‘मराठीतला वैचारिक निबंध हा प्रकार स्वातंत्र्योत्तर काळात संपला आणि ललित निबंधच बोकाळले’ अशी तक्रार करणाऱ्यांना बहुधा सुधीर बेडेकरांचे ‘तात्पर्य’मधील लिखाण माहीत नसते.. किंवा सुधीर बेडेकर, ते आधी ‘मागोवा’चे आणि आणीबाणी -नंतरच्या काळात ‘तात्पर्य’चे संपादन करीत, वगैरे माहीत असले तरी ‘समाजवादी शिव्यांच्या शोधात’ हा त्यांचा निबंध माहीत नसतो. संस्कृती-समीक्षा, मार्क्‍सवादाचे अध्ययन, समता या संकल्पनेचा अभ्यास आणि मनुष्यस्वभावाचे आकलन अशा किती तरी अंगांनी महाराष्ट्रात प्रचलित असणाऱ्या शिव्यांना भिडणारा हा ‘समाजवादी शिव्यांचा शोध’, अवघ्या चार-पाच पानांत वाचकाला नवी दृष्टी देतो.. संकल्पनांचा आणि वैचारिक वादांचा वा भूमिकांचा संबंध आपल्या भोवतालाशी कसा जोडायचा असतो, ही ती दृष्टी!

शुक्रवारच्या पहाटे, अवघ्या ७६ व्या वर्षी सुधीर बेडेकरांचे निधन झाल्यावर मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे त्यांना आदरांजली वाहताना ‘ते मार्क्‍सवादाचे उत्तम शिक्षक होते.. अनेक शिबिरांत त्यांनी मार्गदर्शन केले’ असाही उल्लेख आहे, त्याची सार्थकता ‘समाजवादी शिव्यांचा शोध’सारख्या निबंधांतून उमगावी. अर्थात, सरळसाध्या संवादी शैलीतून गहन संकल्पनांना थेट भिडण्याची रीत सुधीर बेडेकरांकडे तरुणपणापासूनच होती. ‘मागोवा गट’ वाढत होता, तो याच थेटपणामुळे. ‘ऊठ वेडय़ा, तोड बेडय़ा’ लिहिणारे कुमार शिराळकर, किंवा पुढे ‘लोअर परळ’सारखी चित्रे काढणारे सुधीर पटवर्धन, अशा अनेक ‘मागोवा’ सदस्यांनी असाच थेटपणा आपापल्या पद्धतीने टिकवला होता. आधी मागोवा गट, त्यातल्या चर्चा आणि त्याजोडीने ‘मागोवा’ हे नियतकालिक, सोबत ‘पीयूएसयू’ या पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या संघटनेला मार्गदर्शन, यांतून सुधीर बेडेकरांनी अनेक तरुण मने जोडली. ही सारी मने प्रस्थापित व्यवस्थेत बदल घडवण्याच्या आणि समता व न्याय यांच्या ध्येयाने प्रेरित होती, त्यांपैकी अनेक जण पुढे ‘डावे’ उरले नाहीत, पण कार्यरत राहिले. आणीबाणीनंतर बेडेकर काहीसे बदललेले दिसतात. शहादा येथील श्रमिक संघटनेशी, लोकविज्ञान चळवळीशी त्यांचा संबंध कायम राहिला, पण भोवतीचे कार्यकर्त्यांचे मोहोळ कमी झाले. म्हणून कामात काही फरक पडत नव्हता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मार्क्‍सवादी समीक्षेचा प्रवाह मराठीत आणणारे दि. के. बेडेकर हे त्यांचे वडील. पण सुधीर यांची अभ्यासू वृत्ती हा काही केवळ जनुकीय अपघात नव्हता. बी.टेक. पदवीचेही पैलू त्या अभ्यासूपणाला होते. विचारांची वैज्ञानिक शिस्त हा आयआयटीसारख्या संस्थेचीही देणगी होती. कॉ. शरद पाटील यांच्यासारखे विचारवंत ‘मागोवा’च्या जवळचे नव्हते, पण वर्गजाणिवेसोबत वर्णव्यवस्था आणि तिच्या परिणामांची, ओरखडय़ांची जाण ठेवल्याशिवाय समाजभान येणार नाही, हे ‘मागोवा’चेही म्हणणे होते. त्यातूनच दलित साहित्याची पाठराखण सुधीर बेडेकरांनी केली. पुढे ‘समाजविज्ञान अकादमी’चे काम अधिक विविधांगी झाले, ‘भगतसिंग वाचनालय’ उभे राहिले, त्यात तोवरच्या या व्यक्तिगत वाटचालीचाही वाटा होता. सुधीर बेडेकर हे या अकादमीचे विश्वस्त व अध्यक्ष होते. अलीकडच्या काळात राजकीय परिस्थितीबद्दल अधिक व्यक्त न होता, दि. के. बेडेकर यांच्या अप्रकाशित लेखांची संकलने करण्याचा उपक्रम त्यांनी हाती घेतला होता. सुधीर बेडेकरांची ‘हजार हातांचा ऑक्टोपस’ आणि ‘विज्ञान, कला आणि क्रांती’ ही पुस्तके आज सहजी मिळत नाहीत, ‘मागोवा’ आणि ‘तात्पर्य’च्या अंकांचे पीडीएफ-रूपदेखील ‘मागोवा.इन’ या संकेतस्थळावर आजघडीला मिळत नाही.. ते सारे आजच्या तरुणांसाठी उपलब्ध असणे हाच बेडेकरांना आदरांजलीचा उत्तम मार्ग.. कारण, सुधीर बेडेकर तरुणांसाठी उपलब्ध असले तर तरुणांमध्ये फरक पडतो, हे सांगणाऱ्या दोन पिढय़ा आजही आहेत.