माथाडी कामगारांना सन्मानाने जगता यावे, यासाठी गेल्या ४० वर्षांपासून संघर्षरत कामगार नेते डॉ. हरीश धुरट यांना नुकताच विदर्भ गौरव प्रतिष्ठानचा सामाजिक क्षेत्रातील अभिनेत्री स्मिता पाटील पुरस्कार जाहीर झाला आहे.
आर्वी तालुक्यातील पिंपळखुटा गावात १ एप्रिल १९५४ला जन्मलेले हरीश धुरट यांनी आईच्या निधनानंतर वयाच्या दहाव्या वर्षी घर सोडले. तू स्वत:साठी नाही तर समाजासाठी जग, असा आईने आशीर्वाद दिला. घरची परिस्थिती तोळामासाच होती. आर्वी, अमरावती, बडनेरा येथे शिक्षण झाले. अमरावतीला कृषी विद्यापीठात विद्यार्थी आंदोलनात ते सहभागी झाले. त्या काळात शांताराम बोकील आणि डॉ. म. गो. बोकरे यांची ओळख झाली. शेतक ऱ्यांच्या प्रश्नांवर काढलेल्या दिंडीची पिंपळखुटाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली होती. त्या आंदोलनात पोलीस जीप जाळल्यामुळे कारागृहात जावे लागले. १९७६ मध्ये ते नागपूरला सदर भागात एका किराणा दुकानात नोकरी करताना मालकाकडे शिकण्याची इच्छा व्यक्त केली. दाभ्याला आंतरभारतीमध्ये बीएचएमएसचे शिक्षण घेतले. त्याच वेळी शासकीय दूध केंद्र मिळाले. सकाळी दूध वाटप केले. वैद्यकीय शिक्षण सुरू होते, तेव्हा होमियोपॅथी महाविद्यालयातही आंदोलने केली. पुढे गावातच दवाखाना थाटला, पण तेथे मन न रमल्याने ते नागपूरला परतले. १९८१ ते ८७ या काळात डॉ. सीमा साखरे, डॉ. रूपा कुळकर्णी, प्रा. श्याम मानव आदींसोबत काम केले. एक दिवस नागपुरातच डॉ. बाबा आढावांशी भेट झाली आणि हमालांसाठी काम कर, असे त्यांनी सांगितले. नगरचे आप्पा कोरपे व धुळ्याचे निंबाजी खतार यांच्यासोबत राहून शहरातील माथाडी कामगारांच्या समस्या त्यांनी जाणून घेतल्या आणि तेव्हापासून त्यांनी खऱ्या अर्थाने हमालांसाठी काम सुरू केले. अनेक आरोप आणि टीकाही झाली. माथाडी कायदा १९७६ साली लागू झाला असला तरी जिल्ह्यात तो १९९१ मध्ये लागू केला. त्यासाठी सरकारविरोधात ते लढले. त्यानंतर संपूर्ण विदर्भात त्यांनी हा माथाडी कायदा लागू करवून घेतला. बाजार समित्यांमध्ये संचालक म्हणून माथाडींचा समावेश करण्यात आला. त्यांच्यावरील दलाल, व्यापारांकडून अन्याय थांबविला. हमालांचे वेतन बँकेतून होण्यासाठी केलेला संघर्ष अखेर यशस्वी झाला. ५० किलोवर ओझे हमालांनी नेऊ नये, यासाठी सरकारला कायदाच तयार करण्यासाठी भाग पाडले. सट्टा व बेकायदा कृत्यांविरुद्ध आंदोलने, बोगस वैद्यक महाविद्यालये बंद पाडणे, यांसह हमालांतील व्यसनाधीनतेविरोधात त्यांनी उपोषण केले. परिणामी आज अनेक व्यसनमुक्त झाले. या संघर्षांसह ते वैद्यकीय सेवाही देत आहेत.