अमेरिकेचे माजी राजदूत जॉन गुंथर डीन हे मुत्सद्देगिरीतले एक नायकच होते, पण त्यांच्या आयुष्यातील अखेरच्या कथानकाने त्यांच्या बंडखोरीला खलनायक ठरवण्याचा प्रयत्न केला. ही बंडखोरी होती अमेरिकेच्या इस्रायलबाबतच्या बदललेल्या भूमिकेविरुद्ध. पाकिस्तानचे राष्ट्रपती महंमद झिया ऊल हक यांची हत्या कोणी केली, असा प्रश्न उपस्थित करून त्या विमान अपघाताच्या चौकशीची मागणी डीन यांनी केली होती. या कथित अपघातात हक यांच्यासह अमेरिकेचे राजदूत अरनॉल्ड राफेल यांचाही मृत्यू झाला होता. हे राफेल डीन यांचे मित्र. डीन यांचा रोख इस्रायलकडे होता. हा अपघात नसून घातपात होता आणि त्यामागे इस्रायलचा हात होता, असा त्यांचा ठाम विश्वास होता. त्यापायी, त्यांना जवळजवळ वेडय़ात काढून अमेरिकी प्रशासनाने राजीनामा देण्यास भाग पाडले. त्यानंतर ते पॅरिसला स्थायिक झाले आणि तेथेच ६ जूनला वयाच्या ९३व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. डीन यांची कारकीर्दच नाटय़पूर्ण घडामोडींची होती. त्यांच्यावर दोनदा जीवघेणे हल्ले झाले. त्यापैकी बैरुतमधील हल्ल्यामागे इस्रायलचा हात असल्याची ‘थिअरी’ त्यांनी आपल्या ‘डेन्जर झोन्स : ए डिप्लोमॅट्स फाइट फॉर अमेरिकाज इंटरेस्ट’ या पुस्तकात मांडली आहे. कंबोडियात १९७४-७५मध्ये यादवीचा आगडोंब उसळल्यानंतर डीन यांना तेथे पाठवण्यात आले होते. कम्युनिस्ट बंडखोरांनी कंबोडियाची राजधानी नॉम पेनवर हल्ला केल्यानंतर आणि अमेरिकेने तेथील लष्करी मदत थांबवल्यावरही डीन यांनी जिवावर उदार होऊन दूतावासातील अधिकारी व बंडखोरांविरुद्ध लढणाऱ्यांना शहराबाहेर काढले. एका मुलाखतीत ते म्हणाले होते, ‘मी शेकडो लोकांना वाचवले, पण मी संपूर्ण देशालाच देशाबाहेर काढू शकत नव्हतो. त्या क्षणी मला रडू कोसळले. कारण कंबोडियाचे पुढे काय होणार, ते मला दिसत होते.’ पोल पॉटने कवटय़ांची रास रचली, ती यानंतर!
भारतात त्यांची नियुक्ती १९८५ मध्ये झाली. ते दिल्लीत दाखल झाले तेव्हा भारत आणि अमेरिकेचे संबंध १५ वर्षांपासून जणू थिजल्यासारखे होते. याचे कारण १९७१चे भारत-पाक युद्ध. या दोन देशांतील संबंध मैत्रीपूर्ण करण्याचे अवघड काम डीन यांना पार पाडायचे होते. त्यांनी थेट पंतप्रधान राजीव गांधी यांच्याशीच दोस्ती केली. ही मैत्री दोन्ही देशांना फायदेशीर ठरली. राजीव गांधी यांच्या काळात झालेली तंत्रक्रांती हा या मैत्रीचाच परिपाक असल्याचे मानले जाते.