‘कुटुंब रमलंय क्रिकेटमध्ये’ ही संज्ञा लागू होईल अशी अनेक कुटुंबे क्रिकेटमध्ये आढळतात. वॉ, चॅपेल, अमरनाथ, ब्रॉड आदी अनेक कुटुंबांप्रमाणे न्यूझीलंडमधील क्रो कुटुंब. यापैकी मार्टिन क्रोने कर्करोगामुळे जगाचा निरोप घेतला. त्याचा मोठा भाऊ जेफ क्रो, हासुद्धा न्यूझीलंडचा एके काळी कर्णधार होता. या भावंडांची आई ऑड्रे आणि वडील डेव्ह यांनीसुद्धा क्रिकेटमध्ये आपला ठसा उमटवला आहे. त्यामुळे वयाच्या ५३व्या वर्षी मार्टिनने जग सोडले, ही बातमी साऱ्यांनाच चुटपुट लावणारी आहे.वयाच्या ५३व्या वर्षी मार्टिनने जग सोडले, ही बातमी साऱ्यांनाच चुटपुट लावणारी आहे.

क्रोची कारकीर्द १३ वर्षांची. मात्र कारकीर्दीच्या प्रारंभीच्या टप्प्यात सर्वोत्तम युवा फलंदाज अशी ओळख त्याने निर्माण केली. मध्यमगती गोलंदाजी हे त्याचे वैशिष्टय़. या कालखंडात ७७ कसोटी सामन्यांत ४५.३६ च्या सरासरीने ५४४४ धावा त्याने काढल्या. निवृत्तीप्रसंगी न्यूझीलंडकडून सर्वाधिक धावा, सर्वाधिक वैयक्तिक खेळी (२९९), सर्वाधिक अर्धशतके (१७) आणि सर्वाधिक शतके (१७) हे विक्रम त्याच्या नावावर होते. १९९१ मध्ये श्रीलंकेविरुद्ध क्रोने साकारलेल्या २९९ धावांच्या खेळीचा विक्रम २०१४पर्यंत अबाधित होता. ब्रेंडन मॅक्क्युलमने त्रिशतक झळकावून तो मोडला. याच ऐतिहासिक खेळीसह मार्टिनने अ‍ॅन्ड्रय़ू जोन्ससोबत तिसऱ्या विकेटसाठी ४६७ धावांची भागीदारी केली होती; जी जागतिक क्रिकेटमध्ये आजही तिसऱ्या स्थानावर आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्येही मार्टिनने १४३ सामन्यांत ४७०४ धावा केल्या. त्याने चार वष्रे देशाचे नेतृत्व केले. १९८३ आणि ८७ या दोन विश्वचषक स्पर्धामध्ये न्यूझीलंडची गणना लिंबूटिंबू संघांमध्ये केली जायची. मात्र १९९२च्या विश्वचषकात मार्टिन क्रोच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंड संघाने त्वेषाने गरुडझेप घेतली. राऊंड रॉबिन लीगमधील ८ पैकी ७ सामने जिंकून किवी संघाने सर्वानाच अचंबित केले होते. परंतु दुर्दैवाने उपांत्य फेरीत न्यूझीलंडचा मार्ग रोखला गेला. या काळात फिरकी गोलंदाजीनिशी डावाला प्रारंभ करणे आणि पिंच हिटर फलंदाजी हे प्रयोग करून त्याने क्रिकेटमध्ये क्रांती घडवली होती. निवृत्तीनंतरसुद्धा समालोचन आणि लेखन हे क्रिकेटशी निगडित कार्य त्याने चालू ठेवले. याचप्रमाणे ‘स्काय टेलिव्हिजन’मध्ये नोकरी करताना ‘क्रिकेट मॅक्स’ या नावाने क्रिकेटचे या खेळाचे लघुरूप शोधून काढले. आधुनिक क्रिकेटमधील क्रांतिकारक पर्व मानले जाणाऱ्या ‘ट्वेन्टी-२०’ क्रिकेटची ती पायाभरणी होती. १९९२ मध्ये मार्टिनच्या क्रिकेटमधील सेवेबद्दल ‘मेंबर ऑफ द ऑर्डर ऑफ ब्रिटिश एम्पायर’ने त्याला सन्मानित करण्यात आले. मग २०१५ मध्ये मायभूमीवर झालेल्या विश्वचषक स्पध्रेदरम्यान ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड सामन्याप्रसंगी मार्टिनला ‘आयसीसी क्रिकेट हॉल ऑफ फेम’ हा सन्मान देण्यात आला. क्रिकेटमधील क्रांतिपर्वाचा जनक मानल्या जाणाऱ्या मार्टिन क्रोच्या निधनामुळे क्रिकेटचे अपरिमित नुकसान झाले आहे.