महाराष्ट्रातील फुले-आंबेडकरवादी चळवळीचा प्रवाह सत्तरच्या दशकात विस्तारू लागला, त्यास त्या वेळच्या नव्या पिढीतील नेतृत्व हे जसे कारण आहे, तसेच त्यांना मिळालेली धडाडीच्या, पण विचारशील कार्यकत्र्यांची साथही त्यादृष्टाने मोलाची ठरली. विलास वाघ हे अशा विचारशील आणि धडाडीच्या कार्यकत्र्यांपैकी एक. सत्तरच्या दशकारंभी ‘सुगावा’ ही प्रकाशन संस्था सुरू करून आणि त्याजोडीने विविध सामाजिक चळवळींत सहभाग नोंदवत रचनात्मक कामांचा डोंगर उभा केलेल्या विलास वाघ यांच्या गुरुवारी आलेल्या निधनवार्तेने महाराष्ट्रातीलच नव्हे, तर देशभरातील अनेक सामाजिक कार्यकत्र्यांनी चळवळींचा साथी गमावल्याची भावना व्यक्त केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

धुळे जिल्ह्यातील मोराणे गावी १९३९ साली विलास वाघ यांचा जन्म झाला. थोडे उशिराच, वयाच्या आठव्या वर्षी शाळेत प्रवेश घेतलेल्या वाघ यांनी नेटाने बीएस.सी.पर्यंतचे शिक्षण घेतले. कोकणातल्या नरडावणे गावच्या शाळेत वर्षभर शिक्षकाची नोकरी करून ते पुण्यातील अशोक विद्यालयात रुजू झाले. तिथल्या दीड दशकाच्या नोकरीनंतर ऐंशीच्या दशकात त्यांनी प्रा. भालचंद्र फडके यांच्या आग्रहाने पुणे विद्यापीठाच्या प्रौढ शिक्षण विभागात प्राध्यापक म्हणून काम केले. पण वाघ यांचा पिंड विचारी कार्यकर्त्याचा. विद्यापीठीय धबडग्यात त्यांचे मन रमले नाही, अन् त्यांनी नोकरीचा राजीनामा देऊन पूर्णवेळ सामाजिक कार्यास वाहून घेतले. तोवर सुगावा प्रकाशन संस्थेच्या माध्यमातून ते सक्रिय झाले होतेच. पुढे नव्वदच्या दशकात सुगावाचा व्याप वाढला, देशभर संस्थेची ख्याती झाली. पण ‘सुगावा’ला ‘प्रकाशन संस्थे’पेक्षा ‘चळवळीची साथी’ म्हणून त्यांनी ओळख मिळवून दिली. दलित चळवळीतील नव्याने लिहित्या झालेल्या अनेकांना त्या काळातै‘सुगावा’चा आधार होता. भर वैचारिक पुस्तकांवर अधिक, त्यातही पुस्तिकांच्या रूपाने समकालीन विचारविश्वाचे दस्तावेजीकरण करण्याचे काम ‘सुगावा’ने केले, यामागे विलास वाघ यांची विचारशील दृष्टीच कारणीभूत ठरली. देवदासींच्या मुला-मुलींसाठी वसतिगृह, भटक्या विमुक्त जमातींच्या मुला-मुलींसाठी आश्रमशाळा अशी रचनात्मक कामे त्यांनी उभारलीच; पण समकालीन चळवळींतही ते सक्रीय राहिले. आंतरजातीय विवाह स्वत: त्यांनीही केला, अन् पुढे अशा विवाहांचा हिरिरीने पुरस्कारही केला. साम्यवादी प्रवाहातील अनेकांशी मित्रत्व जपलेल्या विलास वाघ यांना डॉ. आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यातील संवादाच्या वाटाही दिसत होत्या, नव्हे आजच्या संदर्भात या दोन महानुभावांचा सांधा जोडण्यासाठी ते आग्रही होते.

मराठीतील सर्व व्यक्तिवेध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vilas wagh profile abn
First published on: 26-03-2021 at 00:01 IST