देशाच्या अर्थव्यवस्थेचा प्रवास नियंत्रित अर्थव्यवस्थेकडून मुक्त अर्थव्यवस्थेकडे सुरू झाल्यावर अनेक धोक्याची वळणे होती. या धोक्यांवर मात करून मुक्कामी पोहचण्याचे कसबी काम ज्या बिनीच्या शिलेदारांनी केले त्यापकी एक होते एस एस तारापोर! त्यांच्या निधनाने देशाच्या अर्थव्यवस्थेविषयी ममत्व असलेला एक सच्चा देशभक्त व अर्थतज्ज्ञ आपण गमावला आहे.
१३ सप्टेंबर १९३६ रोजी पारशी कुटुंबात जन्मलेले तारापोर इंग्लंडहून अर्थशास्त्रातील पदव्युत्तर पदवी घेऊन रिझव्‍‌र्ह बँकेत १९६१ मध्ये ‘संशोधन अधिकारी’ म्हणून दाखल झाले व ‘डेप्युटी गव्हर्नर’ म्हणून सेवानिवृत्त झाले. विषयावर असलेली पकड व अनुभवातून आलेला आत्मविश्वास यामुळे आखलेली धोरणांवर असलेली ‘तारापुरी मुद्रा’ लगेच लक्षात यायची. त्यांनी ज्यांच्यासोबत काम केले त्यापकी एक असलेले रिझव्‍‌र्ह बँकेचे तत्कालीन गव्हर्नर चक्रवर्थी रंगराजन यांचा त्यांच्या धोरणांवर प्रचंड विश्वास होता.
रंगराजन यांनी तारापोर यांना धोरणे आखण्यात व राबविण्यात मुक्त वाव दिला. रुपया परिवर्तनीय करण्याचा काळ अजून लांब आहे, अशा मताचे असलेल्या तारापूर यांच्या धोरणामुळे चलन वावटळीची झळ रुपयाला कमी बसली. रिझव्‍‌र्ह बँकेतून सेवानिवृत्त झाल्यानंतर १९९७ मध्ये रुपया परिवर्तनाची वाटचाल कशी असावी याची शिफारस करण्यासाठी तारापोर यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली. यामध्ये चार सदस्यांचा समावेश होता. या समितीने बदलत्या परिस्थितीत देशाचे वित्तीय व्यवस्थापन कसे असावे याचा आराखडा मांडला. वित्तीय तूट, कराच्या रूपाने गोळा होणाऱ्या महसुलाचे प्रमाण वाढविण्याची गरज असल्याचे या समितीने आपल्या अहवालात म्हटले होते. पुन्हा २००७ मध्ये याच विषयावर तारापोर यांची एकसदस्य समिती रिझव्‍‌र्ह बँकेने नेमली. यावरून तारापोर यांचा या विषयावरील व्यासंग लक्षात येतो. तारापोर यांच्या सेवानिवृत्तीनंतरही पतविषयक धोरणे ठरविताना आपण त्यांचा सल्ला घेत होतो, असे रिझव्‍‌र्ह बँकेच्या चार माजी गव्हर्नरांनी आवर्जून नमूद करून त्यांच्याविषयीची कृतज्ञता व्यक्त केली. तर विद्यमान गव्हर्नर रघुराम राजन यांनी तारापोर यांचे रिझव्‍‌र्ह बँकेच्या वाटचालीत योगदान अधोरेखित केले आहे. तारापोर यांच्या निधनाने आपण जवळचा मित्र, एक तत्त्वज्ञ व गुरूला मुकल्याचे १४व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष वाय व्ही रेड्डी यांनी ट्वीट केले आहे. सेवेतील ज्येष्ठाने कनिष्ठाला गुरू मानण्याचा प्रसंग विरळाच.
रिझव्‍‌र्ह बँकेची स्वायत्तता धोक्यात आणण्याचे प्रयत्न आता सुरू झाले आहेत. मात्र तारापोर यांनी फार पूर्वीच रिझव्‍‌र्ह बँकेला असलेली स्वायत्तता कायम ठेवणे देशाच्या हिताचे आहे, अशी ठाम भूमिका घेतली होती. आज असे मत मांडणाऱ्या अनेकांची देशाला गरज असताना ते आपल्यातून निघून गेले..