भारतातील अणुऊर्जा आणि अण्वस्त्र विकास कार्यक्रमाचे प्रणेते डॉ. होमी भाभा यांचे कार्य निगुतीने पुढे नेणाऱ्या, संशोधक घडवणाऱ्या भाभा अणुसंशोधन केंद्राची (बीएआरसी) यापुढील वाटचाल संशोधक डॉ. अजित कुमार मोहंती यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे. अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष डॉ. के. एन. व्यास यांच्याकडून मोहंती यांनी नुकताच कार्यभार स्वीकारला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ते मूळचे ओदिशाचे. त्यांनी १९७९ मध्ये भौतिकशास्त्रातील पदवी मिळवली. कटक येथे पदव्युत्तर पदवीचे शिक्षण त्यांनी पूर्ण केले. अणुऊर्जा संशोधन क्षेत्रात तोपर्यंत भारत काहीसा स्थिरावला होता. अणुऊर्जा संशोधन आणि विकासाचा व्यावसायिक दृष्टिकोनातून विचार होऊ  लागला होता.  भाभा अणुसंशोधन केंद्राच्याही २५ तुकडय़ांचे प्रशिक्षण पूर्ण झाले होते. डॉ. मोहंती यांनी पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर १९८३ मध्ये भाभा अणुसंशोधन केंद्रात ते रुजू झाले. संस्थेच्या २६व्या तुकडीचे ते प्रशिक्षणार्थी. त्यानंतर मुंबई विद्यापीठातून त्यांनी पीएच.डी. केले.

अणुभौतिकशास्त्रातील त्यांची अनेक संशोधने नावाजण्यात आली आहेत. बीएआरसीबरोबरच अनेक संस्थांमधील महत्त्वाच्या संशोधन प्रकल्पांसाठी त्यांनी काम केले आहे. अमेरिकेतील ब्रुकहेवन नॅशनल लॅबोरेटरीचे प्रकल्प आणि गेली काही वर्षे जगाचे लक्ष लागलेला जीनिव्हा येथील ‘सर्न’ प्रकल्प यांसाठीही त्यांनी काम केले आहे. इंडियन फिजिक्स असोसिएशनचे अध्यक्ष, बोर्ड ऑफ रिसर्च इन न्यूक्लिअर सायन्सच्या मूलभूत विज्ञान समितीचे सचिव यांसह विज्ञान आणि संशोधन क्षेत्रातील अनेक संस्था, संघटनांमधील पदे त्यांनी भूषविली आहेत. इंडियन फिजिक्स सोसायटीचा यंग फिजिस्ट अ‍ॅवॉर्ड (१९८८), इंडियन सायन्स नॅशनल अ‍ॅकॅडमीचे यंग सायन्टिस्ट अ‍ॅवॉर्ड (१९९१), अणुऊर्जा विभागाचा होमी भाभा पुरस्कार (२००१) त्यांना मिळाला आहे.

अणुऊर्जा क्षेत्रातील नवखा देश ते महत्त्वाच्या जागतिक प्रकल्पांमधील सहभागी देश या प्रवासाचे ते एक साक्षीदार आहेत. संस्थेतील गेल्या ३५ वर्षांतील चढउतार, संशोधन याची जाण असलेले नेतृत्व संस्थेला मिळाले आहे. तीन वर्षे ते केंद्राचे संचालक म्हणून काम पाहतील. अणुऊर्जेवरील संशोधनाला अधिक गती देणे क्रमप्राप्त आहे. सामान्य माणसांपासून काहीसा दूर राहिल्यामुळे या विषयाला गैरसमाजाचे कोंदण अधिक आहे. देशातील महत्त्वाची संस्था असली तरी अपवादात्मक स्थितीत लालफितीचे फटके संस्थेलाही मिळाले आहेत. अशा आव्हानांतून संस्थेला पुढे नेण्याचे, संस्थेचे काम अधिक लोकांपर्यंत पोहोचविण्याचे आव्हान डॉ. मोहंती यांना पेलावे लागणार आहे.

मराठीतील सर्व व्यक्तिवेध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dr a k mohanty
First published on: 15-03-2019 at 00:05 IST