‘‘चित्रपटांमध्ये तुम्हाला रिटेकचा पर्याय असतो, पण रंगभूमीचा पडदा उघडल्यानंतर तिथे रिटेक नसतोच. त्यामुळे तुम्हाला इथे खूप काही शिकायला मिळते. नाटकांच्या प्रत्येक प्रयोगानंतर मला वेगळीच ऊर्मी आणि ऊर्जा मिळते,’’ असे दिन्यार कॉन्ट्रॅक्टर नेहमी सांगायचे. चित्रपटांमध्ये करिअर करू इच्छिणाऱ्यांनाही ते आधी काही काळ रंगभूमीवर काम करा हाच सल्ला देत असत. म्हणूनच पाच दशके पारसी, गुजराती, हिंदी रंगभूमीवर काम करताना त्यांनी आपला स्वतंत्र ठसा उमटवला.

१९४२ मध्ये मुंबईतच जन्मलेल्या दिन्यार यांनी शाळेत असल्यापासूनच बालनाटकांमधून काम करण्यास सुरुवात केली. नंतर त्यांनी औषधनिर्माणशास्त्राची पदवी मिळवली. काही काळ त्यांनी एका औषध कंपनीत वैद्यकीय प्रतिनिधी (एमआर) म्हणून काम केले. पण या नोकरीत ते फारसे रमले नाहीत. रंगभूमी त्यांना खुणावत होती. मग ही नोकरी त्यांनी सोडली. १९६६ पासून ते नाटय़क्षेत्रात रमले. ‘मारो लाइन तो तबियत फाइन’ या गुजराती नाटकाने त्यांना अफाट लोकप्रिय केले. हजारो नाटय़रसिकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणारा अभिनेता अशा शब्दांत त्यांचा गौरव केला गेला. या नाटकाचे मग इंग्रजी आणि हिंदी भाषेत अनुवाद  झाले. यातील अनेक कलाकार बदलले तरी दिन्यार मात्र तिन्ही भाषांतील नाटकात कायम होते. गोल चेहरा, टक्कल आणि स्थूल शरीरयष्टीमुळे नाटकातील एन्ट्रीलाच ते भाव खाऊन जायचे. मुंबई दूरदर्शनने डीडी-२ ही स्वतंत्र वाहिनी सुरू केल्यानंतर अदी मर्झबान यांच्यासोबत त्यांनी गुजराती कार्यक्रम तेथे सादर केले. प्रेक्षकांना खळखळून हसवायचा हा सिलसिला दीर्घ काळ चालू होता.

जागतिक रंगभूमी आणि इंग्रजी साहित्याचा त्यांचा दांडगा अभ्यास होता. ‘अडोसी व्हर्सेस पडोसी ’ हे त्यांचे नाटकही तुफान गाजले. कालौघात गुजराती रंगभूमीचा परीघ आक्रसत गेल्याने दूरचित्रवाणी वाहिन्या आणि चित्रपटांकडे ते वळले. ८०च्या दशकात ‘रसना’ या पेयाची जाहिरात लोकप्रिय झाली होती. त्यातील भल्या मोठय़ा मगमधून रसना पितानाचा दिन्यार यांचा चेहरा विसरणे शक्य नाही. अक्षयकुमार याच्या ‘खिलाडी’ या चित्रपटात त्यांनी महाविद्यालयाच्या प्राचार्याची भूमिका केली होती. विचित्रपणे कान हलवण्याची त्यांची कृती प्रेक्षकांना भावली होती. ‘बाजीगर’, ‘बादशाह’, ‘३६ चायना टाऊन’, ‘चोरी चोरी चुपके चपके’, ‘दरार’ अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांत त्यांनी अभिनय केला. तसेच ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’, ‘खिचडी’, ‘कभी इधर, कभी उधर’, ‘हम सब एक हैं’, ‘आज के श्रीमान श्रीमती’ अशा अनेक मालिकांमधून त्यांनी विविधरंगी व्यक्तिरेखा साकारल्या. दिन्यार यांचीच शिष्या असलेल्या दिलनाझ इराणी यांचे ‘पॉवरफुल कपल’ हे नाटक पाहण्यासाठी ते गेले असता त्यांना ते खूप आवडले.  नाटक जबरदस्त असून यात मला काम करायला आवडले असते, असे ते सहज बोलून गेले. महिनाभरातच लेखकाने या नाटकात एक नवे पात्र समाविष्ट केले व ती भूमिका दिन्यार यांनी केली. एखाद्या अभिनेत्यासाठी नाटकात नवे पात्र निर्माण करण्याची ही घटना दुर्मीळच मानली जाते. यंदाच त्यांना ‘पद्मश्री’ने गौरवण्यात आले होते. वयोमानानुसार ते थकलेही होते. रुग्णालयात दाखल असतानाही त्यांची विनोदबुद्धी मात्र कायम होती. भेटायला येणाऱ्यांनी गंभीर होऊ नये म्हणून त्यांनाही ते हसवायचे. त्यांच्या निधनाने गुजराती रंगभूमी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील गुणी कलावंत काळाच्या पडद्याआड गेला आहे.