मुंबईच्या पश्चिम रेल्वे मार्गावरील नालासोपारा हे उपनगर सत्तरच्या दशकात आतासारखे बकाल नव्हते. बाहेरून येणाऱ्यांना तेथे सहज जागाही मिळत असे. अशा काळात उत्तर प्रदेशातून एक महिला तेथे राहावयास आली. तिथेच या महिलेला एक तृतीयपंथी- किन्नर भेटला. त्या महिलेने त्या किन्नराची विचारपूस केली. त्याने सांगितलेली माहिती डोके सुन्न आणि बधिर करणारी होती. पुढे मग त्या महिलेने खूप माहिती मिळवली तृतीयपंथीयांविषयी. साडेतीन दशकांहून अधिक काळ त्यांनी या विषयावर काही लिहिले नाही. २०११च्या जनगणनेत तृतीयपंथींची स्वतंत्र नोंद करण्याचा निर्णय सरकारने घेतल्यानंतर मात्र त्यांनी यावर लिहायचेच, असा निर्धार केला. यातूनच मग साकारली ‘पोस्ट बॉक्स नंबर २०३-नालासोपारा’ ही कालजयी कलाकृती! परवा याच कादंबरीला साहित्य अकादमीचा हिंदी भाषेतील पुरस्कार जाहीर झाला. ती महिला होती अर्थातच चित्रा मुद्गल. आधुनिक हिंदी साहित्यातील आजच्या आघाडीच्या लेखिका..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उत्तर प्रदेशातील उन्नाव जिल्ह्य़ातील संपन्न जमीनदार घराण्यात जन्मलेल्या चित्राजींना सुखवस्तू जीवन जगणे सहजशक्य होते. पण त्यात त्यांचे मन रमलेच नाही. दीनदुबळे व सर्वहारा वर्गातील लोकांचे हाल आणि त्यांचे होणारे शोषण पाहून त्या व्यथित होत. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर चित्रकलेची आवड असल्याने पुढील शिक्षणासाठी त्यांनी थेट मुंबई गाठली. जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये  प्रवेश घेतला. शिक्षण पूर्ण होत असतानाच त्या कामगार चळवळीत ओढल्या गेल्या. तेव्हा मुंबईत डॉ. दत्ता सामंत यांच्या ‘कामगार आघाडीत’ त्या सक्रिय झाल्या. मुंबईत घरेलू कामगार, मोलकरणी मिळेल त्या पगारावर काम करीत असत. या मोलकरणींनी किमान सोयीसुविधा व अन्य लाभ मिळवून देण्यासाठी त्यांनी अनेकदा आंदोलने केली. दुसरीकडे एसएनडीटी महिला विद्यापीठातून बहि:स्थ विद्यार्थिनी म्हणून त्यांनी हिंदी साहित्यात पदव्युत्तर पदवी मिळवली घरच्यांचा विरोध असतानाही त्यांनी परजातीतील तरुणाशी विवाह केला. मुंबईत काही वर्षे काढल्यानंतर त्या दिल्लीत स्थायिक झाल्या. तेथेही त्यांची पुन्हा एका तृतीयपंथीयाशी गाठ पडली. मग समाजापासून दूर गेलेल्या, बहिष्कृतांचे जिणे जगणाऱ्या या लोकांवर त्यांनी ‘पोस्ट बॉक्स नं २०३ ..’ ही कादंबरी लिहिली आणि ती अफाट लोकप्रिय झाली.  बिन्नी ऊर्फ विनोद ऊर्फ बिमलाची ही कहाणी आहे. समाजातील या दुर्लक्षित घटकाबद्दल इतक्या तपशिलाने हिंदीत कुणी लिहिले नसल्याने साहित्य अकादमीलाही या कादंबरीची दखल घ्यावी वाटली. एक जमीन अपनी, आवा, भूख, जहर ठहरा हुआ, लाक्षागृह यांसारख्या त्यांच्या कलाकृतींनी हिंदी साहित्यात त्यांना मानाचे स्थान मिळाले. त्यांच्या साहित्यकृतींत मानवी संवेदनांचे चित्रण तर असतेच, पण आधुनिक काळातील वेगवान बदलांमुळे मानवाची होणारी घुसमटही प्रतिबिंबित होते. आवा ही कादंबरी आठ भाषांमधून  अनुवादित झाली. तिला ‘व्यास सम्मान’ हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाला. याखेरीज फणीश्वरनाथ ‘रेणु’ पुरस्कार, हिंदी साहित्य अकादमी असे अनेक बहुमान त्यांना प्राप्त झाले आहेत. तृतीयपंथींना आता अनेक ठिकाणी मानाची पदे मिळू लागली आहेत, पण अजूनही त्यांच्याकडे पाहण्याचा सर्वसामान्यांचा दृष्टिकोन बदललेला नाही. त्यांना सन्मानाची वागणूक मिळावी, हीच चित्राजींची इच्छा आहे.

मराठीतील सर्व व्यक्तिवेध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chitra mudgal
First published on: 08-12-2018 at 00:15 IST