नव्या पुस्तकांची ओळख करून देण्याऐवजी हा विशेष लेख, वाचावे कसे याबद्दलच्या एका गाजलेल्या पुस्तकाचा आधार घेणारा..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रवींद्र कुलकर्णी

मार्गारेट अ‍ॅटवूड या ख्यातनाम कॅनेडियन लेखिकेचे ऑन ‘रायटर्स अ‍ॅण्ड रायटिंग’ असे वाचनीय पुस्तक आहे. त्यात तिने लिहिले आहे की लहानपणी एका मासिकातल्या लेखाचे शीर्षक तिच्या लक्षात राहिले. ‘कॅनेडियन लोक वाचू शकतात, पण ते वाचतात का?’ असे ते होते. अर्थात, हा प्रश्न कुठल्याही देशातल्या लोकांबद्दल विचारता येऊ शकतो. सोशल मीडियाच्या कानठळय़ा बसवणाऱ्या स्फोटाच्या काळात आपण वाचत नाही हे खोटे आहे. पण ती पुस्तकांबद्दल बोलत आहे. तिच्या लहानपणी कॅनडातल्या बहुतेक घरात केवळ तीन पुस्तके असायची, बायबल, शेक्सपिअरची सुनीते आणि उमर खय्यामच्या रुबाया. त्यात तिने पुढे लेखकाच्या वर्तमानपत्रातल्या वा टीव्हीवरच्या मुलाखती याकडे दुर्लक्ष करण्याची आणि लेखक कागदाच्या माध्यमातून वाचकाशी जो संवाद साधतो त्याकडे लक्ष देण्याची विनंती वाचकाला केली आहे. लेखकाचे अपयश वाचकाची कल्पना न येण्यात असेल तर बहुतेक वेळा वाचकाचे अपयश लेखक जे दाखवत आहे ते न पाहू शकण्यात असते. कागदाच्या प्रतलावर लेखक- वाचकाची एकमेकाशी गाठ पडत नाही.

फ्रॅन्सिन प्रोज या वेगवेगळय़ा अमेरिकन विद्यापीठांत लेखनतंत्र शिकवत असलेल्या लेखिकेचे नुकतेच वाचनात आलेले पुस्तक वाचन प्रक्रियेविषयी कुतूहल असलेल्या वाचकाला मार्गदर्शक ठरावे असे आहे. कोणताही समर्थ लेखक वाचकाला कसे गुंतवून ठेवतो? त्याची साधने नेमकी काय असतात? याचा आलेख तिने ‘रीिडग लाइक अ रायटर’ या पुस्तकात मांडला आहे. ते वाचताना एखादी  कथा, कादंबरी आपल्याला का आवडते याचा उलगडा आपल्याला होतो. एखाद्या जादूगाराने त्याची जादू उलगडून दाखवल्यावर जसे आपल्याला वाटेल तसे ते वाचताना वाटत राहते.

बऱ्याच वाचकांना नंतर लिहायची सुरसुरी येऊ लागते. ते करायचे असेल तर  आपले आवडते लेखक शब्द, वाक्य, परिच्छेद , व्यक्तिचित्रे, संवाद, पात्रांचे हावभाव यातून मानवी जीवन कसे उलगडत होते, ग्रॅहॅम ग्रीनसारखा लेखक त्याची कादंबरी किती प्रकरणांत बसवतो, त्यात तो किती काळ व्यापतो, त्याच्या दोन प्रकरणांत काळाचे अंतर किती असते? हे पाहायला हवे. जाणकार वाचकाचे पहिले काम अमुक एक लेखक अनेक दशके का वाचला जातो हे शोधण्याचे असते. ते शोधताना वरील प्रश्नांची उत्तरे आपल्याला मिळत जातात.

शब्दांच्या निवडीचे महत्त्व सांगताना तिने हर्मन मेलिव्हेलीच्या मोबी डिक या गाजलेल्या कादंबरीतले पहिलेच वाक्य दिले आहे. ‘कॉल मी ईशामल’, या वाक्यात आज्ञा आहे, जी आपल्याला त्या कादंबरीकडे ओढते. याऐवजी आपण दुसऱ्या शब्दरचनेचा प्रयोग करून पाहिल्यास हे आपल्याही लक्षात येते. ‘मला ईशामल असे म्हणतात’ किंवा ‘माझे नाव ईशामल आहे.’ यात केवळ माहिती आहे.

‘एखादी घटना, जी प्रयोगाने आणि वैयक्तिक तर्काने मान्य करणे शक्य नसते त्या वेळेला ती आंधळय़ा विश्वासाने आणि ज्येष्ठांच्या परंपरेपुढे मान तुकवून मान्य करणे, माझ्या जीवन पद्धतीत बसते. माझे असे ठाम मत आहे की मी १८७४ सालच्या मे महिन्याच्या २९व्या दिवशी जन्मलो होतो.’ जी. के. चेस्टरटन या ब्रिटिश लेखकाच्या आत्मचरित्राची ही सुरुवात आहे. यातला विश्वास आपल्या मनावर ठसतो. या उलट ज्याच्या जीवनाचा आरंभच अनिश्चिततेने झाला आहे, ज्याचा आधार घ्यावा अशी कोणचीही परंपरा ज्याच्या मागे नाही अशा लेखकाचे हे वाक्य पाहा,  ‘मी नक्की कुठे जन्मलो होतो वा कधी जन्मलो होतो हे मला निश्चित सांगता येणार नाही पण मला शंका आहे की मी कधीतरी वा कोठे तरी जन्मलो होतो.’ गुलामीतून वर येऊन नंतर शिक्षणतज्ज्ञ म्हणून मान्यता मिळवलेल्या बुकर टी वॉशिंग्टन याच्या ‘अप फ्रॉम द स्लॅव्हरी’ या आत्मचरित्रातले हे पहिले वाक्य आहे!

स्पष्टता ही कोणत्याही चांगल्या वाक्याची अट असते. सॅम्युअल जॉनसनने  लिहिलेल्या रिचर्ड सॅव्हेजच्या चरित्रातले एक वाक्य लेखिकेने दिले आहे ज्यात १३४ शब्द, १० विरामचिन्हे आणि तीन अर्धविरामचिन्हे आहेत. तरीदेखील सर्वसामान्य वाचकाला लेखकाला काय म्हणायचे आहे ते समजायला अडचण येत नाही. याचबरोबर वाक्यातली लय व भारदस्तपणा याकडे वाचकाने लक्ष द्यावे. वाक्ये मोठय़ाने म्हणून बघितल्यास त्यातले सौंदर्य जाणवते. न्यूयॉर्कर मासिकात लेख छापण्याआधी तो मोठय़ाने वाचून बघितला जातो. परिच्छेदांचा वापर लेखक लय बदलण्यासाठी करतात. ‘राजवाडय़ांचे निबंध वाचताना आपल्याला विचारांच्या पायऱ्या चढत असल्यासारखे वाटते’ असे तर्कतीर्थानी म्हटले आहे. आपण वाचत असलेला मजकूर कोण सांगत आहे हे महत्त्वाचे असते. यातले मराठीतले मोठे उदाहरण पेंढारकरांच्या ‘रारंग ढांग’ या गाजलेल्या कादंबरीचे आहे. ‘संपादकाच्या सूचनेनुसार प्रथमपुरुषी निवेदन बदलून ते तृतीयपुरुषी केल्याने सगळी कादंबरी बदलून गेली’ असे त्याच्या प्रारंभीच्या मनोगतात लेखकाने म्हटले आहे.

यशस्वी लेखक त्याची पात्रे संवादामधून आपल्यासमोर उभे करतो. फ्रॅन्सिन प्रोजने पुस्तकात इंग्रजी साहित्यातली बरीच मनोज्ञ उदाहरणे दिली आहेत. संवाद नीट वाचले तर त्यात सामील असलेल्या व्यक्तींचे वय, सामाजिक स्थान, सांपत्तिक स्थिती, बुद्धिमत्ता, स्वभाव हे सारे समजते. यासाठी हेन्री ग्रीन या फार प्रसिद्ध नसलेल्या लेखकाच्या कादंबऱ्यांतील उदाहरणे तिने दिली आहेत. अ‍ॅनाबेल पायटॉन ही एका विवाहित पुरुषाच्या प्रेमात आहे. त्याच्या कुमारवयीन मुलाला तिने हॉटेलात जेवायला बोलावले आहे आणि बोलता बोलता ती त्याच्या आई वडिलांच्या एकमेकातल्या संबंधाची माहिती काढत आहे आणि ते त्या मुलाला समजत नाही आहे.  त्या मुलाचा बथ्थडपणादेखील तो ज्या प्रकारे  खात असतो त्यावरून आपल्याला समजतो.

हालचाल व संवाद यांमधून लेखक वातावरण, पात्रांची मन:स्थिती, त्यांना एकमेकांसाठी असलेला वेळ, एकमेकाबद्दल असलेली आस्था हे सारे कसे दाखवतो हे कळण्यासाठी पुढचा साधा संवाद पाहा.

‘‘हॅलो,’’ तिने तिचा हात (पर्समधल्या) सिगारेटशी नेत म्हटले.

‘‘हॅलो,’’ तो उत्तरला.

‘‘कसा आहेस?’’ तिने सिगारेट शिलगावली.

‘‘उत्तम!’’ त्याने दोन पेल्यांत मद्य ओतले.

साहित्याची समीक्षा आपल्याकडे आहे पण वाचनाचे आणि लेखनाचे तंत्र शिकवणाऱ्या कार्यशाळांची गरज अशा वेळेला जाणवते. वाचल्यानंतर काही काळाने त्यातले आपल्या लक्षात काय राहाते, तर लेखकाने जे वर्णन बारकाईने केलेले असते ते लक्षात राहाते. लेखिकेने म्हटले आहे की याचे कारण असे की जगताना आपण जास्त सजग असतो. बारकाईने केलेले वर्णन जो अनुभव देते त्याचे परिणाम लेखनात मांडलेल्या विचारापेक्षा खूप अधिक असतात.

माझ्यापुरते बोलायचे झाले तर, अ‍ॅना कॅरेनिनामधले टॉलस्टॉयने त्याच्या लग्नाच्या दिवसाच्या मन:स्थितीचे वर्णन, कॅनरी रोमध्ये स्टाइनबेकने केलेले किराणा सामानाच्या दुकानाचे वर्णन विसरणे अवघड आहे. हिंदी कवी नागार्जुन यांची ‘पीपलके पत्तोंपर’ अशी लहानशी कविता आहे, ज्यात चांदणे कुठे कुठे पडलेले आहे त्याचे वर्णन आहे.. ‘‘पिपलके पत्तोंपर फिसल रही चांदनी / जम रही, घुल रही, पिघल रही चांदनी / पिछवाडे, बोतल के तुकडोंपर चमक रही, दमक रही, मचल रही चांदनी.’’ सागरात वा हिमशिखरांवर पडलेल्या चांदण्यांचे पसरट वर्णन एखादा नवोदित साहित्यिक करेल, पण घराच्या मागच्या अंगणात पडलेल्या बाटलीच्या तुकडय़ांवर पडलेले चांदणे टिपणे हे जातिवंत कवीचे लक्षण आहे. 

जॉन लििव्हगस्टन लोव्स याने ‘स्टडी ऑफ इमॅजिनेशन’ या पुस्तकात कवी सॅम्युअल टेलर कोलरिज पुस्तक कसे वाचे याबद्दल लिहिले आहे. कोलरिज जे वाचे त्याबद्दलच्या प्रतिक्रिया समासात लिहून ठेवे. कोलरिजने वाचलेल्या ३२५ लेखकांच्या ४५० पुस्तकांमध्ये अशा आठ हजार नोंदी सापडल्या. मार्जिनॅलिया हा शब्द इंग्लिश भाषेला प्रदान करण्याचे श्रेयही त्याचे आहे. कोलरिज फक्त बारकाईने वाचे एवढेच नव्हते तर एखाद्या पुस्तकाच्या संदर्भातली इतर पुस्तकेही वाचे. रेखावृत्त मोजण्यासाठी गेलेल्या फिनलंडजवळच्या मोहिमेचा वृत्तांतदेखील त्याने वाचला होता. कोलरिजच्या वाचनाचा मागोवा घेणे म्हणजे त्याच्या प्रतिभासंपन्न मनाचा शोध घेण्यासारखे आहे.

जाणीवपूर्वक वाचनाची गरज सर्व क्षेत्रांत आहे. गल्फ ऑफ टोंकिनमध्ये घडलेल्या तथाकथित घटनेचा दावा करत अमेरिका व्हिएतनामच्या युद्धात प्रत्यक्ष उतरली. यात अध्यक्ष लिंडन जॉन्सन यांचा हात होता. आय. एफ. स्टोन या पत्रकाराने त्यांना आव्हान दिले व त्यांनी खोटेपणा केला आहे हे दाखवून दिले. बऱ्याच लोकांना वाटायचे की स्टोन महाशयांना  काही गुप्त कागदपत्रे मिळाली होती. पण तसे नव्हते, सरकारनेच दिलेल्या वेगवेगळय़ा प्रेस रीलिजवरून त्यांनी ते शोधले होते.. नीट वाचून!  

वाढत्या वयानुसार वाचणे कमी होत जाते. नेमकेपणाची ओढ लागते. संस्कृतीचे सारे दाब झुगारून सत्याला हात घालण्याचे धाडस वाचन निर्माण करते.

kravindrar@gmail.com

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Read like author books book canadian author readable book magazine ysh
First published on: 07-05-2022 at 00:02 IST