात्काळ हालचाल करून बंगलोर येथे होऊ घातलेला एच. ए. एल. मिग कारखाना ओझर (नाशिक) येथे आणला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर हवालदिल झालेल्या दलित समाजाला दादासाहेबांनी अत्यंत समर्थ व प्रबळ नेतृत्व दिले. १९६४ साली त्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या भूमिहीनांचा देशव्यापी सत्याग्रह ‘न भूतो न भविष्यति’ होता. दादासाहेबांच्या देदीप्यमान कार्याचा तो कळस होता.

१९६७ साली यशवंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाबरोबर समझोता केला तेव्हा दादासाहेबांवर प्रचंड टीका झाली. परंतु, नुसता संघर्ष करून काहीच मिळत नाही, तेव्हा समझोता करून मिळेल ते पदरात पाडून घेऊ या व उरलेल्यासाठी पाहिजे तर पुन्हा संघर्ष करू या, ही भूमिका घेऊन दादासाहेब पुढे गेले. या युतीमुळेच नवबौद्धांना सवलती मिळविणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले. त्यामुळे अनेक दलित नेत्यांना उच्च पदे भूषविता आली. लोकसेवा आयोगांच्या सदस्यपदी नामवंतांची वर्णी लागली. नोकऱ्यांमध्ये अनेक तरुणांना संधी मिळाली. रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्याने अनेक गरीब कुटुंबे सावरली गेली. राजकीय प्रतिष्ठा मिळाल्याने पुढे अनेकांच्या आयुष्याचे सोने झाले. ही युती करताना दादासाहेबांच्या समोर संपूर्ण दलित समाज होता. त्यात त्यांचा कोणताच वैयक्तिक स्वार्थ नव्हता.

दिल्ली येथे लोकसभेच्या आवारात घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा १६ फुटी पुतळा ही एका शिष्याने आपल्या गुरूला वाहिलेली अतिशय भावपूर्ण आदरांजली होय. नागपूरच्या दीक्षाभूमीसाठी १४ एकर जमीन मिळवून देऊन त्या ठिकाणी विहार, पुतळा, कला व वाणिज्य विद्यालय सुरू करण्याची किमयाही दादासाहेबांचीच. चैत्यभूमीची जागा मिळवून देण्यात दादासाहेबांचाच सिंहाचा वाटा होता. किंबहुना, ते चैत्यभूमीचे शिल्पकार होते. 

स्वत:च्या प्रकृतीची तमा न बाळगता ते दलितांच्या हितासाठी संघर्ष करीत राहिले. लोकांनी त्यांना ‘कर्मवीर’ तर भारत सरकारने ‘पद्मश्री’ हा बहुमान प्रदान केला. असा हा गौरवशाली महापुरुष २९ डिसेंबर १९७१ रोजी साऱ्या दलित शोषित समाजाला पोरके करून गेला. या झुंजार व्यक्तिमत्त्वास ५० व्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन!

लेखक मुंबईतील कर्मवीर दादासाहेब गायकवाड सांस्कृतिक केंद्राचे सरचिटणीस आहेत. kdgskmum@yahoo.com