महेश भागवत

१९९५ मध्ये भारतीय पोलीस सेवेत दाखल झालेले महेश मुरलीधर भागवत हे सध्या तेलंगणात कार्यरत आहेत.

मानवी तस्करी रोखण्यात अभिनव पद्धतीने प्रयत्न करणारे आयपीएस अधिकारी महेश भागवत यांना अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याने २०१७ चा टीआयपी रिपोर्ट हिरो पुरस्कार देऊन गौरवले आहे. २७ जूनला मानवी तस्करीबाबतचा हा अहवाल जाहीर करण्यात आला, त्यात वास्तवातील ज्या नायकांचा गौरव करण्यात आला, त्यात भागवत हे एक.

१९९५ मध्ये  भारतीय पोलीस सेवेत दाखल  झालेले महेश मुरलीधर भागवत हे सध्या तेलंगणात कार्यरत आहेत. ते मूळ अहमदनगर जिल्ह्य़ातील पाथर्डीचे आहेत. मानवी तस्करीविरोधात त्यांनी गेली १३ वर्षे काम केले असून त्याच जोडीला त्यांनी नक्षलवादाच्या प्रश्नातही चांगली कामगिरी केली आहे. अक्षरश: शेकडो लोकांना त्यांनी मानवी तस्करीच्या शापातून बाहेर काढले आहे. त्यात त्यांनी नागरी समुदाय संघटना व इतर सरकारी विभागांची मदतही घेतली. साधारणपणे प्रत्येक मोठय़ा शहरात मानवी तस्करीचे प्रकार चालतात. महिला व मुलींना विकून त्यांना वेश्या व्यवसायास लावले जाते. पण ही प्रकरणे सरधोपटपणे हाताळली जातात. भागवत यांनी ती अभिनव पद्धतीने हाताळत त्यांच्या मुळाशी जाऊन अनेक टोळ्यांची कारस्थाने उघड केली हे त्यांचे वैशिष्टय़. सध्या ते ज्या रचाकोंडा पोलीस क्षेत्रात काम करीत आहेत तेथे त्यांनी पाच हॉटेल्स व २० निवासी इमारतीत चालणारे किमान २५ कुंटणखाने बंद केले.

अनेकदा कामगारांचीही तस्करी करून त्यांना गुलामासारखे वागवले जाते. त्यातही त्यांनी मोठी टोळी उघडकीस आणली असून देशातील अशा मोठय़ा मोहिमेचे नेतृत्व केले. बालकामगार ठेवणे गुन्हा असला तरी अजूनही असे प्रकार सर्रास चालतात. भागवत यांनी ३५० मुलांना वीटभट्टीच्या कामांवरून मुक्त करून त्यांचे कोमेजलेले बालपण त्यांना परत बहाल केले आहे. तेलंगण राज्यात त्यांनी मानवी तस्करीविरोधात काम केले असून त्यात त्यांना यश येण्याचे कारण म्हणजे त्यांचे स्वयंसेवी संस्था व सरकारी विभागांशी असलेले संबंध व त्यांच्याकडून मिळत असलेले सहकार्य.  अमेरिकेचे परराष्ट्र खाते दर वर्षी मानवी तस्करीविरोधात काम करणाऱ्या नायकांचा सत्कार करते. त्यात या वेळी भागवत यांचा समावेश आहे. अर्जेटिनाच्या अलिका किनन, ब्राझीलचे लिओनाडरे साकामोटो, कॅमेरूनच्या वनजा जॅसफाइन, हंगेरीच्या व्हिक्टोरिया सेभलयी, मोरोक्कोच्या अमिना ओफ्रोखी, तैवानचे अ‍ॅलिसन ली, थायलंडचे बूम मोसबी यांच्याबरोबर भारताचे भागवत यांचाही सन्मान होत आहे, ही अभिमानस्पद बाब आहे. गुलामगिरी नष्ट झाली, असे आपण म्हणत असलो, तरी छुप्या मार्गाने आधुनिक काळातही ती चालू आहे, त्याविरोधात रणशिंग फुंकणाऱ्या मानवतेच्या पुजाऱ्यांपैकी भागवत एक  आहेत. भागवत यांनी अभिनव मार्गाचा अवलंब करून नक्षलवादाचा सामना केला.

अदिलाबाद जिल्ह्य़ात गंगापूर हे गाव म्हणजे २००४ मध्ये नक्षलवाद्यांचा बालेकिल्ला होते. तेथील लोक त्यांचा तांदूळ व वन उत्पादने बाजारपेठेत नेऊ शकत नव्हते, कारण रस्ता नव्हता, शाळेत शिक्षक नव्हते, नागरी प्रशासनाचा पत्ता नव्हता.  त्या परिस्थितीत भागवत यांनी रस्ता बांधण्यात मदत केली. या रस्त्याच्या उद्घाटनासाठी खासदार आले, तेव्हा गावकऱ्यांनी त्यांना धक्काबुक्की केली; कारण त्यात त्यांचे काहीच कर्तृत्व नव्हते.  तेथील कापूस घेण्यासाठी महाराष्ट्रातून ट्रक गंगापूरला जातात. आता तेथील शिक्षकांनी शाळेत येण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे नक्षलवादाचा मागमूस नाही. याचे श्रेय भागवत यांनाच आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Telangana ips officer mahesh muralidhar bhagwat

ताज्या बातम्या