हिंदी भाषेचा इतर भारतीय भाषांशी संबंध अधिक दृढ करण्यात ज्यांचा वाटा होता त्या जगदीश चतुर्वेदी यांचे नुकतेच निधन झाले. हिंदी कवितांमधील अकविता या नवीन आकृतिबंधाचे ते प्रवर्तक होते. कविता, कथा, कादंबरी, समीक्षा, नाटक, निबंध अशा अनेक प्रकारचे साहित्यप्रकार त्यांनी लीलया हाताळले. ते अलीकडे दिल्लीत स्थायिक झाले होते. देश-विदेशातील अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जगदीश चतुर्वेदी यांचा जन्म १३ जानेवारी १९३३ रोजी ग्वाल्हेर येथे झाला. उज्जैनमधील माधव कॉलेजमध्ये काही काळ अध्यापन केल्यानंतर ते नागपूर आकाशवाणीच्या सेवेत होते. नंतर १९५८ मध्ये त्यांनी ‘भास्कर’ वृत्तपत्रात भोपाळ येथे काम केले. त्यांना या नोकऱ्यांमध्ये अजिबात रस नव्हता. १५ जून १९६९ मध्ये त्यांनी केंद्रीय शिक्षण विभागात भाषा महत्त्व विभागात काम केले. नंतर त्यांनी अनेक नियतकालिकांचे संपादनही केले. विशेष म्हणजे जगातील अनेक भाषांत त्यांचे साहित्य भाषांतरित झाले आहे. त्यांनीही अनेक विदेशी कवींच्या कविता हिंदीत भाषांतरित करून भाषासमृद्धी वाढवली. आधुनिक हिंदी कवितेत जगदीश चतुर्वेदी यांचे स्थान अनन्यसाधारण होते. त्यांच्या काही कवितांमुळे वादही झाले, पण वादांना त्यांनी कधीही महत्त्व दिले नाही. मध्य प्रदेश सरकारने त्यांचा २०१३ मध्ये सरस्वती सन्मान देऊन गौरव केला होता. हिंदी भाषेला समृद्ध करण्यात त्यांचा मोठा वाटा होता. इतिहासहन्ता, नये मसिहा का जन्म डूबते इतिहास का गवाह, सूर्यपुत्र, पूर्व राग, महाप्रस्थान हे त्यांचे कवितासंग्रह प्रसिद्ध आहेत. जीवन का संघर्ष, अंतराल के दो छोर, निहंग, अंधेरे का आदमी, विवर्त, चर्चित कहानिया, प्रेमसंबंधों की कहानियां, आदिम गंध हे कथासंग्रह तर कपास के फूल, पीली दोपहर ही नाटके प्रसिद्ध आहेत.   त्यांनी काही पुस्तकांचे संपादनही केले, त्यात प्रारंभ, विजप, निषेध, कैक्टस और गुलाब, अपना-अपना आकाश, तिसरी दुनिया की कविता यांचा समावेश आहे. भाषा व वार्षिकी या नियतकालिकांचे संपादन त्यांनी केले. सूर पुरस्कार तसेच उत्तर प्रदेश हिंदी संस्थानचा पुरस्कार त्यांना मिळाला होता. मैं मंत्र के जोर से आलोचक को भून दूँगा, मेरी गोली का शिकार शेरनी, जगह वही होगा अशी कविता त्यांनी समकालीन टीकाकारांवर लिहिली होती, त्यामुळे बराच वादही झाला होता.

मराठीतील सर्व व्यक्तिवेध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jagdish chaturvedi profile
First published on: 18-09-2015 at 05:54 IST