दृष्टिहीन आणि सामान्य नागरिकांमध्ये संवाद प्रक्रिया वाढावी आणि दृष्टिहिनांनाही मुख्य प्रवाहात मानाने जगता यावे, यासाठी सतत प्रयत्नरत असलेल्या राधा बोर्डे- इखनकर त्यांच्या सुमधुर आवाजासाठी ओळखल्या जात. त्या पूर्णत: दृष्टिहीन असल्या तरी सामान्य माणसाला लाजवेल, असे भगीरथ काम त्यांनी उभे केले होते. दृष्टिहिनांसाठी त्यांनी १९९०मध्ये पहिली संस्था काढली. सध्या संस्थेत १० विद्यार्थिनी आहेत. अंध मुलींना ‘मोबिलिटी’चा सराव नसतो. कारण लहानपणापासूनच कुटुंबात काळजीपोटी केवळ जागेवर बसून राहण्याची ताकीद दिली जाते. मुलींना मोबिलिटी मिळावी म्हणून उन्हाळ्यात त्या कार्यशाळाही आयोजित करीत. महाराष्ट्रातून मुली या उपक्रमात सामील होत असत. त्यानंतर तर मुलींच्या निवासी वसतिगृहात मुलींच्या शिक्षणासाठी त्यांनी वाहूनच घेतले होते. मुलींना त्यांनी मायेचा आधार दिला. वसतिगृहात आल्यावर अनेक मुलींनी त्यांच्या घरचे स्वयंपाकघर देखील पाहिले नव्हते. अशा मुलींना स्वयंपाक घराची पूर्ण माहिती देऊन त्या देखील स्वतंत्रपणे स्वयंपाक करू शकतात, असा विश्वास त्यांच्यात निर्माण केला. ही सर्व कामे करताना त्यांनी अनेक दानदाते जोडले होते, हे विशेष. मानेवाडा मार्गावरील शाहू गार्डनचे मालक तर डिसेंबरमधील ‘पांढरी काठी दिन’ कार्यक्रमासाठी दरवर्षीच शाळेचा परिसर उपलब्ध करून देत. त्यात राधाताई पांढरी काठी आणि दिवाळीच्या फराळाबरोबरच अंध विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीही प्रदान करीत असत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

त्यांच्या सामाजिक कार्याची दखल समाजातील अनेक गणमान्य व्यक्ती घेत असत आणि त्यांना मुक्तहस्ते मदतही करीत असत. उत्कर्ष असोसिएशन फॉर ब्लाईंड संस्थेच्या सचिव आणि प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्यां म्हणून राधाताईंनी एक वेगळीच छाप सोडली होती. तीन वर्षांच्या असताना कांजण्यांमुळे त्यांची दृष्टी गेली. त्या संगीत विशारद होत्या तसेच मराठी साहित्यात पदव्युत्तर शिक्षणात त्या नागपूर विद्यापीठातून दुसऱ्या होत्या. अंधत्वामुळे समाजातून मिळणाऱ्या हीन वागणुकीमुळे त्या अस्वस्थ व्हायच्या. पण याच समाजात राहून कामे करायची आहेत, अशी मनाची समजूत घालीत त्यांनी एलएडी महाविद्यालय आणि विदर्भ बुनियादी महाविद्यालयात अध्यापनाचेही काम केले. याच काळात त्यांनी दत्तवाडीमध्ये अंध महिला विकास बहुद्देशीय संस्थेची स्थापना केली. मुलींनी शैक्षणिक, आर्थिक, बौद्धिक प्रगती करून कमावते झाले पाहिजे, यासाठी त्या प्रयत्नरत असत. त्यांच्या जाण्याने अनेक अंध मुली पोरक्या झाल्याची भावना मनात दाटून आली. सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या राधा बोर्डे यांचे अपघाती निधन अनेकांना अस्वस्थ करून गेले.

मराठीतील सर्व व्यक्तिवेध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta vyakti vedh radha borde
First published on: 02-03-2018 at 02:06 IST