मूळचे आंबोली मुळवंदवाडी येथील नाईक पांडुरंग महादेव गावडे यांनी शूर नायकाप्रमाणे जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्य़ातील ड्रगमुला येथे जैश-ए-मोहम्मदच्या पाच दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण पत्करले. लष्कराच्या नॉर्दर्न कमांडचे  जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ लेफ्टनंट जनरल डी. एस. हुडा आणि नॉर्दर्न कमांड मुख्यालयाचे जनसंपर्क अधिकारी कर्नल एस. डी. गोस्वामी यांनी गावडे यांचे युद्धकौशल्य, शौर्य, कसब आणि धडाडीचे कौतुक केले आहे. दहशतवाद्यांचा नायनाट करण्यासाठी गेलेल्या लष्कराच्या पहिल्या पथकाचे ते नेतृत्व करत होते. त्यांच्या शहीद होण्याने देशाने एक कसलेला आणि निष्णात सैनिक गमावला आहे. मूळचे मराठा लाइट इन्फंट्रीचे आणि सध्या ४१ राष्ट्रीय रायफल्स या दहशतवादविरोधी पथकात असलेले गावडे सर्व प्रकारच्या युद्धकौशल्यात आणि तंत्रकौशल्यात पारंगत होते. ते उत्तम नेमबाज (स्नायपर), रेडिओ ऑपरेटर होते तसेच ते संगणक आणि सर्व प्रकारचे रेडिओ संच हाताळण्यात वाकबगार होते. ते चांगले फुटबॉल, हॉकी व बास्केटबॉलपटूही होते. त्यांच्या जीवनातील अखेरच्या ठरलेल्या या चकमकीतही त्यांनी लष्कराच्या आणि मराठा लाइट इन्फंट्रीच्या सर्वोच्च परंपरेचे पालन करत आपल्या दलाचे अगदी अग्रभागी राहून नेतृत्व करत नऊ तास झुंज दिली आणि दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. मात्र त्यादरम्यान स्फोटकांतील छर्रे (स्प्लिंटर्स) त्यांच्या पायांत आणि डोक्यातही घुसल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने १६८ मिलिटरी हॉस्पिटल आणि नंतर श्रीनगरमधील ९२ बेस हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. उपचारादरम्यान त्यांना वीरमरण आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

त्यांचे हे बलिदान त्यांच्या घराण्याच्या आणि पथकाच्याही लष्करी परंपरेला साजेसेच होते. पांडुरंग यांचे दोन्ही मोठे भाऊसुद्धा सैन्यातच सेवा बजावत आले आहेत, त्यापैकी गणपत महादेव गावडे हे पांडुरंगचे मोठे भाऊ निवृत्त सैनिक असून, मधला भाऊ अशोक गावडे हे सध्या धुळे येथे एन. सी. सी.मधून सैन्यात कार्यरत आहेत. गेल्या काही दिवसांत ४१ राष्ट्रीय रायफल्सने गमावलेले गावडे हे तिसरे सुपुत्र आहेत. १७ नोव्हेंबर २०१५ रोजी मूळचे सातारचे असलेले ४१ राष्ट्रीय रायफल्सचे कमांडिंग ऑफिसर आणि पॅरा कमांडो कर्नल संतोष महाडिक यांना मनिगाह येथील जंगलात तर १३ फेब्रुवारीला नाशिकच्या बयाले गावचे नाईक शंकर चंद्रभान शिंदे यांना चौकीबलजवळील झुरेशी गावात दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण आले होते.

मराठीतील सर्व व्यक्तिवेध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pandurang gawade
First published on: 24-05-2016 at 04:03 IST