कवयित्री शांता शेळके यांच्या जन्मशताब्दीनिमित्ताने ‘लोकसत्ता’तर्फे केल्या गेलेल्या ‘कविता मनोमनी’च्या आवाहनाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्यातून दर्जेदार कविता निवडण्याचे काम कवयित्री नीरजा आणि कवी दासू वैद्य यांनी केले आहे..

ज्येष्ठ कवयित्री शांता शेळके यांच्या जन्मशताब्दी वर्षांनिमित्तानं ‘लोकसत्ता’नं आयोजित केलेल्या ‘कविता मनोमनी’ या उपक्रमाला भरघोस प्रतिसाद मिळाला. जवळपास बाराशेच्या वर कविता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आल्या. आजकाल माणसं वेगवेगळ्या पातळीवर एकमेकांच्या समोर उभी ठाकली आहेत. कधी राजकीय आखाडय़ात, तर कधी सामाजिक, धार्मिक संघर्षांच्या पटलावर एकमेकांविरोधात बिगूल वाजवताहेत. आज सारं जग युद्धाच्या छायेत आहे. अशा काळात माणसाच्या आत लपलेल्या, बुद्धाच्या करुणेनं आणि गांधींच्या अिहसेनं भरलेल्या संवेदनशील मनांचा शोध घेणाऱ्या ‘लोकसत्ता’च्या या उपक्रमाचं आम्ही मनापासून कौतुक करतो. त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देणाऱ्या संवेदनशील कवींचं मनापासून अभिनंदन!!!

lokrang article, Maharshi Vitthal Ramji Shinde, maharshi shinde centenary golden jubilee year, prarthana samaj, centenary golden jubilee year, bramho samaj, depressed classes mission society, Asprushata Niwaran Parishad, Bhartiya Asprushyatecha Prashna, work for depressed class, maharshi vitthal ramji shinde, 23 april 2024, reformer,
निमित्त : समर्पित समाजसुधारक
An account of the work done in 10 years is presented in BJP resolution
‘मोदी की गॅरंटी’चा जाहीरनाम्यात पुनरुच्चार; भाजपच्या ‘संकल्पपत्रा’त १० वर्षांतील कामांचा लेखाजोखा सादर
piyush goyal
कर्तबगारीने ‘तेजांकित’ झालेल्यांचा गौरव!
president droupadi murmu presents bharat ratna awards at rashtrapati bhavan
राष्ट्रपतींच्या हस्ते भारतरत्न पुरस्कार प्रदान

‘कविता मनोमनी’अंतर्गत आलेल्या कवितांमधील कविता म्हणाव्यात अशा या पंधरा-सोळा कविता वाचकांच्या हाती देताना काही गोष्टी आवर्जून सांगायला हव्यात. या कवींमध्ये गेली अनेक वर्ष लिहिणारे मराठीतले काही कवी आहेत. यावेळचा विषय सामाजिक, राजकीय भान हा होता. सगळ्या कवितांतून ते भान नक्कीच प्रकट झालं. आपल्या मनातली अस्वस्थता, राजकीय आखाडय़ाला आलेलं ओंगळ रूप, सामाजिक प्रश्नांकडे पाहण्याचं गांभीर्य हरवून बसलेली माणसं, युद्धसदृश्य स्थितीसोबतच जात, धर्म, लिंगभावावर आधारलेली विषमता अशा अनेक विषयांवरील कळकळ या कवितांतून प्रकट झाली. तुमच्या मनातली खळबळ आणि अस्वस्थता तुम्ही व्यक्त करण्याचा प्रांजळ प्रयत्न केला. तुमच्या या संवेदनशीलतेमुळे अशा परिस्थितीत माणूसपणावर प्रेम करणारे लोक आपल्या आजूबाजूला आहेत याची खात्रीही पटली. पण कविता या फॉर्मचा विचार करायला हवा. मुक्तछंदात लिहिताना मुक्तछंदाची लय आणि बंदिस्तपणाही जपता आला पाहिजे. आपण वापरतो आहोत तो एक-एक शब्द मोत्याच्या दाण्यासारखा भरीव आणि अर्थवाही असायला हवा. ही काळजी प्रत्येकानं घ्यायला हवी. कविता काय असते ते जाणून घेण्यासाठी मराठीतीलच नाही, तर इतर भाषांतील महत्त्वाची कविता आपल्याला वाचावी लागेल. त्यांच्या पूर्वसुरींनी काय लिहिलंय हे वाचतानाच यापलीकडे जाताना आपल्याला नवं काय सांगता येईल याचा विचार  करायला हवा.

या उपक्रमात सहभागी झालेल्या, पण ज्यांची कविता निवडली गेली नाही त्या सर्वाना चांगली कविता लिहिण्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. कविता हा सर्वात कठीण साहित्यप्रकार आहे हे लक्षात ठेवून कवितेचा गंभीरपणे विचार करा. जास्तीत जास्त वाचा. स्वत:ला व्यक्त होण्यापासून रोखू नका; पण कसं व्यक्त व्हायचं याचा स्वत:च विचार करा. जमलं तर केवळ मराठी नाही, तर भारतीय आणि जगभरातल्या चांगल्या कवितेचा अभ्यास करा. स्वत:ची शैली निर्माण करा. ‘कविता मनोमनी’ या उपक्रमात भाग घेतलेल्या सर्व संवेदनशील आणि सर्जनशील कवींचं मनापासून अभिनंदन. आपल्या मनातली कविता अशीच बहरत राहो, माणसाच्या जगण्याचा आधार होवो, आणि आजच्या अस्वस्थ काळात माणसाला जगण्याची उमेद देवो, हीच सदिच्छा! – नीरजा, दासू वैद्य

ती आणि तिची आधुनिकता..

          मान थोडीशी कलती करून केस विंचरणं

          हल्ली तिने सोडून दिलंय..

          त्याचा आधुनिकतेचा वारा स्वैरपणे

          हिंडतोय तिच्या केसांतून..

          आणि तिच्या ओलेत्या केसांतून

          झिरपतायत असंख्य अर्वाचीन वेदना..

          पुरोगामित्वाच्या दिखाऊ चौकटीत

          गुदमरतोय तिचा श्वास..

          तरीही वर्तमानाच्या कोंडमाऱ्यात

          ती उपसते आहे त्याच्या संसाराचा रहाट..

          आणि आताशा तर..

          त्याच्या नव-हव्यासाच्या

          वेदनांचे घुंगरू करून

          पायात बांधलेत तिने

          आणि तिच्या नित्य नर्तनातून

          मनसोक्त ठसठसतंय समकालीन रक्त..

          तो रोज रात्री आदिम-पूर्ततेने होतो निद्रिस्त

          उद्या परत आधुनिकतेचा कागदी चाफा

          तिच्या केसांत माळायला..

          ती मात्र पहाटपूर्व अंधारात

          कूस बदलत राहते

          आपल्याच आसवांचं मलम लावीत

          त्याच्याच नखांच्या पांढऱ्या ओरखडय़ांवर.. – राजेश गोगटे, ठाणे</strong>

जोहार चोखोबा जोहार!

मध्यरात्र केव्हाचीच उलटली बाबा

डोळ्यात नीज कशी ती नाही बघ

आताशा असंच होतं वारंवार

भूतकाळाचीच वारी मनाच्या सांदीकोपऱ्यात

घुत्कारत राहते घुबडासारखी असह्य होईतो

रोजचंच झालंय हे दुखणं

म्हणून येऊन बसतो तुझ्या पायरीला

कधीतरी आपणच आपली पायरी ओळखून बसावं,

हे बरं नाही का चोखा?

देवबिव असणं ठेव बाजूला..

त्यानं का २२ही साधलं नाही, साधणारही नाही बघ!

‘शेवटी माणूस खरा, त्याची दुतोंडी करणी खरी’

असं म्हटलं त्राग्यानं एकदा वामांगीला

तर-

‘हे पटवून घेतलं इतक्या युगांमध्ये हेही खूप झालं’ म्हणते रखुमाई तुमची

मी तरी कुठे निघून जायचं सांग

सगळा माणूसच प्रेमद्वेषाचा झाल्यावर

कसं जायचं तुला, नाम्याला अन् सावतामाळ्याला सोडून..

तुमची पायरी हाच वणव्यातला विसावा नाही का रे माझ्यासाठी?

अरे बाबा, म्हणून त जोहार घालतो तुला पायरीपाशी आल्या आल्या..

चोखोबा, वेळोवेळी केलास उद्धार,

घातलेस पाठीवर, मनावर चार रट्टे,

शालजोडीतले गोफणगुंडे त असे हाणलेस

की डोळ्याला लागलेली धार खळेना झाली बघ..

बहु भुकेला जाहलो। तुमच्या उष्टय़ासाठी आलो

जन्म गेला उष्टे खाता। लाज न ये तुमचे चित्ता

याहून अधिकचा अवमान तो कोणता रे?

आमुची केली हीन याती। तुज का न कळे श्रीपती

हेही कसं नाकारु चोख्या मला सारं कळूनही..

जीव पुरा विटला बघ

नकोसं झालंय हे असं शतकानुशतकं

जवारची धांडं उडवल्यागत

माणसांची कापणी बघणं जातीच्या विळ्यानं

अन् बायांना झोंबणारे लांडगे पाहणं

माझ्या नाकाखाली माझ्याच इलाख्यात

वांझोटय़ा संतापाला माझ्या

ना धड, ना कणा, ना भस्मकारी ज्वाळा

सगळंच चुकलं बघ चोखोबा

पार माणसाच्या संगतीत आलो तेव्हापास्न

फुकाच धरली ही संगत

बराच म्हणायचा देवत्वाचा सुरक्षित दुरावा..

मी काही चुकीचं बोलतोय का चोखोबा?

काहीतरी त बोल बाबा

काही त बोल..  – विजय तापस

किती बरं झालं असतं..!

आपण म्हणजे

पटलावरचे निव्वळ प्यादे

प्रश्नांच्या राशी

एकटेपणात मनमुराद चिवडत बसणारे

किंवा मग

भर समरांगणात गोंधळलेल्या

दिङ्मूढ अर्जुनासारखे

भ्याड योद्धे

आपलं सारथ्य करण्यासाठी

कुठून येईल

एखादा अवतारी पुरुष?

निर्थक प्रश्नांनी

व्यापलेल्या असह्य मनाचे

हताश भोग

भोगावेत आपण मूकपणे

रेंगाळत रेंगाळत

सूर्योदयाकडे सरकणाऱ्या

सुस्त, उदास रात्री

किंवा मग

नकळत मनात अंकुरणारा

जाणिवांचा कोवळा गर्भ

उखडून कुस्करून फेकून द्यावा

एखाद्या दुर्लक्षित,

अंधाऱ्या कोपऱ्यात ?

एखादं पुस्तक वाचताना

मनात जन्मणारा

लख्ख उजेड

करावा कायमचा कुलूपबंद

मनाच्या एखाद्या कोपऱ्यात

किंवा

करावं स्वाधीन स्वत:ला

व्यवस्था नावाच्या

या शक्तिशाली ऑक्टोपसच्या हाती,

आवळू द्यावेत

त्याचे अजस्त्र बाहू शरीराभोवती

प्रतिकाराविना संपून जावं

स्वीकारून टाकावी भेकड हत्या

की आत्महत्या  निमूटपणे?

का मग

उतरावं आखाडय़ात

झेलून घ्यावी

राख, धुरळा, आग

कायम लढत, संघर्ष करत

उन्मुक्तपणे उधळून द्यावेत

मनातल्या ऊर्जेचे

लोटच्या लोट..?

काही चढणीच्या वाटा

निव्वळ आपल्या एकटय़ाच्याच तर असतात

वारसाहक्कानं चालत आलेल्या

उजाड जमिनीच्या तुकडय़ासारख्या

प्रश्नांचा वाढत जाणारा फेरा

चुकवता चुकवता

अंतर्मनात उमटते एक

हळवी सल

किती बरं झालं असतं

विकासाच्या अधल्यामधल्या टप्प्याटप्प्यावर

मेंदू चुरगळून

बाजूला ठेवून देता आला असता तर.. – विद्या बयास ठाकूर, लातूर,

अन्याय सहन करताहेत बायका

अन्याय सहन करताहेत स्वत:वरचा

गावपाडय़ावरच्या बायका

अन्यायाच्या गुहेत दडलेत

उद्धाराचे उद्रेक

याचं भान अजूनही येत नाहीये त्यांना

तुडवताहेत त्या

अनाकलनीय समजून

संभ्रम आणि निराशेची वाट

धडधाकट असून

विकलांगतेचं भ्रामक कुबड

वाहावं लागतंय

सहानुभूतीच्या आजारी वाटेवर

खुरडत चालताना

जगण्याचा धगधगता निखारा

अंगावर झेलत

साक्षात कष्टाचा दिवा

तेवत असताना

भ्रामक आनंदाची लहर होऊन

लवथवत अंधाऱ्या रांधणीत

चुलीत जळून

रुचकर होतात

घराघरात  बायका

वहीवाटीत रात्रीच्या

विझल्या कोळशाच्या अंथरुणात

हक्काने लालसा झिरपते

गाजवते हक्क

इच्छेला अथवा अनिच्छेला

थारा नसतोच

स्पर्शाच्या तालावर

विद्ध बासरी डोलते

रक्त रोमातून रोरावत

थेट काळजातून गर्भाशयात

सृजनाला सामोरं जाताना

परंपरेच्या पिंजऱ्यात

मैना धरतेय

फेर

संयमाचा विषारी घास

चघळताहेत बायका

बंद डोळ्यांना दिसत नाही

परंपरेच्या भ्रामक सावलीत

गुरफटलेत त्यांचे पाय

वेदनादायी कळ

सोसताना

त्यांच्या जिभेला

फुटत नाहीत शब्दांचे

धुमारे

पहाटेचं उद्रेकाचं

क्षितीज रूंदावून

उजेडाचं शस्त्र घेता येतं

हातात

हे विसरल्याहेत

त्या

समस्यांच्या पुढे

गुडघे टेकू नयेत

परावलंबन, अगतिकता

आणि सहानुभूतीच्या रोगट वाटेला

वळसा देत प्रश्नांच्या डोंगराशी खेटत

रोरावत वेगाने उपटून फेकावी घाण

जिद्दीने परंपरेशी लढताना

बायका  – बाळकृष्ण भास्करराव सोनवणे,  जळगांव

बाईची कविता

बाईची कविताबिविता

कशाला घ्यायला हवी

एवढी गंभीरपणे?

फार तर तिने लिहावं

चंद्र-ताऱ्यांविषयी

किंवा

फुलापानांबद्दल.

सगळं कसं

नाजुक साजुक..

तिला शब्द, उपमा

नाही सुचल्या तरी चालेल

पण

तिला साधता यायला हवा

रुज-पावडरचा मेळ.

स्टेजवर बसून

लाडिक आवाजात

म्हणायला हवी तिने कविता

आणि

लडिवाळ चर्चा करता यावी

सगळ्यांशी.

थोडक्यात काय, तर

बाई हाडांची कवयित्री

नसली तरी चालते

पण

त्वचेचा पोत मात्र

तिला राखता यायलाच हवा

आणि

मग

बाईनं लिहावी की

खुश्शाल

एखादी कविताबिविता.

 – डॉ. ज्योती कदम

चादर

केव्हाची मी एक

चादर शोधते आहे

मला चढवायची आहे ती

दर्ग्यावर?

छे! छे!

चादर ओढायची आहे

धर्मावर

जातीवर

वंशावर

वर्णावर

लिंगावर

अस्मितेवर

राष्ट्रीयतेच्या संकल्पनेवर

चादर ओढून

सारे सारे

झाकून टाकायचे आहे

चादरीबाहेर

डोके काढून बसलेला

माणूस मात्र

तेवढा प्राणपणाने

जपत राहायचा आहे – अनुराधा काळे

कैदेतलं स्वातंत्र्य

भल्या पहाटे

स्वातंत्र्यदिन

माझ्या स्वप्नात

येऊन म्हणाला,

‘‘मी कैदेत आहे!’’

मी खडबडून जागा झालो!

दूरदर्शनवर पाहिलं

स्वातंत्र्यदिन कडेकोट

बंदोबस्तात साजरा होत होता!– विलास गावडे

संशय घ्यायला हवा

जे छापून आलंय त्यावर

जे दाखवलं जातंय त्यावर

जे ऐकू येतंय त्यावर

धर्माच्या संकटावर

राष्ट्राच्या भक्तीवर

छोटय़ा जातीवर

मोठय़ा नेत्यावर

तारुण्य आव्हानावर

आपल्या भावनेवर

धावतोय त्या शर्यतीवर

गरजांच्या गाजरावर

फुकटच्या डेटावर

प्राण्यातल्या देवावर

देवळातल्या दुकानावर

प्रगतीच्या वाटेवर

प्रेतांच्या लाटेवर

दाखवलेल्या स्वप्नांवर

दिसलेल्या आसवांवर

वाढलेल्या पोटावर

खादीच्या कोटावर

रिकाम्या ताटावर

संशय घ्यायला हवा!

आपल्या षंढपणावर

मनगटाच्या थंडपणावर

एकटेपणाच्या भीतीवर

सहन करण्याच्या शक्तीवर

विझल्या विस्तवावर

अपयशाच्या वास्तवावर

संशय घ्यायला हवा.  – अनुराग अरुण सावंत, मुंबई</strong>

उत्खनन

तुझ्या

अनवट वाटेवरील

सांजप्रवाहात

ती विरघळून जाते तुझ्यात

अगदी अलवार..

अवघ्या अस्तित्वाच्या

झंकारत तारा

ती देते अर्पून आदिम स्त्रीत्व

तू मात्र होतोस नामानिराळा

करून सिद्ध पुरुषत्व..

कितीही झालं तरी

तुला सिद्ध करायचं असतं

तिचं दुय्यमत्व..

तिच्या अवघ्या असण्याचं अप्रूप

काही काळच फक्त तुला..

कुठे आणि कसे करणार उत्खनन

तिच्या मनात गाडल्या गेलेल्या

अनेक बेहिशेबी ओरखडय़ांचे

नसतात गावी तुझ्या

मुळापासून सोसण्याचे तिचे संदर्भ

आणि नसतात ठाऊक तुला

तिचे न उलगडलेल्या कित्येक

दु:खांचे अन्वयार्थ

मौनाच्या प्रवाहात

ती लिप्त अलिप्त

‘मी’त्वाच्या केंद्रीय ध्रुवाकडे

जाते विस्तारत

ती दात्री

होते आनंदयात्री..

पण..

आतून उखडणारे

डवरलेले फळाफुलांचे झाड

जगवते तिला

जरी

अव्याहत होत राहिला मारा

नको असलेल्या गारांचा

चिवटतेनं ती

कातळातही सिद्ध करतेय

स्वत:चे अस्तित्व अविरत

नाळ जमिनीशी जोडत

राहतेय बहरत

– योगिता राजकर, वाई, सातारा

प्रस्तुती – महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ

 सहप्रायोजक – ठाणे जनता सहकारी बॅँक लि.

 पॉवर्ड बाय – नेटभेट ई लर्निग सोल्युशन्स

 हेल्थ पार्टनर – ब्रह्मविद्या साधक संघ