अजिंक्य कुलकर्णी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गणितज्ञ आणि विवाहसंस्थेपासून युद्धांपर्यंत अनेक विषयांवर चिंतनशील भूमिका घेणारे बट्र्राड रसेल यांची १५० वी जयंती येत्या १८ मे रोजी आहे. त्यानिमित्त हे दोन लघुलेख..

रसेलला १९५० साली साहित्याचे नोबेल मिळाले, त्या पुरस्काराच्या मानपत्रात म्हटले होते की, ‘रसेल बहुश्रुत आहे. त्याचे सगळय़ात महत्त्वाचे काम जर कोणते असेल तर तो सतत विचारस्वातंत्र्य आणि मानवतेच्या बाजूने उभा राहिला.’ 

स्वातंत्र्याशिवाय व्यक्तिमत्त्व अशक्य असते. जीवन आणि ज्ञान आज इतकी गुंतागुंतीची झाली आहेत की मोकळय़ा चर्चेनेच सर्वागीण दृष्टी प्राप्त होऊ शकते. खुली चर्चा केल्याशिवाय पूर्वग्रह व चुका यातून मार्ग कसा सापडणार? माणसे, शिक्षक, प्राध्यापक सर्वाना चर्चा करू देत. झाले तर होऊ देत मतभेद, असं तो म्हणत असे. आपल्या शाळा व आपली विद्यापीठे यांची जर योग्य रीतीने वाढ करू, योग्य माणसे तेथे नेमू, मानवी स्वभावाची पुनर्रचना करण्याचे काम जर बुद्धिपूर्वक हाती घेऊ, तर काय करू शकणार नाही? आपण सगळं काही करू शकतो असा आशावाद त्याच्याठायी असे.

 रसेलच्या जीवनात त्याने घेतलेल्या भूमिका किंवा केलेली अनेक विधाने ही वादग्रस्त ठरली. वादग्रस्त होण्याचे महत्त्वाचे कारण त्यानेच एकदा सांगितले आहे. ‘माय मेंटल लाइफ वॉज पर्पेच्युअल बॅटल’. रसेलची मते व भूमिका अनेकदा बदलत गेल्या. कारण, विचारांचा व वृत्तीचा अखंड विकास हा रसेलला भूमिका सातत्यापेक्षा जास्त महत्त्वाचा वाटला आहे. तो स्वत:च स्वत:चा सर्वात मोठा टीकाकार होता. रसेलची न्यू यॉर्क सिटी कॉलेजमध्ये तत्त्वज्ञानाचा प्राध्यापक म्हणून नियुक्ती झाली, तिथे तो ‘तत्त्वज्ञान, तर्कशास्त्र, शुद्ध विज्ञानाचा तत्त्वमीमांसेशी असलेला संबंध’ हे विषय शिकवणार होता. या नियुक्तीविरुद्ध न्यू यॉर्कमध्ये, अमेरिकेत व जगात एकच वादळ उठले. अमेरिकेतील विविध ठिकाणचे बिशप, विविध वृत्तपत्रांच्या संपादकांनी रसेलवर टीकेची झोड उठवली. परंतु  तत्त्वचिंतक जॉन डय़ुई, शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईन यांच्यासारख्यांनी रसेलवर होणाऱ्या आरोपांबद्दल आपली प्रखर व जाहीर चीड व्यक्त केली. ‘रसेलची नेमणूक गणित, तत्त्वज्ञान व विज्ञान हे विषय शिकविण्याकरिताच होती’, किंवा, ‘विज्ञान व गणित शिकवीत असताना मुद्दाम विषयांतर करून रसेल त्याचे तथाकथित ‘अनैतिक तत्त्वज्ञान’ शिकवेल आणि समलैंगिकतेचा प्रचार करेल’ असे मूर्खपणाचे आरोप न्यू यॉर्कसारख्या जगप्रसिद्ध शहरात या विद्वानावर झाले.

    रसेल यांच्या मते ‘शिक्षक हा सुसंस्कृतपणाचा आद्य रक्षक होय. सुसंस्कृतपणा म्हणजे या जगात आपल्या मातृभाषेचे, आपल्या देशाचे, आपल्या स्वत:चे काय स्थान आहे याचे भान असणे होय. सुसंस्कृतपणा आपल्या विद्यार्थ्यांमध्ये रुजवणे हे शिक्षकाचे मुख्य कर्तव्य आहे’ असे रसेलला वाटत असे.  मुलांच्या मनातील ‘मत बनवण्याची प्रक्रिया विवेकावर आधारित कशी राहील’ याची खबरदारी शिक्षकाने घ्यावी.. ‘राष्ट्राचे संरक्षण हे जेवढे सैन्यदलाच्या हातात असते तेवढेच ते शिक्षकांच्याही हातात असते ’! ‘मुळाक्षरे आणि पाढे शिकवण्याचा टप्पा ओलांडून शिक्षक पुढे गेला रे गेला की कुठल्याही वादग्रस्त मुद्दय़ावर त्याने राज्यकर्त्यांचा अधिकृत दृष्टिकोनच स्वीकारायला हवा, अशी सक्ती होऊ लागते,’ असे निरीक्षणही रसेलने नोंदवले आहे.  लोकशाही राष्ट्रांत  दुराग्रहांचे प्रमाण तुलनेने कमी असले तरी तिथेही शिक्षण क्षेत्रात ते वाढत जाण्याचा गंभीर धोका आहे हे मान्यच केले पाहिजे. हा धोका टाळायचा असेल तर वैचारिक स्वातंत्र्यावर विश्वास असणाऱ्यांनी शिक्षकांवर बौद्धिक गुलामगिरी लादली जाणार नाही याची खबरदारी घेतली पाहिजे.

ajjukul007@gmail.com

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Teacher freedom mathematician subjects reflective role literature nobel award ysh
First published on: 14-05-2022 at 00:02 IST