भारताची फाळणी ते स्त्री-पुरुष संबंध, भारतीय समाजातील बदलती नाती आणि मानवी मूल्यांचे होणारे पतन यांसारख्या विषयांवर रोखठोक लिखाण करून हिंदी साहित्याचे दालन समृद्ध करणाऱ्या कृष्णा सोबती यांना यंदाचा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाल्याबद्दल साहित्यजगतात आनंदाचे वातावरण पसरले होते. कृष्णाजींना हा पुरस्कार तसा उशिराच मिळाल्याची खंतही अनेकांनी बोलून दाखवली. हे सुरू असतानाच ज्यांचे सारे आयुष्यच काव्यमय बनले होते ते हिंदीतील बुजुर्ग साहित्यिक कुंवर नारायण यांनी जगाचा निरोप घेतल्याची वार्ता बुधवारी आली आणि साहित्यसृष्टीवर शोककळा पसरली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उत्तर प्रदेशातील फैजाबाद येथे १९ सप्टेंबर १९२७ रोजी कुंवर नारायण यांचा जन्म झाला. फैजाबाद आणि अयोध्या या ठिकाणी त्यांचे शालेय शिक्षण झाले. शिक्षणासाठी ते लखनऊ येथे काकांकडे आले. म. गांधींच्या विचारांनी प्रेरित त्यांच्या काकांच्या घरात अनेक राजकीय नेते येत असत. त्यातही बौद्ध समाजवादी नेता विद्वान आचार्य नरेंद्रदेव आणि गांधीवादी आचार्य कृपलानी यांचा त्यांच्यावर विलक्षण प्रभाव पडला. आचार्य नरेंद्रदेवांबरोबर मुंबईमध्ये ते एक वर्ष राहिले. नंतर आचार्य कृपलानींबरोबर दिल्लीला त्यांच्या ‘निजिल’ या पत्रिकेच्या कामासाठी मदत करू लागले. त्यामुळे त्यांची साहित्यिक आवड जोपासली गेली. याच सुमारास १९५१ मध्ये लखनौ विद्यापीठातून त्यांनी इंग्रजी विषयात एम.ए. पूर्ण केले. वडिलांच्या व्यवसायात ते मदत करीत असले तरी त्यांची साहित्य क्षेत्रातील मुशाफिरी सुरूच होती.

१९५६ मध्ये त्यांचा ‘चक्रव्यूह’ हा पहिला काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला. हिंदी साहित्यातील ही एक प्रमुख साहित्यकृती मानली जाते. त्यानंतर ‘परिवेश’, ‘हम तुम’ (१९६१), ‘अपने सामने’ (१९७९), ‘कोई दुसरा नहीं’ (१९९३), ‘इन दिनो’ (२००२), ‘हाशिये का गवाह’ इ. काव्यसंग्रह प्रकाशित झाले.

‘अपने सामने’ या संग्रहातील अधिकतर कविता सामाजिक, राजकीय विडंबनात्मक आहेत. सखोल जीवनानुभव, विपुल अध्ययन, गंभीर चिंतन यामुळे त्यांचे साहित्य लक्षणीय बनले. त्यांनी कथा, समीक्षालेखनाबरोबरच चित्रपट, संगीत, कला व इतिहास या विषयांवरही लेखन केले आहे. काही पुस्तकांचा अनुवादही केला.

अज्ञेयजींच्या १९५९ मधील ‘तिसरा सप्तक’मध्ये कुंवरजींच्या कवितांचा समावेश केल्याने त्यांना बऱ्यापैकी प्रसिद्धी मिळाली, पण १९६५ मध्ये ‘आत्मजयी’ हे दीर्घकाव्य सिद्ध झाले आणि त्यांची कवी म्हणून ओळख प्रस्थापित झाली. मृत्यूसंबंधी शाश्वत प्रश्न कठोपनिषदच्या माध्यमातून आत्मजयी या दीर्घकाव्यातून त्यांनी वाचकांसमोर ठेवले. ‘वाजश्रवाके बहाने’ या दीर्घकाव्यात  मृत्यूसारख्या विषयावर भाष्य करीत आजच्या सैरभैर मानसिकतेला दिलासा देण्याचे काम त्यांनी केले.

१९७१ मध्ये ‘आकारों के आसपास’ हा त्यांचा कथासंग्रह, १९९८ मध्ये ‘आज और आजसे पहिले’, ‘मेरे साक्षात्कार’, ‘साहित्य के कुछ अन्तर्विषयक संदर्भ’ (२०१३) हे समीक्षा ग्रंथही प्रसिद्ध झाले . आपल्या प्रदीर्घ आयुष्यात त्यांना अनेक सन्मान प्राप्त झाले. हिंदुस्थानी पुरस्कार, प्रेमचंद पुरस्कार, पुणे पंडित पुरस्कार, व्यास सन्मान, साहित्य अकादमी, कबीर सन्मान, पद्मभूषण, वॉर्सा (पोलंड) विद्यापीठाचे सन्मानपदक आणि भारतीय साहित्यात सर्वश्रेष्ठ समजल्या जाणाऱ्या ज्ञानपीठ पुरस्कारानेही त्यांचा गौरव झाला होता. इटलीमधील ‘प्रेमिओ फेरोनिया’ हा आंतरराष्ट्रीय लेखकाला दिला जाणारा सन्मान कुंवरजींच्या रूपाने प्रथमच एका भारतीय लेखकाला मिळाला होता.

मराठीतील सर्व व्यक्तिवेध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta vyakti vedh poet kunwar narayan
First published on: 17-11-2017 at 02:06 IST