सर्वसाधारणपणे  भारतीय संरक्षण दलातील प्रमुखाची निवड दोन-तीन महिने आधीच जाहीर केली जाते. दलाचे नेतृत्व करताना येणाऱ्या जबाबदाऱ्यांविषयी संबंधित व्यक्ती परिचित व्हावी, असा हेतू यामागे असतो. भारतीय हवाई दलाच्या प्रमुखपदाची जबाबदारी स्वीकारणारे व्ही. आर. (विवेक राम) चौधरी यांना तसा वेळच मिळाला नाही. नाव जाहीर झाल्यानंतर अवघ्या नऊ दिवसांत त्यांना पदाची सूत्रे स्वीकारावी लागली. अर्थात, आजवरचा प्रदीर्घ अनुभव हवाई दलाचे सक्षमपणे नेतृत्व करण्यास त्यांना निश्चितपणे कामी येईल. चौधरी कुटुंबाचे महाराष्ट्राशी नाते आहे. नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील हस्तरा हे कधीकाळी या कुटुंबाचे गाव. वडील तेलंगणातील हैदराबाद येथे स्थायिक झाल्याने व्ही. आर. चौधरी यांचे शालेय शिक्षण तिकडेच झाले. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतील (एनडीए) खडतर प्रशिक्षण पूर्ण करून डिसेंबर १९८२ मध्ये ते लढाऊ वैमानिक म्हणून हवाई दलात दाखल झाले.  तब्बल ३८०० तास उड्डाणाचा अनुभव त्यांच्याकडे आहे. यात मिग २१, मिग २३ एमएफ, मिग २९ या मिग श्रेणीबरोबर अलीकडेच फ्रान्सकडून खरेदी केलेल्या राफेलचाही समावेश आहे. महत्त्वाची बाब म्हणजे राफेल खरेदी प्रक्रियेसाठी स्थापलेल्या द्विपक्षीय उच्चस्तरीय गटाचे ते प्रमुख होते. प्रत्यक्ष युद्धभूमी आणि प्रशासकीय विभागात महत्त्वाच्या पदांची धुरा त्यांनी सांभाळली. मेघदूत, सफेद सागर या मोहिमांमध्ये ते सहभागी झाले होेते. पाकिस्तानी लष्कराने १९८४ मध्ये सियाचीनवर कब्जा करण्याचा प्रयत्न केला होता. भारतीय लष्कराने मेघदूत मोहिमेद्वारे तो हाणून पाडला. जगातील सर्वांत उंच युद्धभूमीवरील या मोहिमेत हवाई दलाने महत्त्वाची भूमिका बजावली. चौधरी यांनी लढाऊ आणि प्रशिक्षक विमानांचे परीक्षक, मिग २९ तुकडीचे प्रमुख, पश्चिमी आणि दक्षिण-पश्चिमी या आघाडीवरील तळाचे मुख्य कारवाई (ऑपरेशन) अधिकारी, बेस कमांडर म्हणून काम पाहिले आहे. हवाई दलाच्या पश्चिमी विभागाकडे चीन आणि पाकिस्तानलगतच्या सीमांलगतचे क्षेत्र तसेच लडाखच्या संरक्षणाची जबाबदारी आहे. याच क्षेत्रात भारत-चीनचे सैन्य १६ महिने समोरासमोर उभे ठाकले होते. या विभागाचे हवाई अधिकारी  (एओसी)  म्हणूनही चौधरी यांनी काम केले आहे.  हवाई दल प्रबोधिनीचे डेप्यूटी कमांडंट, हवाई संरक्षण विभागाचे सहाय्यक प्रमुख, हवाई दलाचे उपप्रमुख अशा महत्वाच्या पदांची जबाबदारी सांभाळली. आजवरच्या कामगिरीबद्दल चौधरी यांना परमविशिष्ट  सेवा पदक, अतिविशिष्ट सेवा पदक आणि वायू सेवा पदकाने सन्मानित करण्यात आले आहे.