भारत येत्या २०३० पर्यंत तरी विज्ञानात महाशक्ती बनू शकणार नाही, असे नोबेल विजेते वैज्ञानिक व्यंकटरमण रामकृष्णन यांनी इन्फोसिस पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमात सांगितले आहे. असे असले तरी आपल्या देशातील वैज्ञानिक त्यांच्या पातळीवर संशोधन क्षेत्रात पुढे जात आहेत. त्यात बंगळुरूच्या इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्सेसच्या प्रा. व्ही. कुमारन यांचा समावेश आहे.
रामकृष्णन जे म्हणाले त्यातही तथ्य आहे कारण भारत सरकारची विज्ञान संशोधनातील गुंतवणूक फार कमी आहे. पाश्चिमात्य देशात खासगी कंपन्यांची या क्षेत्रातील गुंतवणूकही मोठी आहे तशी आपल्याकडे नाही ही त्यांनी सांगितलेली काही कारणे योग्यच आहेत. शिवाय राजकीय हस्तक्षेपही टाळता आला पाहिजे. कुमारन यांना लहानपणापासून गणिताची आवड होती त्यामुळे त्यांना संगणक व अभियांत्रिकी क्षेत्रात गोडी निर्माण झाली व ती आजतागायत कायम आहे. एखाद्या विषयात असलेला रस टिकवून ठेवणे हे संगणक व अभियांत्रिकी यासारख्या जटिल विषयात खरोखर चांगले ज्ञान असल्याशिवाय शक्य नाही त्यामुळेच मुळातून प्रज्ञावंत असलेल्या कुमारन यांना ते शक्य झाले. त्यांनी संगणक व अभियांत्रिकीतील तंत्रज्ञानाचा वापर वैद्यकीय क्षेत्रातील काही सुविधांसाठी केला आहे. हायड्रोडायनॅमिक इन्स्टॅबिलिटी, ट्रान्झिशन टू टब्र्युलन्स, फ्लो अॅण्ड मिक्सिंग ऑफ मायक्रो फ्लुइडिक डिव्हाइसेस, डायनॅमिक्स ऑफ कॉम्प्लेक्स फ्लुईड्स, ग्रॅन्युलर फ्लोज हे त्यांचे संशोधनाचे खास विषय आहेत. त्यांना भारतात विज्ञानात सर्वोच्च मानला जाणारा भटनागर पुरस्कार व स्वर्णजयंती विद्यावृत्ती तसेच इतर अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
इंडियन अॅकॅडमी ऑफ सायन्सेस, द इंडियन नॅशनल सायन्स अॅकॅडमी यांचे ते फेलो आहेत. सध्या ते इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्सेस या संस्थेच्या रासायनिक अभियांत्रिकी शाखेत प्राध्यापक आहेत. १९८७ मध्ये त्यांनी आयआयटी मद्रास येथून बी टेक पदवी घेतली. नंतर १९९२ मध्ये कॉर्नेल विद्यापीठातून पीएच डी झाले. अमेरिकन फिजिकल सोसायटीचे फेलो म्हणून त्यांची २०१५ मध्ये निवड झाली. मायक्रोफ्लुइडिक डिव्हाइसेसला अलीकडच्या काळात हृदयरोग व श्वसन रोगाशी संबंधित आरोग्याच्या अनुषंगाने महत्त्व आहे. त्यात कुमारन यांनी मृदू आवरण कुप्या व मार्गिका तयार करण्यात यश मिळवले. लॅब ऑन चीप हे त्यांच्या प्रयोगांचे वैशिष्टय़ असून त्यांच्या संशोधनामुळे काही अभिक्रिया कमी वेळात तपासणे शक्य झाले आहे. टाटा सोशल एंटरप्राइज चॅलेंज स्पर्धेत त्यांच्या संशोधनाला मान्यता मिळाली होती त्या वेळी ते मायक्रोएक्स लॅबमध्ये काम करीत होते. पॉलिमर, पॉलिमर जेल, भारित पारपटले यात त्यांनी उपयोजित संशोधन केले आहे. अन्न व सौंदर्य प्रसाधन क्षेत्रात वापरल्या जाणाऱ्या लॅमेलर लिक्विड क्रिस्टलाइन पदार्थाची निर्मिती करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. युनिलिव्हर, प्रॉक्टर अॅण्ड गॅम्बल यासारख्या अनेक कंपन्यांच्या उत्पादनात त्याचा वापर केला आहे. अर्थात त्यांच्या या संशोधनाचा वापर प्रत्यक्षात असल्याने त्यांचा गौरव करण्यात आला आहे. शेवटी विज्ञान हे मानवाच्या कल्याणासाठी असते, त्यांच्या या गौरवातून समाजोपयोगी संशोधनाबरोबरच विज्ञानात नवीन संकल्पना शोधणाऱ्या संशोधकांना प्रोत्साहन मिळणार आहे.