न्यायाधीशांना लाच देण्याचा प्रयत्न आणि भ्रष्टाचार या आरोपांखाली फ्रान्सचे माजी अध्यक्ष निकोलस सर्कोझी यांना मार्चमध्ये तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली होती. अशी शिक्षा झालेले ते त्या देशाचे पहिलेच माजी अध्यक्ष. त्यांनी त्या निकालास आव्हान दिल्यामुळे त्यांचा तुरुंगवास लांबला असला तरी २०१२ मधील निवडणुकीच्या प्रचारमोहिमेतील बेकायदा अर्थपुरवठय़ाच्या प्रकरणात त्यांना पुन्हा एक वर्षांची नजरकैद सुनावण्यात आली आहे. युरोपातील काही वृत्तपत्रांना या घटनेमुळे फ्रान्समध्ये ‘नवे युग’ सुरू झाले असे वाटते, तर काहींना न्यायालये त्यांची जबाबदारी कठोरपणे पार पाडू लागल्याचे जाणवते, काहींना हा निकाल मोठय़ा बदलाचा संकेत वाटतो.
जर्मनीतील ‘द डेली मिरर’ने समाधानाबरोबर अपेक्षाही व्यक्त केली आहे. ‘‘फ्रान्सने असे काही अध्यक्ष पाहिले असतील ज्यांनी अनेक बाबतीत आगळीक केली असेल, परंतु त्यांना शिक्षा झाली नाही. परंतु आता न्यायालयेही कठोर होऊ लागली आहेत. म्हणून सर्कोझी यांच्या शिक्षेचा निकाल एक महत्त्वपूर्ण संकेत देतो,’’ असे या वृत्तपत्राने म्हटले आहे. फ्रान्सची अध्यक्षीय निवडणूक सहा महिन्यांवर आहे. त्या अनुषंगाने हे वृत्तपत्र म्हणते, उजव्या छावणीतील उमेदवार निवडीवर आपला वरचष्मा ठेवण्याच्या योजनांना सर्कोझींनी मूठमाती दिली पाहिजे आणि उमेदवारांनीही आपल्या अर्थपुरवठादारांबद्दल आधीपेक्षा अधिक पारदर्शक असले पाहिजे.
ऑस्ट्रियातील ‘क्लेन झायतुंग’ या वृत्तपत्राने फ्रान्सच्या वाईट सवयींचा अंत झाल्याचे निरीक्षण नोंदवताना, सर्कोझींच्या बाबतीतील निर्णय हे एका बदललेल्या मोठय़ा राष्ट्राचे प्रतीक असल्याची टिप्पणी केली आहे. बऱ्याच काळापासून फ्रेंच नागरिकांनी किरकोळ बाबी आणि मोठय़ा गैरव्यवहारांकडेही दुर्लक्ष केले. सत्ताधाऱ्यांनी प्रत्येक गोष्टीत आपला लाभ करून घेतला, लोकांचा भ्रमनिरास केला आणि आपली लोकप्रियता वाढवली. कारण न्यायाधीश अपेक्षित जबाबदारी पार पाडत नव्हते. म्हणून हा निकाल सांकेतिक आहे, असे भाष्य या वृत्तपत्राने केले आहे. फ्रान्समध्ये नवे युग सुरू झाल्याचेही या वृत्तपत्राने म्हटले आहे.
रशियातील स्वतंत्र बाण्याच्या ‘एको ऑफ मॉस्को’ या वृत्तसंकेतस्थळावरील लेखात सार्कोझी यांची तुलना रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी करताना, पुतीन यांनी केलेल्या सत्तेच्या गैरवापरापेक्षा सार्कोझी यांच्या गैरवर्तनाला क्षुल्लक ठरवले आहे. ‘‘निकोलस, तुमची महत्त्वाकांक्षा तरी काय? संविधानाला पायदळी तुडवून तुम्हाला तिसऱ्यांदा सत्ता उपभोगायची होती का? संसदेला भ्रष्ट करायचे होते का? न्यायाधीशांना खरेदी करायचे होते का? की सर्व प्रांतांतून लाखभर सरकारी नोकरदारांना एकत्र जमवून दूरचित्रवाहिन्यांवर प्राइम टाइममध्ये निवडणूक जाहिराती करायच्या होत्या..? की ओलांद यांना संधीच मिळू नये म्हणून मतमोजणीत गैरप्रकार करायचे होते?’’ अशी सरबत्ती करीत राजकीय टीकाकार व्हिक्टर झेन्द्रोवीच यांनी तिरकस शैलीत खरपूस समाचार घेतला आहे. स्वत:ला महाशक्तिमान म्हणवून घेणारे प्रत्यक्षात शेंगदाण्याच्या किमतीचेच होते, अशी कोपरखळीही या लेखात मारण्यात आली आहे.
फ्रान्समधील ‘ल् ओब्स’ (निरीक्षक) या साप्ताहिकाने गैरव्यवहार झालेल्या २०१२ मधील निवडणूक प्रचाराच्या अंतिम टप्प्यातील जीवघेण्या शर्यतीचे चित्र वेगळ्या शैलीत रंगवून वाचकांपुढे ठेवले आहे. ते वाचणे मनोरंजक ठरावे. ‘‘त्याला खात्री होती की तो फक्त काही दिवसांत फ्रँकोइस ओलांदचा पराभव करू शकतो. निकोलस सर्कोझी यांनी हिंस्र पाठलाग केला. बेपर्वा वृत्तीने आणि संतापाच्या भरात आपल्या प्रचारफेऱ्या वाढवल्या. ते आपले ध्येय गाठण्याच्या मार्गावर होते, पण अंतिमत: त्यांना धक्का बसला. आता ते त्या धक्क्यातून सावरले आहेत,’’ असे या साप्ताहिकातील लेखात नमूद केले आहे.
माझ्याविरुद्ध राजकीय षड्यंत्र रचले आहे, माझ्यावरील आरोप निराधार आहेत, मी गैरव्यवहार केलेला नाही, असा बचाव सर्कोझी करीत आहेत. प्रतिमा जपण्याच्या त्यांच्या प्रयत्नांबद्दलची दखल ब्रिटनच्या ‘द गार्डियन’च्या वृत्तांतात घेण्यात आली आहे. ‘‘सर्कोझी आता दोन शिक्षांच्या विलक्षण आणि अभूतपूर्व परिस्थितीत सापडले असले तरी त्यांनी आपली सार्वजनिक जीवनातील उच्च प्रतिमाही कायम ठेवली आहे. त्यांचे ‘प्रॉमेनेडेस’ हे कला आणि संस्कृतीवरील पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले. शिवाय, एप्रिलमध्ये होऊ घातलेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने दूरचित्रवाहिन्यांवर त्यांच्या मुलाखतींचा रतीबही सुरू आहे. त्यांचे समर्थकही त्यांना पाठिंबा देत आहेत,’’ असे निरीक्षण ‘द गार्डियन’ने नोंदवले आहे. त्यांना झालेल्या दोन्ही शिक्षांच्या प्रकरणांवर त्यांच्या प्रतिक्रियांसह या वृत्तपत्राने सविस्तर माहिती प्रसिद्ध केली आहे.
संकलन : सिद्धार्थ ताराबाई
