ज्येष्ठ कॅन्सरतज्ज्ञ एवढीच डॉ. चंद्रकांत विठ्ठल पटेल यांची ओळख नव्हती तर एक सहृदय डॉक्टर म्हणून ते लोकप्रिय होते. वैद्यकीय शिक्षण स्वस्त झाल्याखेरीज उत्तम आरोग्य सेवा सर्वसामान्य माणसाच्या आवाक्यात येणार नाही असे डॉ. पटेलांचे ठाम मत होते. अनेक सेवाभावी संस्थांशी डॉ. पटेल संबंधित होते व त्यांचा मृत्यू झाला त्या २२ एप्रिल २०१९ पर्यंत डॉ. पटेलांनी आपले रुग्णसेवेचे व्रत सुरू ठेवले होते.

त्यांचा जन्म १८ जानेवारी १९३४ रोजी झाला. त्यांच्या आईवडिलांचा मृत्यू पुरेसे व योग्य उपचार न मिळाल्याने झाला होता व त्याच कारणाने त्यांनी डॉक्टर व्हायचे मनोमन ठरवले होते. आणि अत्यंत खडतर मार्गावर चालत, प्रचंड कष्ट करत ते एमबीबीएस परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेच, परंतु पदव्युत्तर -एमएस- परीक्षेतही डॉ. पटेलांनी ‘जनरल सर्जरी’ विभागातील मुंबई विद्यापीठाची चार सुवर्णपदके पटकावली होती! पुढील शिक्षणासाठी डॉ. पटेलांनी इंग्लंडला जाऊन मानाचा एफआरसीएस किताब मिळविला. त्यानंतर काही काळ इंग्लंड-अमेरिकेत पुढील शिक्षणासाठी वास्तव्य केले. ते उत्तम क्रिकेटपटू होते. सर जी.एस. मेडिकल कॉलेजने डॉ. पटेलांच्या नेतृत्वाखाली २५ वर्षांतील पहिला विजय मिळवला होता. परदेशातील वास्तव्यात ते लँकेशायर लीग क्रिकेट खेळले होते.

परदेशात उत्तम नोकरी व पसा कमावण्याची संधी उपलब्ध असतानाही आपल्या मातृभूमीतील रुग्णांची सेवा करायची या भावनेने डॉ. पटेल भारतात परत आले. केईएम रुग्णालयात प्रदीर्घ काळ सेवा बजावून डॉ. पटेल तेथून १९९२ साली प्रोफेसर ऑफ जनरल सर्जरी व ‘मेडिकल आँकोलॉजी’ विभागप्रमुख म्हणून निवृत्त झाले. डॉ. पटेलांनी आयुष्यभर काही मूल्ये मोठय़ा निगुतीने जपली आणि त्यासाठी प्रसंगी संघर्षही केला. कोकणातील त्यांच्या पेंडूर गावच्या मोजणीसमयी सरकारी अधिकाऱ्यांनी दिलेल्या त्रासाविरुद्ध अनेक वर्षे त्यांनी न्यायालयीन संघर्ष केला. जिल्हा ग्राहक संरक्षण मंचापासून सुरू झालेला हा लढा डॉ. पटेलांनी सर्वोच्च न्यायालयापर्यंत दिला व देशाच्या सर्वोच्च न्यायालयातही स्वत:ची बाजू हिरिरीने मांडली.

निवृत्तीनंतरही डॉ. पटेलांनी स्वत:ला समाजकार्यात झोकून दिले होते. कर्करोग निदान शिबिरे, अपना बाजार चालवत असलेल्या सरफरे आरोग्य केंद्रातील ओपीडी अशा अनेक माध्यमांतून कर्मयोग्याप्रमाणे अखेरच्या श्वासापर्यंत ते रुग्णसेवा करत होते.