क्रिकेटच्या थेट चित्रवाणी-प्रक्षेपणाचा आनंद आपल्याला गेल्या काही वर्षांत घरबसल्या मिळत असतो. मात्र चित्रवाणीच्या प्रसारापूर्वीच्या काळात, नभोवाणीवरून क्रिकेट सामन्यातील प्रत्येक क्षणाचा आनंद लोकांपर्यंत पोहोचविणे ही खूप अवघड कामगिरी मानली जाई. क्रिकेट सामन्याचे प्रत्यक्ष वर्णन मराठी भाषेत आणि तेही ग्रामीण लोकांच्या हृदयापर्यंत पोहोचविण्याचे कार्य बाळ ज. पंडित यांनी केले. वयाच्या ८६व्या वर्षी, दीर्घ आजारानंतर गुरुवारी ते कालवश झाले, तेव्हा त्या नभोवाणी समालोचन युगाचा महत्त्वाचा दुवा निखळला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हल्ली मराठी समालोचनात इंग्रजी शब्दांचा सर्रास उपयोग केला जातो. पंडित यांचे इंग्रजी भाषेवर अतिशय प्रभुत्व होते तरीही त्यांनी आपल्या समालोचनात अस्खलित मराठी भाषा कशी चपखल पद्धतीने वापरली जाईल यावर भर दिला होता. स्टम्पकरिता यष्टी, विकेटकीपरसाठी यष्टीरक्षक असे शब्द सहजपणे ते वापरतच. बम्पर किंवा उसळत्या चेंडूला त्यांनी आपटबार या पर्यायी शब्दाचा उपयोग केला. त्या वेळी त्यांनी खुलासा केला होता की बम्पर चेंडू खेळपट्टीवर आपटल्यानंतर वर उडतो. ज्याप्रमाणे फटाका फुटल्यानंतर वर उडतो, तद्वत बम्पर चेंडूची स्थिती असते. हा शब्द पुढे लोकप्रियदेखील झाला. केवळ समालोचनात एखाद्या खेळाडूचा दोष दाखविण्यावर ते समाधानी नसत. मराठी भाषेचा जाज्वल्य अभिमान लाभलेल्या पंडित यांनी इंग्रजी भाषेतही काही वेळा समालोचन केले आणि तेही उत्तम भाषा उपयोगात आणूनच. पंडित यांनी स्वत: प्रथम दर्जाच्या क्रिकेटमध्ये भाग घेतला होता. त्याचा फायदा त्यांना समालोचन करताना झाला. पूर्वी कसोटी सामन्यांकरिता बॉबी तल्यारखान, विजय मर्चन्ट, डिकी रत्नागर आदी श्रेष्ठ समालोचक इंग्रजीत समालोचन करीत असत. त्यांच्या जोडीला पंडित हे मराठी भाषेत समालोचन करीत.
चेतन चौहान याच्यासह अनेक खेळाडूंना त्यांनी हे खेळाडू कोठे चुकतात, कोणती शैली वापरल्यास चौकार किंवा षटकार जाईल. गोलंदाजी करताना बळी मिळविण्यासाठी चेंडू कसा टाकला पाहिजे आदींबाबतही मार्गदर्शन केले होते. महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष, सहसचिव आदी अनेक जबाबदाऱ्या त्यांनी समर्थपणे हाताळल्या. या संघटनेला नावारूपास आणण्यात आणि पुणे शहरास आंतरराष्ट्रीय सामन्यांचे संयोजन शहर म्हणून नावलौकिक मिळवून देण्यात त्यांचा वाटा मोठा आहे. शिक्षण व सामाजिक उपक्रमातही ते अनेक संस्थांचे आधारस्तंभ होते. अर्थात, त्यांना अजरामर करणारी बाब म्हणजे त्यांची मराठी समालोचनशैली!

मराठीतील सर्व व्यक्तिवेध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bal pandit
First published on: 19-09-2015 at 00:47 IST